नवीन लेखन...

माणसा तुला सलाम





‘जिवेष्णा’ म्हणज जगण्याची उत्कट इच्छा ही प्रत्येक सजीवाची मूलभूत प्रवृत्ती आहे. नाकापर्यंत पाणी आल्यावर कडेवरच्या पिलाला पायाखाली घेणाऱ्या माकडिणीची कथा हेच सांगते. माणूस जगण्यावर जितके प्रेम करतो तितके इतर कशावरही करत नाही. त्याची सगळी धडपड जगण्यासाठी, चांगल्याप्रकारे जगण्यासाठी सुरू असते. परंतु अलीकडील काळात हे जगणेच दुष्कर झाले आहे. कमालीच्या आर्थिक विषमतेने समाजाला दोन परस्परविरूद्ध गटात विभागून टाकले आहे. एकीकडे महिन्याला लाख, दोन लाख, पाच लाख वेतन घेणारे लोक आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच सारख्या, त्यांच्या इतक्याच कुवतीच्या लोकांना हजार-पाचशे साठीही जीवतोड मेहनत करावी लागत आहे. काही शिक्षणसंस्था अशा आहेत की त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातात पदवी पडण्यापूर्वीच विविध कंपन्या त्यांना ‘बुक’ करतात, शिक्षण संपल्याबरोबर किमान 25-30 हजार महिन्याची नोकरी निश्चित होते आणि काही शिक्षणसंस्था अशाही आहेत की त्या संस्थांमधून पदवीच काय, पदव्युत्तर शिक्षण घेतले तरी शेवटी कुठेतरी दोन-चार हजारावर खर्डेघाशीच नशिबी असते. बी.ए., एम.ए., बी.कॉम., एम.कॉम. झालेली मुले अशी हजार-पाचशेवर आपली हुशारी घासताना पाहून खूप वेदना होतात. त्यांच्या पदवीला, त्यांच्या शिक्षणाला, त्यांच्या हुशारीला काडीचीही किंमत राहत नाही. या दोन्ही गटातल्या विद्यार्थ्यांच्या हुशारीत किंवा त्यांच्या बौद्धिक क्षमतेत खूप मोठी तफावत नसते, परंतु जेव्हा कमाईचा प्रश्न येतो तेव्हा मात्र ही तफावत कमालीची वाढलेली दिसते. नियतीने किंवा व्यवस्थेने केलेला हा अन्याय सहन करीत आयुष्य काढणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. दुर्दैवी केवळ ही तरूण मुलेच नाहीत, सगळ्यांच्या भुकेची चिंता वाहणारा शेतकरीही तेवढाच दुर्दैवी आहे. वास्तविक पोटाला अन्न ही मानवाचीच नव्हे तर सगळ्याच

सजीवांची मूलभूत गरज आहे. बाकी सगळ्या गरजा एकवेळ पूर्ण झाल्या नाही तरी चालतील, परंतु भुकेची आग कुणीच सहन करू शकत नाही. लोकांच्या पोटाची ही आग

विझविणारा शेतकरी मात्र सतत अन्यायाच्या, उपेक्षेच्या

आगीत जळत असतो. शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या जोरावर बाकी सगळ्यांचा बडेजाव, त्यांचे ऐश्वर्य, त्यांची मिजास टिकून असते आणि तो शेतकरी मात्र दोन वेळच्या अन्नाला मोताद असतो. ही विषमताही मन विषण्ण करणारी आहे. भोवतालची परिस्थिती कशीही असो, या लोकांना कष्ट करावेच लागतात. तापमान 45 अंशावर गेले म्हणून तक्रार करण्याचा हक्क त्यांना नसतो. वीज नाही, महागाई भयानक वाढली असली कारणे त्यांच्यासाठी नसतातच. या तक्रारी ज्या वर्गाच्या असतात त्या वर्गाला अशा तक्रारी करण्याइतपत सुख पुरविण्यासाठी या लोकांना कष्ट उपसावेच लागतात. खूप ऊन आहे ही तक्रार झाडाने करायची नसते, तो हक्क त्या झाडाच्या थंडगार सावलीखाली बसणाऱ्याचा असतो. लोक गगनचुंबी इमारतींकडे मोठ्या कौतुकाने पाहतात, परंतु त्या इमारतींना ती उंची देण्यासाठी इमारतीच्या पायात गाडल्या गेलेल्यांकडे कुणाचेच लक्ष नसते. त्यांच्या वाट्याला कायम उपेक्षा, कायम हीनपणा येतो. परंतु तरीही तक्रार नसते आणि असली तरी ती करून फायदा नसतो. त्यांचे प्रात्त*नच असे अभागी असते. या लोकांना जिथे भूक ही मूलभूत गरज पुरविणेच कठीण जाते तिथे इतर किमान गरजांच्या विचाराला स्थानच नसते. ही कमालीची विषमता खरोखरच मन अस्वस्थ करून जाते. या परिस्थितीने अस्वस्थ होणारा मी एकटाच नाही. अनेकांना ही विषमता अस्वस्थ करीत असेल. परंतु केवळ अस्वस्थ होऊन चालणार नाही. आपापल्या परीने प्रत्येकाने ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे ठरते. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो, हा प्रश्न मनात डोकावणे स्वाभाविक आहे. आज शहरात राहणाऱ्या एका कुटुंबाला आपल्या स
्वसाधारण गरजा पुरविण्यासाठी महिन्याला किमान पाच ते सहा हजार खर्च येतो. सगळ्याच नोकरदारांना किमान तेवढे वेतन मिळते असे अजिबात नाही. परंतु माझी इच्छा आहे की सगळ्यात कमी पगार हा एका कुटुंबाच्या किमान गरजा भागविणारा असला पाहिजे. त्यासाठीच या स्पर्धेच्या युगात इतर अनेक छोटी-मोठी वृत्तपत्र आचके देत कशीतरी सुरू असताना देशोन्नतीच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. या प्रयत्नात बरेचदा आर्थिक गणित गडबडते, परंतु त्याची झळ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचू दिली जात नाही. देशोन्नती अक्षरश: मातीतून उगवलेले रोपटे आहे. आज त्याचा वृक्ष झाला असला तरी मातीशी जुळलेली त्याची नाळ तुटलेली नाही. परंतु बऱ्याच मर्यादा येतात. देशोन्नतीवर कोणत्याही राजकीय नेत्याचा वरदहस्त नाही. त्यासाठी करावी लागणारी वैचारिक तडजोड आम्हाला मान्य नाही. देशोन्नती हे वर्तमानपत्र आहे आणि वर्तमानपत्रच राहावे अशीच आमची इच्छा आहे, ते कुणाचीतरी भाटगिरी करणारे ‘मुखपत्र’ कधीच होणार नाही. आमच्या या स्वाभिमानी भूमिकेमुळे आर्थिक बाबतीत मोठी झळ आम्हाला सोसावी लागली, सोसावी लागत आहे. आज ही परिस्थिती असली तरी उद्या ती राहीलच असे नाही. देशोन्नती एक दिवस खऱ्या अर्थाने ‘देशोन्नती’ होईल आणि देशोन्नतीशी जुळलेल्या प्रत्येकाच्या जीवनात समृद्धी येईल. ही केवळ आमची आशा नाही तर हा आमचा दुर्दम्य आत्मविश्वास आहे. या आत्मविश्वासाला जोड आहे ती आपले सर्वस्व ओतून देशोन्नतीच्या उन्नतीसाठी सातत्याने झटणाऱ्या कर्मचाऱ्यांची! किंबहुना असे कर्मचारी नसते तर माझ्यात हा दुर्दम्य आत्मविश्वास निर्माणच होऊ शकला नसता. देशोन्नतीत नाव, गाव, ओळख, जात वगैरे पाहून वेतन दिले जात नाही. वेतनाचा सरळ संबंध त्या त्या व्यत्त*ीच्या कामाशी असतो. कुणावरही अन्याय नाही आणि कुणाचेही लाड नाही, ही आमची अगदी स्पष्
भूमिका आहे. देशोन्नतीत कार्यरत असणारे हजार-दीड हजार कर्मचारी याची साक्ष देतील. चिकाटीने काम करीत देशोन्नतीच्या व्यापासोबतच देशोन्नतीचा मान-सन्मान वाढविणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मला खरोखरच कौतुक वाटते. त्यामुळेच त्यांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याकडे मी सतत लक्ष देत असतो. अतिशय निष्ठापुर्वक हे लोक काम करतात. त्यांच्यातली ही सकारात्मक जिवेष्णा मला खूप बळ

पुरविते. माझी खरी ताकद तीच आहे. वास्तविक आज आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावर

असलेल्या 70 ते 80 टक्के लोकांचे जगणे अतिशय दुष्कर झालेले आहे. परंतु जगण्याच्या या जीवघेण्या झगड्यातही चेहऱ्यावरील हास्य मिटू न देणाऱ्या या लोकांनीच जगण्यातला रसरशीतपणा कायम ठेवला आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम करावाच लागेल. अन्यथा आज त्यांचे जगणे मुश्कील करणाऱ्या घटकांनी कुठलीही कसर ठेवलेली नाही. आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावर असलेल्या लोकांचे सोडा, मोठेमोठे उद्योजक, कारखानदारही आज अक्षरश: मेटाकुटीला आलेले दिसतात. प्रचंड गुंतवणूक करून उद्योग उभारायचा, अनेकांना रोजगार द्यायचा, देशाच्या विकासात हातभार लावायचा आणि बदल्यात काय तर कष्टाने मिळवलेल्या एका रूपयातले नव्वद पैसे सरकार कराच्या नावाखाली लूटून नेते. सरकार विदेशी कंपन्यांच्या हातातले बाहुले बनले आहे. देशी उद्योगांच्या ते मुळावर उठले आहे. विविध करांच्या बोजाखाली गुदमरून देशी उद्योगांनी माना टाकाव्यात हीच सरकारची नीती आहे. खर्च वसूल होईल इतकेही उत्पन्न हातात येत नसेल तर उद्योजक कर्जाच्या विळख्यात अडकणे स्वाभाविक आहे. शेतकऱ्यांच्यी आणि उद्योजकांच्या दु:खाची पातळी वेगळी जरूर आहे परंतु स्वरूप मात्र सारखेच आहे. या इतक्या विपरीत परिस्थितीतही हे सगळे लोक काम करतात, जगतात, जगण्याचा आनंद लुटतात, आपल्या सोबत इतरांनाही जगण्याची ऊर्मी देतात हे खरोखरच
कौतुकास्पद आहे. या प्रचंड विषमतेतही जगण्याबद्दलची आस्था टिकवून ठेवणाऱ्या या माणसांना सलाम!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..