नवीन लेखन...

वर्तुळ पूर्ण होतेय!




प्रकाशन दिनांक :- 25/05/2003

सृष्टीतील घटनाक्रमाचा उल्लेख करताना हमखास किंवा एकमात्र वापरला जाणारा शब्द आहे ‘चक्र’. सृष्टी हा शब्द, त्या शब्दातून प्रकट होणारी संकल्पना त्याला चक्र जोडल्याशिवाय पूर्णपणे साकार होत नाही. ‘सृष्टीचक्र’ या पूर्ण शब्दातून होणारा बोध हेच स्पष्ट करतो की, एका ठराविक कालावधीनंतर संपूर्ण सृष्टी पुन्हा – पुन्हा त्याच ठिकाणी येत असते. हे वर्तुळाकार भ्रमण केवळ भौगोलिक स्थितीबाबतच असते असे नाही, अगदी प्रत्येक गोष्ट या वर्तुळाशी निगडीत असते, त्याच्या नियमाला बांधील असते. संपूर्ण सृष्टी एकत्रितपणे जशी या नियमाला बांधील आहे, तसेच सृष्टीतील विविध घटक स्वतंत्रपणे सुध्दा त्याला अपवाद ठरू शकत नाही. विशेषत: मानवाच्या बाबतीत त्याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे.
मानवी विकासाच्या बाबतीत बोलताना ‘विकास’ ही उत्तरोत्तर चढत्या श्रेणीत होणारी प्रक्रिया आहे, असे समजल्या जात असेल तर आपण चुकत आहोत हे निश्चित. विकास असो अथवा इतर कोणतीही प्रक्रिया, वरकरणी ती एका सरळ रेषेत होताना दिसत असली तरी अंतत: ती सुध्दा वर्तुळाच्या नियमाला अपवाद ठरू शकत नाही. विकासाचे सुध्दा एक शिखर असते आणि ते गाठल्यावर पुन्हा घरंगळणे, पतीत होणे अवश्यंभावी ठरते. पतीत होण्याचेही एक टोक असते आणि ते गाठल्यावर आपला प्रवास पुन्हा उत्थानाच्या दिशेने सुरू होतो. उत्थान – पतनाच्या या चक्रात बरेच टप्पे पुन्हा – पुन्हा आपल्याला भेटतात आणि म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, असे म्हणतात.
विकासाच्या या प्रवासात बदल केवळ भौतिक किंवा बाह्य जीवनातच घडून येतात असे नाही. हे बदल आपल्या आतही घडून येत असतात. जसे ते शारीरिक असतात तसेच ते मानसिक, वैचारिक आणि बौध्दिकही असतात. थोडे डोळे उघडे ठेवून, जागरूकपणे नीट पाहिले तर हे बदल आपल्याला सहज टिपता येतात. युवावर्गातील साध्या फॅशनच

