नवीन लेखन...

मेनका गांघींचे भूतदयेचे नाटक





हिवाळा चरमसीमेवर पोहोचला आहे. थंडीचा कडाका सुरु आहे. दूरवरच्या रशियातील सैबेरियन पक्षी स्थलांतर करुन दिल्लीपासून अकोल्याजवळच्या कापशीपर्यंत पोहोचले आहेत. या स्थलांतरित पक्षांची छायाचित्रे विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित होत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तसंस्था, टीव्ही चॅनल्स आणि सर्व स्तरातील वर्तमानपत्रांमध्ये त्यावर विशेष वृत्तांत येत आहेत. इतका हजारो किलोमीटरचा प्रवास करुन हे पक्षी दरवर्षी नित्यनेमाने ठरावीक वेळेला आपल्याकडे येतात कसे आणि पुन्हा परत जातात तरी कसे, हा सामान्य माणसांना पडलेला नेहमीचा प्रश्न आहे. काहीजण असाही विचार करीत असतील की, जर रशिया किंवा अफगाणिस्तानातून पक्षी आपल्याकडे येत असतील तर भारतातील पक्षीही असेच अन्य देशांमध्ये किंवा कुठल्यातरी दुसऱ्या भागात जात असणार. याचा अर्थ एवढाच की, माणसांनी आपल्या शासन व्यवस्था प्रस्थापित करताना ज्या देशांच्या, प्रांतांच्या सीमा आखून ठेवल्या आहेत, त्या मुक्या पक्ष्यांना काही समजत नाहीत. ते बिचारे निसर्गाचे, निसर्गातील ऋतुचक्राचे पाईक असतात. त्यानुसार आपल्या जगण्याच्या पध्दती त्यांनी ठरवून घेतल्या आहेत आणि संपूर्ण सृष्टी किंवा ब्रह्यांड कब्जात घ्यायला निघालेली आम्ही माणसे मात्र त्यांना आपल्या बुध्दीच्या वकुबाप्रमाणे वागवितो, आपल्याच बुध्दीनुसार त्यांची काळजी घेतो, हाताळतो आणि पाळतोही.काही दिवसांपूर्वी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये फिरत असताना काही पक्षी विकायला ठेवलेले दिसले आणि आठवल्या त्या थोर पर्यावरणवादी, प्राणीमित्र मनेका गांधी. मुळात भारतात पक्षी किंवा प्राण्यांच्या खरेदीविक्रीला बंदी असताना हे पक्षी कसे काय विकायला ठेवले आहेत, अशी चौकशी केली तेव्हा समजले की, इथे भारतातील पक्षी किंवा प्राणी विकायला बंदी असली त

री विदेशी पक्षांवर मात्र तशी बंदी नाही आणि या बाजारात विक्रीसाठी ठेवलेले सर्व पक्षी विदेशी आहेत. हे ऐकून हसावे की, रडावे हेच कळेना. ज्या पक्ष्यांना राज्य, देशाच्या सीमा म्हणजे काय हे कळण्याचा प्रश्नच नाही त्यांची

काळजी घेताना एखाद्या देशात असा कसा कायदा

असू शकतो ही बाबच मोठी हास्यास्पद आहे. जीवशास्त्रात प्राणी, पक्षी यांचे परिवार आहेत. चिमणी, कावळा, मैना, हंस अशा कोणत्याही पक्ष्याचा विचार करताना त्याची फॅमिली कोणती हा विचार केला जातो. तीच त्याची ओळख असते. एकाच फॅमिलीमधील एकापेक्षा अधिक पक्षी विविध प्रांतांमध्ये असू शकतात. त्या त्या प्रांतांमधील हवामान, तापमान, चारा-पाण्याची उपलब्धता यानुसार त्या पक्षांनी आपल्या मूळ शरीररचनेत किंवा सवयींमध्ये थोडाबहुत बदल केलेला असू शकतो. परंतु, मुळात ते थोडेबहुत वेगवेगळे दिसणारे पक्षी एकाच फॅमिलीतील असतात. क्रॉफर्ड मार्केटमध्ये आप्रि*कन ठो पॅरोट मोठ्या संख्येने विकायला ठेवलेले आढळले. त्याशिवाय अन्य विविध प्रकारचे पक्षीही तेथे होते. करड्या रंगाचा पोपट विकायला परवानगी आणि आपल्या देशातील हिरव्या रंगाचा पोपट विकायला किंवा खरेदी करायला बंदी, हा कोणता कायदा, असा प्रश्न पडला. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा किंवा या चिमण्यांनो परत फिरा रे, अशा अनेक गीतांमधून आपल्याकडे प्राणीमात्राबद्दलची भूतदया ओतप्रोत भरलेली आहे. याचा अर्थ आपल्याशी अबोल असे हितगुज साधणारे सगळे पाळीव प्राणी, पक्षी यांच्यावर आपण केवळ अत्याचारच करीत असतो, असे अजिबात नाही. उलट अशा पाळीव प्राण्यांना आपण आपल्या कुटुंबातील सदस्यच मानतो. गायी-म्हशी, बैल, घोडे किंवा शेळ्यामेंढ्या व कोंबड्या या सतत आपल्या उपयोगी पडणाऱ्या पशुपक्ष्यांप्रमाणेच आपण कुत्रे, मांजर, ससे असे अन्य प्राणीही पाळत असतो. काही श्रीमंत लोक खास प्रशिक्षका
ंकडून प्रशिक्षण दिल्या गेलेले काकाकुआसारखे महागडे पक्षी पाळतात. माणसे व पशुपक्ष्यांच्या या एकत्र कुटुंबांमुळेच घराला घरपण येते. पण, आपल्याकडे हे देशातील पक्षी किंवा प्राणी विकायला कायद्याने बंदी, तर विदेशातील पशुपक्षी मात्र विकले जाऊ शकतात, विकत घेतले जाऊ शकतात. कायदा इतका विचित्र आणि अशा विचित्र कायद्यासाठी मनेका गांधींसारख्यांचे अकांडतांडव; एकुणच प्रकार उबग आणणारा! मुक्या जीवांची काळजी करणे, त्या काळजीसाठी कायद्यांचा आणि त्या कायद्यांच्या काटेकोर अंमलबजावणीचा आठाह धरणे यात गैर काहीच नाही. आपली संस्कृती सुक्ष्मातिसुक्ष्म जीवांची काळजी घ्या, अशी शिकवण देते. मुक्या प्राण्यांमध्ये, प्रत्येक सजीवामध्ये परमेश्वर वास करतो, असेही आपली आदर्शवत संस्कृती शिकविते. पण, त्याच संस्कृतीला असे कायद्यांचे परिमाण देताना आपण संकुचित कसे काय होऊ शकतो? पण, हे असे आहे हे खरे. केवळ पशुपक्षीच नव्हे तर जंगल व जंगलातील प्राण्यांच्या रक्षणासंदर्भातील विविध कायद्यांमध्येही अशीच विसंगती आढळते. भुतदयेच्या नावाखाली जर पशुपक्षी मारणे गुन्हा ठरत असेल तर मग बकरी इदला बकऱ्यांच्या नावाखाली मुस्लिम समाजाकडून होणारी गोवंशाची कत्तल कशी सहन केल्या जाते? तसेच जर तितरबटेर मारणे गुन्हा असेल तर मग कोंबड्या मारणे कसे चालते? मनेका गांधी ह्या बयेच्या अर्धवट ज्ञानामुळे तसेच भुतदयेच्या नाटकामुळे मग मोहल्ल्यामोहल्ल्यातील मोकळी व पिसाट कुत्री मनेका गांधीमुळे मारता येत नाहीत आणि सर्कशीमध्येही पाळीव प्राण्यांपासून कोठलीही कवायतीची कामे करून घेतल्या जाऊ शकत नाहीत. जीवशास्त्रीय व्याख्यांमधील ज्या फॅमिलीचा आधी उल्लेख केला आहे, त्यानुसार हरिण आणि बकरी हे दोन्ही प्राणी एकाच वर्गातील आहेत आणि बकरी किंवा बकरा मारणे कायद्याने गुन्हा नाही, परंतु कोवळ्या पिकांमध्
े घुसून हरणांचा कळप प्रचंड नासाडी करीत असेल आणि त्यांच्यातील एखादे हरीण शेतकऱ्याने संतापून भिरकावलेल्या एखाद्या दगडाचा घाव वर्मी लागून मेले तर तो मात्र भयंकर मोठा गुन्हा ठरतो आणि काळविटाची शिकार केली म्हणून सलमान खानवर खटला चालतो. वन्यप्राणी व त्यांच्या अवयवांची तस्करी रोखण्यासाठी विविध उपाय योजलेच पाहिजेत, परंतु केवळ शौक म्हणून आणि परवडते म्हणून जर कोणी एखादे वाघनख गळ्यात अडकविले असेल तर त्यालाही तस्कर ठरविण्याचा प्रकार थांबला पाहिजे. जंगलांच्या रक्षणाचेही असेच आहे. सरकारी धोरण असे आहे की, त्यामुळे सगळी

सामान्य माणसे जंगलांचा आणि जंगले राखण्यासाठी पगार घेणाऱ्यांचा तिरस्कार करु लागली आहेत.

