हिन्दुस्थानला इंठाजांच्या जोखडातून सोडविण्याकरिता हजारो नव्हे, लाखोंनी बलिदान दिले. हे स्वातंत्र्य मिळविण्याकरिता अनेकांनी अनेक मार्ग चोखाळले. भगतसिंग-राजगुरुंचा आपला मार्ग होता, तर सुभाषचंद्र बोसांचा व सावरकरांचा वेगळाच मार्ग. मात्र अंतत: या सर्वांसह इतर अनेक ज्ञात, अज्ञातांचे सर्व प्रयत्न हिंसेच्याच मार्गाने जाणारे होते. या सर्वांचे ध्येय मात्र समान होते आणि ते म्हणजे मातृभूमिची ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून मुक्तता! प्रेरणा होती देशभक्ती!
लोकमान्य टिळकांनी मोहनदास करमचंद गांधीजींना आप्रि*केतून निमंत्रित केल्यानंतर गांधीजींनी संपूर्ण हिन्दुस्थानभर फिरुन परिस्थिती पाहिली आणि त्यानंतर इंठाजांना देशातून हाकलण्याकरिता जो अभिनव मार्ग चोखाळला तो होता अहिंसेचा! अहिंसेचा मार्ग पत्करला म्हणून पू. गांधीजी भेकड होते असा जर कुणी निष्कर्ष काढत असेल, काढला असेल तर त्यांच्याबद्दल एवढेच म्हणता येईल की, असा निष्कर्ष काढणाऱ्यांना वस्तुस्थितीची जाणीवच नव्हती, अभ्यास नव्हता. वस्तुस्थिती ही होती की, गांधीजींनी ज्याप्रकारे जनजागृती घडवून आणली आणि गुलामांना गुलामींची जाणीव करून दिली, त्यामुळे त्यांच्या शब्दाखातर सर्वस्व अर्पण करण्याची भावना ठेवणारे; त्यांच्या आदेशानुसार हातात, लाठ्या, तलवारी, बंदुका घेणारे लाखो, करोडो हात त्या काळी तयार होते. या सर्वांचे फलित भलेही स्वातंत्र्य असते, मात्र किंमत होती करोडो हिंदुस्थानीयांची आत्माहुती! कारण इंठाजांनी लाठीचा जबाब तलवारींनी, तलवारींचा जबाब बंदुकींनी आणि बंदुकीचा जबाब तोफा- विमानांनी नक्कीच दिला असता. त्यामुळेच अहिंसा – शांतीचा मार्ग, असहकाराचा मार्ग, इंठाजांची गोळी खाल्ली तरी मरताना छातीवर घट्ट हात बांधलेलाच तुमचा देह सापडला पाहिजे, ही शिकवण व वंदेमातरम् चा मंत्र यशस्वी ठरले आणि इंठाजांना हतबल होऊन हिन्दुस्थान सोडावा लागला. जागतिक मत आणि सहानुभूती हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या बाजूने निर्माण व्हावी आणि टिकावी याकरिता गांधीजींचा हा मार्ग यशस्वी ठरला.
या प्रास्ताविकाचा उद्देश असा की युध्द आताही सुरुच आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी. नुकताच अमेरिकेने इराकवर लादलेल्या युध्दाचा एकतर्फी निकाल लागला आहे, किंबहुना अमेरिकेने तसे एकतर्फी जाहीर केलंय. आर्थिक क्षेत्रातही युध्द सुरुच आहेत. तिथे शस्त्र आहेत अफवा व विश्वासार्हता.
औद्योगिक क्षेत्रातही युध्द सुरुच आहेत. तिथे शस्त्र आहेत स्वस्ताई, नावीन्य, सेवा आणि कामगारांची पळवापळवी! राजकारणातील क्षेत्रात जी युद्धे सुरु आहेत त्या युध्दाची परिणती म्हणजे सत्ताप्राप्ती. ते मिळविण्याचे शस्त्र आहे संशय, माध्यम आहे कॅमेरे, चॅनल्स व वर्तमानपत्रे आणि सैनिक आहेत कार्यकर्ते. रसद आहे वैध अवैध मार्गाने जमा केलेला प्रचंड निधी.
प्रसारमाध्यमांची युध्दही सुरुच आहेत. शस्त्र आहेत, पैसा आणि किंमतीची प्रलोभने. उद्देश आहे विचार व बुद्धीच्या क्षेत्रात एकाधिकारशाहीची स्थापना करुन सत्ताप्राप्ती. असेच एक युध्द सध्या सुरु आहे. युध्दभूमी आहे विदर्भ! ही भूमि ताब्यात घेण्याची मनीषा ठेवणारे होते व आहेत, अशा व्यक्ती ज्या निश्चितपणे या प्रांतातील नाहीत. जे याच प्रांतातील आहेत, याच प्रांतातील भाषा बोलतात, ज्यांच्या पिढ्यांपिढ्या, वंशज येथेच जन्मले, मेले त्यांना हा प्रांत मिळविण्याची मनीषा बाळगण्याचे काहीच कारण नाही, कारण ते तर मालकच होते आणि आहेत.
हा विदर्भ प्रांत सुभेदारीत मिळविण्याची मनीषा ‘त्यांच्या’ मनात का निर्माण झाली, याची कारणेही तशीच आहेत. प्रमुख कारण म्हणजे येथे विरोधकच नाहीत. मराठी माणूस म्हटला म्हणजे ‘तुका म्हणे उगे रहावे जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ ही वृत्ती. उद्योजकतेची मानसिकताच मराठी माणसात नाही. त्यामुळे उद्योगात स्थानिक स्पर्धा होण्याची सुतराम शक्यता नाही. स्पर्धक होते ते येनकेनप्रकारेण संपवलेले वा गारद केलेले. वैदर्भीयांची सहिष्णुता, मनाचा मोठेपणा हा गुण न राहता कमजोर दुवा झालाय. हा प्रांत ताब्यात मिळविण्याची मनीषा बाळगणाऱ्यांची एक विशिष्ट जातकुळी आहे. वेगळ्या विदर्भाची सर्वप्रथम डरकाळी फोडणारे होते ‘दैनिक मातृभूमि’कार ब्रजलालजी बियाणी. ते आता स्वर्गवासी झालेत, बियाणींनंतर हा प्रांत ताब्यात घेण्याची मनीषा बाळगणारे होते नागपूरचे ‘दैनिक राष्ट्रदूत’कार अगरवाल आणि त्यांचाच वारसा पुढे चालवत आहेत ‘दैनिक लोकमत’कार दर्डा, ‘दैनिक हितवाद’कार पुरोहित, ‘दैनिक नवभारत’कार माहेश्वरी व सोबतीला सतीश चतुर्वेदी आणि इतरही अनेक!! या लोकांची शस्त्र मात्र तीच तीच आहेत आणि ती म्हणजे वर्तमानपत्रे! ही मंडळी धुर्त असल्यामुळे सोबतीला मुद्दाम काही स्थानिक मराठी भाषिकांनाही घेतात कारण स्वत:ची लोकांमधील प्रतिमा त्यांना माहीत आहे. त्यामुळे आघाडीला काही स्थानिक मंडळी असली म्हणजे कसे बरे असते.
विदर्भ ताब्यात घेण्याकरिता जी पद्धत वापरली जात आहे. ती पध्दत नेहमी सारखीच आहे आणि ती म्हणजे येथील स्थानिक नेतृत्वाला, स्पर्धकाला नियोजनबध्द रीतीने बदनाम करणे, नामोहरम करणे. त्याकरिता वर्तमानपत्राचे जे शस्त्र आहे ते चालविणारे म्हणजेच लेखणी चालविणारे हात किंवा ‘फुसक्या’ सोडणारी; कंड्या पिकविणारी तोंडे मात्र ठेवली आहेत मराठी. इंठाजांनी नाही का हा हिंदुस्थान ताब्यात ठेवण्याकरिता सैन्यात भरती येथल्याच हिंदुस्थानीयांची म्हणजे नेटिवांची केली. त्यांनी काही ब्रिटनवरून फौजा नव्हत्या आणल्या, त्या त्यांना परवडणाऱ्याही नव्हत्या. कारण त्यांना ना ह्या भूभागाची माहिती ना उन्हाळ्याची सवय. मातृभूमीच्या विरोधात इंठाजांना मदत करण्यासाठी हिंदुस्थानीयांनी इंठाजांची नोकरी का केली म्हणता? अहो पोट! उपजीविका! आता ते भरण्याकरिता, उपजीविकेकरिता कुणी दारू विकायची की दूध विकायचे, हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा, बुध्दीचा, शिकवणुकीचा, गरजेचा आणि संस्काराचा प्रश्न आहे. स्वार्थ, अहंकार, द्वेष, लोभ आणि आळसाने का कुणाला सोडलेय राव?
हा विदर्भ प्रांतच ताब्यात का घ्यायचाय? महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र कोकण, मराठवाडा, खान्देश, मुंबई असे संपन्न विभाग आहेत की? मग ते का नाहीत वेगळे मागायचे? कारण आहे! तेथे वैदर्भीयन सहिष्णुता (म्हणजे आपला भयताडबेलणेपणा हो) नाही. त्या प्रांतातील माणसं कशी धोरणी, एकोप्याने राहणारी वा किमान एकमेकांशी संवाद ठेवणारी किंवा गरज असली म्हणजे परिस्थिती पाहून शंभर कौरव अधिक पाच पांडव अशी 105 होवून लढणारी आहेत! आमच्या वैदर्भीयासारखी चार दिशांना चार तोंड असणारी आणि बसल्या जागी कुंथणारी किंवा चिलमी गप्पा ठोकणारी निश्चितच नाहीत.
या आधीही ही युध्दं अनेकदा खेळल्या गेलीत. अनेक शहीद झालेत, अनेक गारद झालेत. त्यात स्व.नानासाहेब वैराळेही आलेत.स्व. आबासाहेब खेडकर, स्व. वसंतरावजी नाईक, स्व. वीर वामनराव जोशी, स्व. नित्यानंद मोहिते, स्व. आयाजी पाटील, स्व.दादासाहेब काळमेघ, स्व.भाई के.आर. पाटील, स्व.भाई दे. मा. कराळे, आप्पासाहेब सरनाईक, स्व.सदाशिवरावजी ठाकरे, देवराव पाटील चोंडीकर, नरेंद्र तिडके, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, रा.सु. गवई, भाई टी.पी. पाटील, असे अनेक ज्ञात अज्ञात होते, आहेत. हे सगळेच आलेत.
नुकतेच मागील वर्षी हे युद्ध पुन्हा खेळल्या गेले. बाबासाहेब केदारांची पहाडाएवढी पुण्याई, कर्तृत्व आणि प्रदीर्घ काळाचा, राजकारण व समाजकारण, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील अनुभव, कर्तृत्व असूनही, त्या पहाडावरही तोफगोळे डागून सैनिकाला पार तुरूंगापर्यंत पोहोचवल्या गेले. संधी व क्षेत्र मिळाले विश्वासार्हतेला सुरूंग लावण्याचे. गरत्या बाईबद्दल बाजारबसवीने बोंब मारली – लोकांनी ती खरी मानली. रामायणातही नव्हे का सीतेबद्दल संशय घेतला गेला आणि अग्निदिव्य केल्यावरही पुन्हा वनात पाठविली.
जे या बोंबा ठोकताहेत त्यांची ना काही सामाजिक बांधीलकी, ना काही तपश्चर्या ना काही त्याग! स्वीस बँकेतील हपापाचा माल गपापा आणि आयजीच्या जीवावर बायजी उदार ही यांच वृत्ती. मात्र लक्षात कोण घेतो? वेश्येने पदर खाली सोडला तरी बातमी होत नाही – गरतीच्या डोक्यावरून खांद्यावर आला, तरी ‘हेडलाईन’ होते!
विदर्भाच्या इतिहासातही कुण्या वैदर्भीयाने, कुण्या शेतकऱ्याने, कुण्या मराठी माणसाने दिवाळे काढल्याची एक बातमी नाही, एक घटना नाही. प्रसंगी आत्महत्या केल्यात, पण दिवाळे काढले नाही. अशांचा नाही सत्कार; मात्र किमान जाणीव तर ठेवा. ज्यांनी देशासाठी निष्काम भावनेने फारसे कधीच काही केले नाही, समाज म्हणजे ‘जात’ एवढेच ज्यांना समजते,असे बेगडी लोक आज स्वातंत्र सैनिक, देशभक्त, समाजसेवक म्हणून मिरवत आहेत. खरे स्वातंत्र्यसैनिक आणि समाजासाठी खस्ता खाणारे बिचारे मुकाटपणे, हताशपणे हे पाहत तरी बसले आहेत किंवा त्यांच्यापैकी बरेच कैलासाला तरी गेले आहेत. या बेगडी नकली, नाटकी मंडळीमधीलच काही हुशार मंडळी निवडून येतात वा बहुतेक मागच्याच दाराने सत्तेत बसतात किवा मतांची खरेदी-विक्री करून पदे ताब्यात घेतात. चूक कुणाची? त्यांची! नव्हे, त्यांना निवडून देणाऱ्यांची! प्रसार माध्यमांच्या शस्त्राच्या धाकावर एकदा सत्तेमध्ये शिरकाव झाला की पुढचे मग सगळेच कसे सोपे असते.
या मंडळींची प्रेरणा कोण? आदर्श कोण? अहो इंठाज! त्याकाळ्ी तराजू घेऊन आलेले इंठाज कधी आणि केव्हा शासक बनले हे लक्षात आले नव्हते आणि आले तेव्हा वेळ निघून गेलेली होती. विदर्भच ताब्यात का? उद्देश काय? अहो, विदर्भातील पांढऱ्या सोन्याला साता समुद्रापार नेण्याचा इंठाजांनाही मोह झाला आणि अघोरी नफा कमावण्याकरिता त्यांनी राज्यच ताब्यात घेतले हे विसरु नका. कापूस हेच विदर्भातील नगदी पीक आणि त्याचमुळे ‘वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड’ म्हटल्या जाते. अनायसे त्या पांढऱ्या सोन्याचा व्यापार आता पुन्हा खुला झालायं आणि म्हणूनच विदर्भ वेगळा केला म्हणजे साफ केलेले मैदान आहेच खेळायला.
पोट भरायला आला आहात तर पोट भरा! पोतीही भरा!! हरकत नाही. मात्र मालक व राज्यकर्ते व्हायचे मनसुबे मनात बाळगू नका, अशी ह्यांना तंबी द्यायची वेळ आता आली आहे. ज्या थाळीत खायचे त्याच थाळीला छिद्र करणाऱ्यांपासून व ज्यांचे खायचे त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांपासून सावध राहण्याची व त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायची वेळ आली आहे. कॉम्प्युटरची ताकद असते त्यातील सॉफ्टवेअर. तद्वतच शस्त्राची ताकद असते. जशी तलवारीची धार, बंदुकीच्या गोळ्या, तोफेचा बारुदगोळा! अशा प्रकारे ही ताकद त्या-त्या शस्त्रानुसार वेगवेगळी असते. वर्तमानपत्राची ताकद असते त्याचा खप व विश्वासार्हता! जशी बोथट तलवार आणि बिना गोळीची बंदूक सारखीच, तशीच गत असते कमी खपाच्या आणि विश्वासार्हता गमावलेल्या वर्तमानपत्राची. मदमस्त हत्तीला छोटासा अंकुश ताब्यात ठेवतो, मोठ्यात मोठ्या नेत्याला मतपेटीसारखी गोष्ट क्षणात घरी बसवू शकते, तद्वतच ‘एकाचा बहिष्कार दुसऱ्यांचा स्वीकार’, एवढे हे सोपे गणित आहे. स्पर्धेच्या या युगात ‘अनेक सशक्त पर्याय’ उपलब्ध असताना उशीर कशाला?
— प्रकाश पोहरे
प्रकाशन दिनांक :- 27/04/2003
Leave a Reply