उदाहरण घ्या; दिलीप – राज

– देव या त्रिकुटाचे रुपेरी पडद्यावर साम्राज्य होते त्या काळात नॅरो बॉटम व गुडघ्याच्या वर फुगीर असलेल्या पँट आणि पँटच्या आत खोचलेला ढगळ शर्ट घालायची फॅशन होती. पुढे अमिताभचा जमाना आला आणि बेलबॉटमचा उदय झाला. शरिराला अगदी चिटकून घातल्या जाणाऱ्या टी – शर्टला भरभराटीचे दिवस आले आणि आज बेलबॉटमचे विश्व झोपडपट्टीत मर्यादित झाले. पुन्हा एकदा चुस्त पँटला प्रतिष्ठा मिळाली. आवर्तनाचा नियम स्पष्ट करण्यासाठी हे उदाहरण फारच उथळ वाटत असले तरी बारिक – सारिक बाबतीतही ‘एक – दोन आणि पुन्हा एक’ हे चक्र अव्याहतपणे फिरत असते हेच त्यातून स्पष्ट होते.
माणसाचा बौध्दिक विकास सृष्टीतील इतर कोणत्याही घटकापेक्षा अधिक झाला आहे, हे सत्य निर्विवाद आहे. परंतु हा विकाससुध्दा सृष्टीशी, निसर्गाशी जुळलेला आहे याचा आपल्याला बरेचदा विसर पडतो आणि आपण बुध्दीच्या बळावर सृष्टीचक्रालाच आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या हे लक्षातच येत नाही की, बेडकाने कितीही फुगतो म्हटले तरी त्याचा बैल होऊ शकत नाही आणि मग काही घटना अशा घडतात की, आपल्याला नाक मुठीत धरून निसर्गाच्या सृष्टीचक्राचे वर्चस्व मान्य करावेच लागते.
शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात तर हा अनुभव अतिशय बोलका ठरला आहे. साधारण 70 च्या दशकापर्यंत भारतातील शेती निसर्गाधारित होती. खते, बियाणे, कीडनियंत्रणासारख्या गोष्टी नैसर्गिक संसाधनातूनच प्राप्त केल्या जायच्या. शेती त्याकाळी नैसर्गिक समतोल सांभाळूनच व्हायची. परंतु 70 च्या दशकानंतर लोकसंख्या वाढीचा दर उंचावत गेला, खाणारी तोंडं वाढली. शेतीतील उत्पादन कमी पडू लागले. या परिस्थितीचा फायदा उचलीत कृत्रिम धान्य टंचाई निर्माण केल्या गेली आणि तिथेच रोवल्या गेली मानवी बुध्दिच्या निसर्गाविरुध्दच्या लढाईची बीजे! शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी क
ंवा शेतकऱ्यांना नागविण्याकरिता विदेशी बुध्दिमान (?) मानवाने संशोधनाची कास धरली. नैसर्गिक बियाण्यात जनुकीय बदल घडवून आणण्यात आले. संकरित बियाण्यांची निर्मिती झाली. रासायनिक खते, प्रभावी कीटकनाशकांचा उदय झाला. प्रत्यक्ष निसर्गालाच मानवाने आव्हान दिले. या दीर्घकालीन लढाईच्या पहिल्या टप्प्यात तर मानवाने निर्विवादपणे निसर्गावर विजय मिळविला. किंबहुना तसे किमान चित्र उभे केल्या गेले. शेतीतील उत्पादन प्रचंड वाढले. पिकावर किती फवारे मारले, हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय ठरला. रासायनिक खतांची, कीटकनाशकांची जड इंठाजी नावे अगदी अशिक्षित शेतकऱ्यांच्या तोंडीदेखील विठोबा – रखूमाईच्या सहजतेने येऊ लागली. विकासाचे एक शिखर मानवाने गाठले; पण पुढे? मानवी बुध्दीने लक्ष्मण रेषा ओलांडली होती, त्याची किंमत त्याला चुकविणे भागच होते. उताविळपणा आणि फाजील आत्मविश्वासाने कोणत्याही युध्दात निर्णायक विजय मिळवता येत नाही. मानवाच्या निसर्गाविरुध्दच्या संघर्षात त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. एकाचवेळी सगळी सोन्याची अंडी मिळविण्यासाठी ती अंडी देणारी कोंबडीच कापणाऱ्यासारखी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे. भरघोस उत्पादनाच्या मृगजळामागे धावताना शेतकऱ्याने आपल्या अन्नपूर्णा काळ्या आईचे पार धिंडवडे काढले. रासायनिक खतामुळे उत्पादन तर वाढले, परंतु ती वाढ नव्हती तर सुज होती, हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. रासायनिक खतामुळे जमिनीचा कस, तिच्यातील सकसपणा कायम ठेवणारे जिवाणूच नष्ट झाले. जनुकीय बियाणे, रासायनिक खते आणि जहाल कीटकनाशकांच्या एकत्रित प्रभावातून बहुप्रसवा धरणी वांझ होऊ लागली. सरासरी पावसाचे प्रमाण कायम असताना दरवर्षी दुष्काळाची तीपता वाढतच आहे. अगदी सर्वाधिक पर्जन्याच्या चेरापुंजीसारख्या ठिकाणीसुध्दा दुष्काळ पडू लागला.
ामागचे कारण हेच आहे की, जमिनीची जलसंधारण क्षमताच नाहीशी होत आहे. ही क्षमता जमिनीतील जिवाणूच नष्ट झाल्यामुळे नाहीशी झाली हे वेगळे सांगावयास नको. कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या अतिरिक्त किंबहुना अनावश्यक वापरामुळे उत्पादने निसत्व, निकस झाली. एवढेच नव्हे तर कीटकनाशकातील जहर प्रत्यक्ष पिकात उतरून मानवी आरोग्यालाच गंभीर धोका निर्माण झाला तो वेगळाच.
भारतीय द्राक्षांना

युरोपात मोठी बाजारपेठ आहे, परंतु यावर्षी युरोपीय बाजारपेठेने भारतातून

आयात होणाऱ्या द्राक्षांवर त्या द्राक्षात आढळून आलेल्या ‘रेसिड्यू’ किंवा विषारी औषध घटकांमुळे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतातील द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. वास्तविक कीटकनाशके, रासायनिक खते, संकरित – जनुकीय बियाणे ही सर्व युरोपीय राष्ट्रांनीच आपल्याला दिलेली भेट आहे. जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असलेल्या या युरोपीय देशांना निसर्गाला आव्हान देणाऱ्या या कृत्रिम संसाधनातील फोलपणा तत्काळ कळून आला होता. परंतु या रासायनिक खतांचे, कीटकनाशकांचे प्रचंड उद्योग सांभाळणे आर्थिकदृष्टीने त्यांच्यासाठी गरजेचे होते. त्यांना प्रयोग करण्यासाठी एका ‘गिनीपिग’ ची आवश्यकता होतीच. अशा परिस्थितीत भारतासारखा उत्तम बळीचा बकरा दुसरा कोणता ठरला असता? भोळसर भारतीय शेतकऱ्यांसमोर त्यांनी भरघोस उत्पादन आणि उत्पन्नाचे मोहक स्वप्न उभे केले आणि त्यांच्या दृष्टीने टाकावू असलेली सगळी खते, कीटकनाशके, बियाणे आपल्या माथी मारली. प्रत्यक्षात भरघोस उत्पादनाची गुणवत्ता इतकी टाकावू आहे की, माल गोदामात सडतो, पण त्याला गिऱ्हाईक, बाजारपेठ मिळत नाही आणि उत्पन्नाचे म्हणाल तर गरीब शेतकऱ्याच्या धोतरावरची वाढलेली ठिगळं आणि त्यांच्या वाढलेल्या आत्महत्येची आकडेवारी
ुरेशी बोलकी आहे. इतकं होऊनही आपला शेतकरी त्या मोहक स्वप्नाच्या बाहेर यायला तयार नव्हता. परंतु खते, बियाणे, कीटकनाशके उत्पादित करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जेव्हा त्याच्या कासोट्यालाच हात घातला तेव्हा मात्र शेतकऱ्यांचा नाईलाज झाला आणि तो पुन्हा सेंद्रिय – निसर्गाधारित शेतीकडे वळू लागला. निसर्गासोबतच्या संघर्षात मिळालेल्या क्षणिक विजयाचा कैफ आता ओसरू लागला आहे. सृष्टिचक्राच्या नियमांना अपवाद नसतो हे पुन्हा सिध्द झाले आहे. निसर्ग आपले संतुलन बिघडू देत नाही. जितक्या चोची असतील तितके दाणे सुध्दा तो उपलब्ध करून देत असतो. हळूहळू आणि अपघाताने का होईना हे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले हे या देशाचे सुदैवच म्हणावे लागेल, इथला शेतकरी पुन्हा पारंपरिक, निसर्गाचा समतोल ढळू न देणाऱ्या संसाधनाकडे वळू लागलाय, एक वर्तुळ पूर्ण होऊ लागलेय!

— प्रकाश पोहरे

Register / login username or e-mail * password * create new account request new password related navigate to this service content geometry line segment geometry for enjoyment and challenge notes 5

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..