पंचवीस-तीस वर्षांपूर्वी जेव्हा अरण्यात राहणारे विविध समाज पूर्णपणे जंगलावर अवलंबून होते तेव्हा जंगलांचे रक्षणही तेच करायचे. कारण, आपली रोजीरोटी त्यावरच अवलंबून आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव असायची. सरकारी धोरणांनी मात्र गेल्या दोन-तीन दशकांमध्ये ज्यांनी शेकडो-हजारो वर्षे जंगले टिकवून ठेवली, जपली त्या आदिवासींना, जंगलात राहून उपजीविका साधणाऱ्या सामान्य माणसांनाच जंगलाचे क्रमांक एकचे शत्रू ठरवून टाकले. जंगलातील वाळलेली काडी उचलायची त्यांना परवानगी नाही. तो वनखात्याच्या लेखी गुन्हा आहे. त्यामुळे पूर्वी वणवा लागला की जेवत्या ताटावरुन खरकट्या हाताने तो विझवायला उठणारे आदिवासी आता त्यांच्या गावाजवळचे जंगल वणव्यात राख झाले तरी जागचे हलत नाहीत. धरण बांधणे म्हणजे जंगलाचा नायनाट करणे, हा असाच आणखी एक आपल्या धोरणांनी वाढवून ठेवलेला गैरसमज आहे. जितका माणसांचा आणि त्यांच्या विकासाचा अधिक स्पर्श तितका जंगलाचा नायनाट असे यासंदर्भातील वास्तव असताना हा गैरसमज जोपासण्यात आला आहे. पशुपक्ष्यांबाबत जसे भूतदयेचे नाटक तसाच हा निसर्ग आणि पर्
ावरणविषयक प्रेमाचा ढोंगीपणा आहे. कोणत्याही धरणाच्या पाणलोटाकडील भाग माणसांच्या संपर्कात राहात नाही आणि त्या भागातील जंगल टिकून राहते. एकूणच जलवायू सशत्त* राहतो, हे साधे गणित असताना जंगले वाचविण्यासाठी धरणांना विरोध करण्याची विकासाला मारक ठरणारी मानसिकता आपल्या देशात जोपासण्यात आली आहे. यामुळे आपले शेतीचे तुकडे भिजविण्यासाठी पाण्याच्या थेंबाथेंबाचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरेत जंगलांबद्दल आणि त्यांच्या रक्षणाबद्दल केवळ उदासीनता नाही तर त्या प्रयत्नांबाबत तिरस्कार निर्माण झाला आहे. विदर्भातील झुडुपी जंगलांचा प्रश्न तर अशा विसंगत धोरणांचा कळस ठरावा. राज्याच्या उर्वरित भागात गावाजवळच्या गुरे चारण्याच्या भागाला रान तर विदर्भात जंगल म्हणतात. कारण, या प्रदेशात पाऊसपाणी चांगले आणि त्यामुळे जंगलांचेही प्रमाण अधिक. त्यामुळे गावाजवळचा भाग म्हणजे जंगल, अशी व्याख्या रुढ झाली आणि त्यांनाच वनखात्याच्या भाषेत झुडुपी जंगल म्हटले जाऊ लागले. अशा जंगलांमध्ये दाट झाडे किंवा घनदाट जंगल नसते, हे लहान मुलांनाही कळते. परंतु, त्या झुडुपी जंगलांमुळे अनेक पाटबंधारे प्रकल्पांना मंजुरी नाकारणाऱ्या तज्ज्ञांना हे कोण पटवून देणार? असल्या उफराट्या धोरणामुळेच विदर्भ, विशेषत: हमखास व चांगला पाऊस पडणारा पूर्व विदर्भाचा भाग मागास राहिला आहे. दुसरीकडे पावसाचे ते प्रचंड पाणी वर्षानुवर्षे वाहून जात आहे. खालच्या भागातील अन्य प्रदेश त्या पाण्याचा लाभ घेत असताना पाऊस ज्या अरण्यप्रदेशात पडतो त्या भागात मात्र वर्षातील सहा महिने पिण्यासाठी पाणी नसते. सांगायचे तात्पर्य केवळ उद्देश चांगला आहे याच एका निकषावर कोणतेही चुकीचे धोरण किंवा चुकीचा हट्ट शेवटी नुकसानकारकच ठरत असतो. मग ती भूतदया प्राण्यांप्रती असो अथवा झाडांप्रती!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..