आपल्या देशाच्या लोकसंख्येने शंभर कोटीचा आकडा केव्हाच पार केला आहे. ही वाढती लोकसंख्या सरकारला संकट वाटत आहे. एका दृष्टीने पाहिले तर ते संकटच आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभुत सुविधांवर ताण पडतो, जगण्याच्या किमान सुविधा लोकांना पोहचविता येत नाही. परंतु या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करता येऊ शकते, अर्थात त्या दिशेने विचार आणि प्रयत्न झाले तरच.
लोकसंख्या वाढते म्हणजे खाणारी तोंडे वाढतात, परंतु त्या सोबतच काम करणारे दोन हात देखील वाढतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. या दोन हातांचा योग्य उपयोग देशाने करून घेतला तर वाढती लोकसंख्या निश्चितच आपत्ती ठरणार नाही. दुर्दैवाने तसे होत नसल्यानेच लोकसंख्येतील वाढ आपल्या देशासाठी एक मोठे संकट ठरले आहे. काही वर्षांपूर्वी चीन समोर हाच प्रश्न होता. तो निकाली काढण्यासाठी त्यांनी दोन स्तरावर त्याचे नियोजन केले. एकतर कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम अतिशय सत्त*ीने राबविला आणि दुसरे म्हणजे कोणतेही हात रिकामे राहणार नाहीत, याची काळजी घेतली. मनुष्यबळाचा अधिकाधिक उपयोग कसा होऊ शकतो, हे चीनने जगाला दाखवून दिले. आपल्याकडेदखील सरकार स्तरावर कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम राबविला जातो, लोकांचे प्रबोधन केले जाते, आता अलीकडे दोन पेक्षा अधिक अपत्ये असलेल्या लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविता येणार नाही असा कायदाही सरकारने केला आहे. परंतु या सगळ्या प्रयत्नांचा म्हणावा तसा परिणाम झालेला दिसत नाही. लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला असेलही परंतु तो आटोक्यात आलेला नाही. आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे कायदा करणे आणि तो सत्त*ीने राबविणे या दोन्ही गोष्टींना खूप मर्यादा येतात. चीनच्या राजवटीने ज्या सत्त*ीने कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम राबविला तसे भारतात शक्य नाही. त्यामुळे आज भारतात लोकसंख्या वाढ
चा दर कमी झालेला दिसत असला तरी तो आटोक्यात आला आहे, असे म्हणता येणार नाही आणि
प्रचलित राज्यव्यवस्थेत यापेक्षा अधिक काही
करता येण्यासारखे नाही. अशा परिस्थितीत चीनने वाढत्या लोकसंख्येचा फायदा करून घेण्यासाठी जो दुसरा मार्ग चोखाळला त्यावर विचार करणे गरजेचे ठरते. प्रत्येक हाताला काम दिले किंवा प्रत्येक हाताकडून काम करून घेतले तर हेच मनुष्यबळ देशाच्या विकासाला खूप मोठी चालना देऊ शकते. दुर्दैवाने त्या दिशेने सरकारने प्रयत्नच केले नाही, अगदी विचारही केला नाही. परंतु सगळाच दोष सरकारवर ढकलून मोकळे होता यायचे नाही. आपल्याकडच्या लोकांची मानसिकताही तशीच आहे. इतर देशांमध्ये विशेषत: ज्या देशांना आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी, टिकविण्यासाठी अतिशय प्रखर संघर्ष करावा लागला त्या देशांमध्ये लोकांसाठी काम करणे जणू काही एक व्यसन झाले आहे. लोक ‘वर्कोहोलिक’ झाले आहेत. रिकाम्या गप्पा करणारा, चकाट्या पिटणारा, निवांत बसलेला माणूस जपान, जर्मनी, अमेरिकेत पाहायला मिळणे दुरापास्त आहे. ते लोक रिकामे राहूच शकत नाही. सतत स्वत:ला कुठल्या ना कुठल्या कामात ते गुंतवून घेतात. मी पाच मिनीट रिकामा बसलो तर माझ्या देशाच्या विकासाला पाच मिनिटाची खिळ बसेल, हा विचार प्रत्येक जपानी माणूस करतो. अशी मानसिकता मुळातूनच असायला हवी. आपल्याकडे ती कुठेच आढळत नाही.
