प्रकाशन दिनांक :- 30/05/2004
भारताच्या गरिबीचे तुणतुणे आम्ही भारतवासी नेहमीच वाजवतो. इतर पुढारलेल्या देशातसुद्धा भारताच्या गरिबीची नेहमीच कुचेष्टा होते. परंतु गरिबी निश्चित करण्याची जी मानके आहेत त्याचा विचार केला तर भारताची गरिबी वेगळ्या अर्थाने श्रीमंत ठरते. एखादा देश गरीब असेल तर याचा अर्थ त्या देशातील प्रत्येक वस्तूची, उत्पादनाची किंवा क्रय-विक्रयाचा जिथे संबंध येतो त्या प्रत्येक बाबीची किंमत तुलनेत कमी असायला पाहिजे. भारताच्या बाबतीत मात्र तसे नाही. भारतामध्ये ज्यांची किंमत गरिबीच्या व्याख्येनुसार कमी असायला पाहिजे नेमक्या त्याच गोष्टी अतिशय महाग आहेत. इतर पुढारलेल्या देशात मात्र भारताच्या तुलनेत त्या स्वस्त असलेल्या आढळतात. अनेक उदाहरणांवरून हे स्पष्ट करता येईल. ज्या काळी भारत खरोखर गरीब होता त्या काळात भारतात मजूर, विद्युत, पाणी आदी उद्योगाला आवश्यक सुविधांची किंमत कमी होती. त्यामुळे उत्पादित वस्तू आणि उद्योगाशी संबंधित इतरही बाबी अतिशय स्वस्त होत्या.
आज परिस्थिती वेगळी आहे. या सगळ्याच गोष्टी आज भारतात इतरांच्या तुलनेत अतिशय महागल्या आहेत. भारतामध्ये पंचतारांकित हॉटेलच्या एका खोलीचे दर 4 ते 5 हजार तर सप्ततारांकित हॉटेलचे दर 8 ते 10 हजाराच्या घरात आहेत. त्या तुलनेत पुढारलेल्या सिंगापूरमध्ये त्यासाठी केवळ 103 डॉलर मोजावे लागतात. मलेशियात 300 रिंगीस (मलेशियन चलन) त्यासाठी खर्च करावे लागतात. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध मेडिसीन स्क्वेअर चौकातील पेनासिल्व्हेनिया हॉटेलमध्ये केवळ 80 डॉलरमध्ये सर्व सुविधांनी युक्त खोली मिळू शकते. इथे प्रश्न डॉलरची रूपयाच्या तुलनेत किंमत किती हा नाही. चलनाचे एकक या दृष्टीने विचार केला तर भारतातील विनिमय रूपयात आणि अमेरिकेतील डॉलरमध्ये होतो हे लक्षात घ्यावे लागेल. याचा अर्थ आ
्ही रूपये खर्च करतो तर ते लोकं डॉलर खर्च करतात एवढेच. आमच्यासाठी रुपयाची जी किंमत आहे ती त्यांच्यासाठी
डॉलरची आहे. त्यामुळे डॉलरची रूपयात
किंमत निश्चित करून भारतात खूप स्वस्ताई आहे, असे म्हणणे निरर्थक ठरते. भारतामध्ये ड्रायव्हर, प्लम्बर, कोणत्याही क्षेत्रातला तंत्रज्ञ किंवा साधारण बऱ्यापैकी मिळकत असलेली व्यक्ती स्वत:ची मोटार असल्याची कल्पनाही करू शकत नाही. परंतु अमेरिकेत मात्र आपल्याकडे ज्यांना मध्यमवर्गीय म्हणून समजले जाते अशा बहुतेक सगळ्यांकडेच स्वत:ची मोटर असतेच. अमेरिकेच्या तुलनेत भारतात स्वस्ताई असेल तर भारतातील मध्यमवर्ग अमेरिकन मध्यमवर्गीयांसारखाच ‘श्रीमंत’ असायला हवा, परंतु तसे दिसत नाही. विमान प्रवासाचे उदाहरण घेतले तरी तेच दिसून येते.
न्यूयॉर्क ते ओरलँडो या एक ते दीड तासाच्या प्रवासाला अमेरिकेत साधारण 100 डॉलर पडतात. भारतात मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या तेवढ्याच प्रवासाला 5 ते 6 हजार रूपये खर्च करावे लागतात. रस्त्यांची वाहतूक विदेशात अतिशय स्वस्त आणि तेवढीच दर्जेदार आहे. भारतात ही वाहतूक महाग तर आहेच आणि सोबतच धोकादायकसुद्धा आहे. आपल्याकडील वीज, पाणी या औद्योगिक विकासाला आवश्यक घटकांचा पुरवठा तुलनेत अतिशय महाग आणि तेवढाच बेभरवशाचा आहे. त्याचा सरळ परिणाम औद्योगिक विकासावर झाला आहे. त्यामुळे आपल्याकडील उद्योग विकसित तर होऊच शकले नाही, उलट जे सुरू होते तेही हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पायाभूत गोष्टीच महाग असल्यामुळे भारतातील औद्योगिक उत्पादने दर्जाहीन आणि महाग झाली आहेत. त्यामुळे विदेशी कंपन्यांचे भारतीय बाजारातील अतिक्रमण सातत्याने वाढतच आहे. याउलट परिस्थिती अमेरिकेत आहे. गेल्या 30 वर्षात अमेरिकेत केवळ एकदाच आणि तोही केवळ 2 तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. भारताच्या कथित गरिबीचे रहस्य इथल्या
शेतकऱ्यांच्या गरिबीत दडले आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेती उत्पादनावर अवलंबून आहे, हे पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. परंतु इथला शेतकरी उत्पादन वाढवूनही उत्पन्नाच्या बाबतीत मात्र फाटकाच राहिला. अमेरिकेच्या तुलनेत त्याचा विचार केला तर आपल्या गरिबीची कारणे सहज उघड होतात. अमेरिकेत पेट्रोल आणि वीज अतिशय स्वस्त आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला तिथे भरपूर चालना मिळाली. अमेरिकेत महाग काय आहे तर फळे, फळांचा रस, दूध, दुग्धजन्य उत्पादने, शेती उत्पादने. त्यामुळे स्वाभाविकच तिथला शेतकरी संपन्न आहे. अमेरिकेत एक गॅलन (साडेचार लीटर) पेट्रोलला दीड डॉलर मोजावा लागतो तर तेवढ्याच दुधासाठी तिथे अडीच डॉलर खर्च करावे लागतात. आपल्याकडे एक गॅलन पेट्रोलसाठी साधारण 170 रूपये मोजावे लागतात तर तेवढ्याच दुधासाठी शेतकऱ्याला केवळ 40 ते 50 रूपये मिळतात.
एकंदरीत आपल्याकडच्या व्यवस्थेनुसार उद्योजकही जगू शकत नाही आणि शेतकऱ्याच्या पोटातही सुखाने चार घास जात नाहीत. या तुलनात्मक परिस्थितीचा विचार केला तर असे दिसून येईल की, भारताच्या कथित गरिबीचे मूळ आपल्या चुकीच्या धोरणातच दडले आहे. ज्या गोष्टी स्वस्त आणि सहज उपलब्ध असायला पाहिजे नेमक्या त्याच गोष्टी महाग तर आहेतच शिवाय त्यांचा दर्जासुद्धा आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या तुलनेत अतिशय खालचा आहे. ज्या गोष्टी महाग असायला पाहिजेत त्या मात्र अतिशय स्वस्त आहेत. त्यामुळे पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती, मनुष्यबळाच्या दृष्टीने अतिशय संपन्न असलेल्या भारतातील सर्वसामान्य नागरिक मात्र अतिशय गरीब आहे.
हे चित्र बदलायचे असेल तर आपले एकूण आर्थिक धोरण, नियोजन मुळापासून बदलायला पाहिजे. चूक कोठे होत आहे, याचा मूलगामी विचार करून धोरणे निश्चित होणे गरजेचे आहे, परंतु आपल्या राज्यकर्त्यांचा ब
ुतेक वेळ सत्तेच्या राजकारणातच खर्च होतो. एक सरकार गेले की, दुसरे सरकार आधीच्या सरकारने केले ते सगळे चुकीचे ठरवीत काहीतरी वेगळेच करण्याचा प्रयत्न करीत असते. या राजकारणामुळेच देशाच्या विकासाला निश्चित आणि योग्य दिशा मिळू शकली नाही. मुळात विविध राजकीय पक्षांच्या आर्थिक धोरणात सुसूत्रताच नाही. प्रत्येकाचे धोरण वेगळे आहे. त्यामुळे ज्या पक्षाच्या हाती सत्ता येईल तो पक्ष आपलेच धोरण पुढे
दामटायचा प्रयत्न करीत असतो, याचा परिणाम देशाच्या विकासावर होतो.
आज भारत महागडा देश म्हणून ओळखला जातो. परंतु महागडा आहे म्हणून तो श्रीमंत आहे असे नाही तर उलटपक्षी या महागाईमुळेच आपण दिवसेंदिवस अधिक गरीब होत आहोत.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply