‘आनो भद्रा ऋतवो यन्तु विश्वत:’. वेदातील या प्रार्थनेचा अर्थ आहे, सकल विश्वातून उत्तमोत्तम विचार आमच्यापर्यंत येवोत. व्यक्ती किंवा समाजाच्या घडवणुकीतील उत्तम विचारांचे महत्त्वच या प्रार्थनेतून अधोरेखित होते. उत्तम, उदात्त, उन्नत विचारांची कामना स्वस्थ मानसिकतेची परिचायक आहे. जो समाज किंवा जो देश उत्तम विचारांच्या पायावर उभा झालेला असतो त्या समाजाचे किंवा देशाचे अस्तित्व चिरस्थायी असते. कदाचित त्याचमुळे असेल, हिंदूस्थानचे वर्णन करताना कवी इकबाल म्हणाले होते, ‘कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी, दुष्मन रहा है सदियां दौरे जहाँ हमारा’. आपल्या समाजाची, देशाची घडण उत्तम विचाराने, सर्वसमावेशकतेच्या तत्त्वाने झाली असल्यामुळेच अनेक संकटे पचवून हा देश आज आपल्या अस्तित्वाची स्वतंत्र ओळख राखून आहे. जगात अनेक संस्कृती उदयास आल्या, काही काळ नांदल्या आणि लोप पावल्या. परंतु या मातीत रूजलेली संस्कृती बहरतच गेली, त्यामागे सर्वाधिक महत्त्वाचे कारण हेच आहे की, ही संस्कृतीच मुळी ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या उदात्त पायावर उभी आहे.
हजारो वर्षांच्या इतिहासात हजारो आक्रमणे लिलया परतवून लावणाऱ्या या संस्कृतीच्या मजबूत वैचारिक पायाला मात्र अलीकडील काळात हादरे बसू लागले आणि आतातर या हादऱ्यांची तीपता जाणण्याइतपत वाढली आहे. विश्वातून उत्तमोत्तम विचार आमच्याकडे येवोत, अशी आपली कामना असली तरी उत्तम विचारांची गंगोत्री मात्र केव्हाच आटली आहे. विधायक विचारांना आता कोणी विचारीत नाही. या विचारांना प्रतिष्ठा राहिलेली नाही. त्यांची खिल्ली उडविली जाते आणि दुसरीकडे विघातक विचारांचे आकर्षण मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मागणी तसा पुरवठा, या व्यापारी तत्त्वाने वैचारिक क्षेत्रसुध्दा व्यापल्याने, जे खपते तेच पिकवले जात आहे. कथा, कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट, दूरचित्रवाणीवरील विविध मालिका एवढेच नव्हे संपूर्णपणे धार्मिक समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमातूनदेखील जे विचार पेरले जात आहेत ते समाजाला कोणत्या दिशेने उन्नत करीत आहे तेच समजत नाही. आज आपल्या सभोवताल जे घडत आहे ते चांगले नाही असे आपल्याला वाटत असले तरी ते अपरिहार्य आहे, हे तथ्य आपल्याला स्वीकारावेच लागेल. शेवटी जे पेरल्या गेले तेच उगवणार. ‘येल काकळीचा होता, बार कारल्याचा आला’, अशी तक्रार करण्यात अर्थ नाही. येल कारल्याचाच होता, फक्त लावताना आपण तो काकळीचा समजून लावला होता.
समाज पोसला जातो तो अगदी निम्न स्तरातून प्रसवणाऱ्या विचारांवर. हे विचारच बाल्यावस्थेपासून व्यक्तीचा विकास घडविण्यास कारणीभूत ठरत असतात. त्या व्यक्तीला जे प्राप्त झाले असते तेच अधिक पटीत तो वितरीत करीत असतो. या विचारांचाच गुणाकार त्याच्या कृतीतून प्रगट होत असतो. आज एखाद्या लहान मुलाला एखादे छोटेसे काम सांगितले तर तो अगदी सहजपणे चॉकलेट देत असाल तर करतो, असे म्हणून जातो. वरवर बघितल्यास ही बाब फारच क्षुल्लक वाटते, परंतु कळत – नकळत का होईना कुठली तरी बक्षिशी मिळाल्याशिवाय काम करायचे नाही, हा विचारच आपण त्या बालमनावर कोरीत नसतो का? वैचारिक प्रदूषण सुरू होते ते तिथून! आज सर्वच स्तरावर ते प्रचंड फोफावले आहे. शिक्षणासारखे पवित्र, वैद्यकीयसारखे सेवाभावी क्षेत्र देखील त्यातून सुटलेले नाही. स्पर्धेच्या गोंडस नावाखाली व्यापार, उद्योग, वृत्तपत्र आणि इतरही क्षेत्रात अनैतिक विचारांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जात आहे. स्पर्धा म्हटले की, हे चालायचेच हा सोयीस्कर तर्क त्यासाठी दिला जातो. धार्मिक क्षेत्रदेखील या वैचारिक प्रदूषणातून मुक्त नाही. माझाच धर्म चांगला, माझाच देव मोठा, हे सांगण्याची अहमहमिका धार्मिक भेदभावाच्या भिंतींना अधिकच मजबूत करीत आहेत आणि आतातर हा वैचारिक बुध्दीभेद जाती – पोटजातीच्या सुक्ष्मातिसुक्ष्म पातळीवर पोहचला आहे.
ज्या वेगाने हे वैचारिक प्रदूषण समाजाला ठाासत आहे तो वेग निश्चितच भयावह आहे. हा वेग असाच कायम राहीला तर लवकरच नैतिक – अनैतिक, उचित – अनुचित, सुष्ट – दुष्ट असल्या भेदाभेदांना मुठमाती मिळेल. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा जीवशास्त्रीय नियम वेगळ्या अर्थाने प्रभावी ठरेल. इतरांना जगवत जगणे या ‘बुरसटलेल्या’ विचाराला स्थानच उरणार नाही. हे भविष्याचे भयावह चित्र नाही, सध्याही तीच परिस्थिती आहे. स्पर्धा निकोप राहिलीच नाही. ‘मी आणि माझे’ हे वर्तुळ इतके आत्मकेंद्रित झाले आहे की, इतरांचे न्याय्य हक्क मान्य करायलाच कोणी तयार नाही. पोट भरण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. अधिकाधिक भौतिक सुख – सुविधा मिळविण्याचा प्रत्येकाचा हक्क देखील डावलता येणार नाही, परंतु हे करताना इतरांच्या हक्कांचा सन्मान राखल्या गेला पाहिजे. अलीकडे तसे होताना दिसत नाही. मिळविणे आणि ओरबाडणे यातला भेदच नष्ट झाला आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर मी आधी म्हटल्याप्रमाणे कारल्याचा वेल लावून काकडीची अपेक्षा करता येणार नाही. वेल काकडीचाच लावावा लागेल आणि ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वैचारिक प्रदूषण थांबवायचे असेल तर वैचारिक परिवर्तन घडवून आणावे लागेल. अर्थात हे काम सोपे नाही. पण अगदीच अशक्य नाही.
आपली कृती म्हणजे आपल्या विचारांचे प्रतिबिंब असते, हे विसरता येणार नाही. एखादी व्यक्ती चुकीची असेल किंवा सरधोपट भाषेत दुष्ट असेल तर त्यात त्या व्यक्तीचा फारसा दोष नसतो, दोष त्या व्यक्तीला तसे घडविणाऱ्या विचारांचा असतो आणि हे विचार त्याला त्याच्या अवतीभवती नांदणाऱ्या समाजानेच पुरविलेले असतात. वृक्ष गोड फळे देणारा असेल, मात्र फळे किडलेली येत असतील तर ती फळे तोडून बाजूला फेकणे हा उपाय नव्हे तर त्या किडलेल्या फळाची उत्पत्ती करणाऱ्या झाडातील दोष नाहीसा करावा लागेल. आज जर समाजात आसूरी शक्तीचे प्राबल्य वाढले असेल तर (आणि ते वाढलेलेच आहे.) निश्चितच ज्या विचारावर समाज पोसल्या जात आहे त्या विचारातच दोष असावा.
समाजाचे वैचारिक प्रबोधन करणाऱ्या माध्यमांची संख्या आता बरीच वाढली आहे. पूर्वीच्या काळी कथा, कीर्तन, प्रवचन आणि फार झाले तर नाटकं एवढ्याच पुरते हे माध्यम मर्यादित होते. मात्र आता ही माध्यमे अडगळीतच पडल्यासारखी झाली आहेत आणि अस्तित्वात असली तरी त्यांनीही बदलत्या परिस्थितीशी समन्वय साधत आपले स्वरूप खूप उथळ करून घेतले आहे. मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांनी आता आपला पगडा समाजावर बसवला आहे. वैचारिक प्रबोधनावर त्यांची एकाधिकारशाही स्थापित झाली आहे आणि दुर्दैवाने ही माध्यमे आपल्या क्षमतेचा कमाल उपयोग करीत निखळ चंगळवादी, भोगवादी, उच्छृंखल विचार सातत्याने पेरत आहेत. लहान मुलांच्या संवेदनशील मनावर या विचारांचा तत्काळ परिणाम होतो. हे विचार घेऊन जेव्हा ही मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा कशी करता येईल? त्यामुळे सुदृढ, निकोप समाज घडवायचा असेल तर आधी हे वैचारिक प्रदूषण थांबवावे लागेल, पेरणी योग्य करावी लागेल. पीक हाती आल्यावर ओरडण्यात काही अर्थ नाही. शरीरशास्त्र तर असे सांगते की, अगदी गर्भावस्थेपासून मुलं संस्कार ठाहण करीत असतात. तेव्हापासूनच त्यांच्या मनात विकृत विचारांचे विष भिनत असेल तर दोष त्यांचा कसा असेल? अगदी मुळापासून सुरवात करावी लागेल. हे एक आव्हान आहे. समाजशास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी त्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे झाले आहे. सर्वसामान्यांची जबाबदारी देखील तेवढीच मोठी आहे. या प्रदूषणाला कुठेतरी आळा घालावाच लागेल. केवळ आळा घालूनच थांबता येणार नाही, हे प्रदूषण पूर्णत: संपवावे लागेल. अन्यथा एक दिवस हिंदुस्थानच्या ह्या मानवी सभ्यतेचा, संस्कृतीचा गौरव असणारी समाज व्यवस्थाच नष्ट होईल.
— प्रकाश पोहरे
प्रकाशन दिनांक :- 11/05/2003
Leave a Reply