अमेरिकेतील मुले जास्तीतजास्त वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत पैशासाठी आपल्या पालकांवर अवलंबून असतात. मुलगा पंधरा वर्षांचा झाला की मग तो एकूलता एक असला तरी त्याचे पालक त्याला तुझा ‘पॉकेटमनी’ आता बंद, यापुढे स्वत:चा खर्च स्वत:च्या कमाईतून कर, असे स्पष्ट शब्दात सांगतात. खरेतर असे सांगायची वेळच त्यांच्यावर येत नाही. घरचा कितीही श्रीमंत असला तरी तो मुलगा स्वत:च आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो. स्वत:चे एक वेगळ
विश्व तो निर्माण करतो. त्याचे पुढचे शिक्षण आणि त्याचे एकूणच करिअर तो स्वत:च घडवितो. ही खूप चांगली पद्धत आहे. आपल्याकडे तसे होत नाही. आपल्याकडचे ‘माय-बाप’ आपल्या लेकराला आयुष्यभर पोसण्याची तयारी दाखवितात. एखाद्याने का हो तुमचा पोरगा काहीच करत नाही, नुसता बसून राहतो, असे म्हटले तरी त्याला काय गरज आहे काम करायची, त्याच्या बापाने त्याच्यासाठी भक्कम कमावून ठेवले आहे, असे उत्तर त्याचा बापच ताडकन प्रश्न विचारणाऱ्याच्या तोंडावर फेकतो. ज्या बापाने आपल्या पोरासाठी कमावून ठेवले त्यांचे एकवेळ ठिक आहे, परंतु ज्या माय-बापाला आपल्याच पोटाची खळगी भरण्याची चिंता असते ते माय-बापदेखील स्वत:च्या पोटाला चिमटा काढीत आपल्या लेकराला पोसत असतात. पोरगा म्हणजे म्हातारपणची काठी आहे, तो आपल्याजवळच राहिला पाहिजे, त्याला कुठे कामासाठी दूर पाठवता, होईल कसे तरी, करू कसे तरी ही मानसिकता आपल्या समाजात खूप खोलवर रूजली आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच असतो. आपल्याकडच्या माय-बापांचा हा मायेचा अतिरेकही मुलांसाठी असाच घातक ठरतो. या संदर्भात एका चिनी लोककथेचे स्मरण होते. एक बाप आपल्या पाच-सात वर्षाच्या मुलाला घराच्या छतावर चढवितो आणि खाली उडी मारायला सांगतो. मुलगा घाबरतो. मी पडेल, माझे हातपाय मोडतील, असे म्हणतो. बाप त्याची समजूत घालतो, मी खाली उभा आहे, तुला वरचेवर झेलून घेईल, काळजी करू नको, तुला पडू देणार नाही. साक्षात बापच ही खात्री देत आहे म्हटल्यावर काळजी करण्याचे कारणच नव्हते. मुलगा वरून उडी घेतो आणि त्याचवेळी बाप बाजूला सरकतो. मुलाला बरंच लागतं. तो रडतो, तुम्ही बाजूला का झाले म्हणून बापाला जाब विचारतो. त्यावेळी त्याचा बाप त्याला एवढेच सांगतो की यापुढे कुणाच्याही, अगदी बापाच्याही आधाराची अपेक्षा बाळगायची नाही. स्वत:मध्ये हिंमत असेल तर उडी मारायची, पुढे जायचे. हाच धड
मी आज तुला शिकवला आहे, आयुष्यभर तो तुझ्या कामी येईल. चीनच्या आजच्या प्रगतीचे रहस्य या लोककथेत तर दडले नसेल? असो, सांगायचे तात्पर्य आपल्याकडे निरोद्योगी, बेरोजगार तरूणांची
संख्या मोठी असेल तर त्यासाठी त्यांचे माय-बाप कुठेतरी निश्चितच कारणीभत
आहेत. तीस तीस- पस्तीस पस्तीस वर्षांची मुले घरी बसून आईबापाच्या जीवावर मजेत जगताना दिसतात तेव्हा त्यांची आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या मायबापांची किव वाटते. आपल्या मायेपोटी आपण आपल्या मुलांच्या आयुष्याचे वाळवंट करीत आहोत, हे त्या मायबापांना कळत नाही का? आपल्या मुलांना आपणच नालायक करीत आहोत, हे त्या माता-पितरांच्या लक्षात येत नसेल का? पुढे केव्हातरी ही चूक त्यांच्या लक्षात येत असेल, परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हातारपणाचा आधार म्हणून ज्यांना आपल्या उराशी कवटाळून बसलो त्यांनाच आपल्या म्हातारपणी आधार द्यावा लागत आहे, या वस्तुस्थितीकडे केवळ हताशपणे पाहणे त्यांच्या हाती असते. आपल्या देशाची वाढती लोकसंख्या आज एक मोठे संकट ठरली असेल तर त्याला ‘बसून खाण्याची’ ही वृत्ती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे आणि ही वृत्ती प्रबळ व्हायला माय-बापांच्या मायेचा पाश जबाबदार आहे. पंखात थोडी ताकद आली की पाखरं सुद्धा आपल्या पिलांना घरट्यातून ढकलून देतात. पाखरांना कळते तेवढेही आपल्याकडच्या माय-बापांना कळू नये का? त्यांच्या या लाडाचा परिणाम थेट देशाच्या विकासावर होत आहे. केवळ खाणारी तोंडे वाढत आहेत, त्या तोंडांसोबत असलेले दन हात काम करायला तयार नाही. एकीकडे बेरोजगारी वाढत आहे आणि दुसरीकडे शेतीवर काम करायला शेतकऱ्यांना मजूर मिळेनासे झाले आहेत. त्याच शेतकऱ्याची मुले गावात उंडारत असतात, परंतु शेतात जाऊन काम करणे त्यांच्या जिवावर येते. आपल्याकडे अल्कोहोलिक लोकांचे प्रमाण खूप आहे, परंतु एखादा ‘वर्कोहोलिक’ अभाव
ानेच आढळतो आणि म्हणूनच दोनशे कोटी हात असूनही आपला देश गरीब आहे.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply