प्रकाशन दिनांक :- 09/05/2004
हिंदू संस्कृतीत पुनर्जन्माच्या सिद्धांताला मान्यता आहे. या जन्मातील बऱ्यावाईट कर्मानुसार मनुष्याला पुढील जन्म प्राप्त होत असतो. मागील जन्मात केलेली पापं फेडायची आणि शक्य झाल्यास काही पुण्य संचय करून पुढील जन्मातील जीवन अधिक सुखदायक व्हावे याची तरतूद करायची, असा ढोबळ हिशोब या सिद्धांतामागे आहे. या सिद्धांतावर श्रद्धा असणाऱ्यांची फार मोठी संख्या हिंदू धर्मात आहे. त्यामुळे प्रत्येकजण जमेल त्या मार्गाने पुण्यप्राप्तीचा प्रयत्न करताना दिसतो किंवा आपण जे काही करतो ते पुण्याचेच आहे, हे सिद्ध करण्याचा प्रत्येकाचा खटाटोप चालला असतो.
पुनर्जन्माचा हा सिद्धान्त किंवा गतजन्मातील पाप-पुण्याच्या हिशेबानुसार या जन्मात मिळणारे सुखाचे परिमाण मान्य करायचे झाल्यास भारतातील 80 टक्के लोकांनी मागील जन्मात केवळ पापच केले, असे म्हणायला भरपूर आधार आहे. या 80 टक्क्यांमध्ये 70 टक्के लोक शेतकरी वर्गातले आहेत तर 10 टक्के छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यातले. या जन्मात या लोकांच्या वाट्याला आलेले आयुष्य बघता, त्यांनी मागील जन्मात घोर पाप केले हे वेगळे सिद्ध करावे लागत नाही. प्रत्येकाच्या पाप-पुण्याचा हिशोब ठेवून त्याची पुढील जन्मात कुठे रवानगी करायची, हे ठरविणारे स्वतंत्र ‘डिपार्टमेंट’ देवलोकात असावे. या डिपार्टमेंटची कार्यक्षमता मात्र पृथ्वीवरील आणि त्यातही भारतातील सरकारी डिपार्टमेंटच्या तुलनेत खूपच सरस असावी. गोपनीयतेच्या कायद्याची तर तिथे फारच कडक अंमलबजावणी होत असल्याचे दिसते. इथे लोकांचे अवघे आयुष्य टाचा घासत, झिजून मरण्यात जाते, परंतु त्यांना शेवटपर्यंत आपल्याला ही कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिली जात आहे ते कळतच नाही. मृत्यूलोकात गुन्हेगाराच्या दर्जानुसार तुरूंगात त्यांची वेगवेगळी व्यवस्था केली जाते, या व्यवस्
थेलाच आदर्श मानून देवलोकातही कारभार पाहिल्या जात असावा. पृथ्वीवरील संगणकयुगाची बाधा स्वर्गलोकातही झाली असावी. त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागत नाही आणि निर्णयात अचूकताही कमालीची असते, असे
दिसते. एखाद्या व्यक्तीचे या जन्मातील
जीवित कार्य संपले की, ताबडतोब त्याचा ‘रेकॉर्ड’ तपासला जात असावा, अवघ्या काही सेकंदात हिशोब होत असावा आणि पुढील जन्म कुठे घ्यायचा याचा निर्णयसुद्धा लगेच होत असावा. या टेबलावरून त्या टेबलावर फायलींचा होणारा प्रवास तिथे नसावा. त्या व्यक्तीने भरपूर पुण्य केले असेल, अगदी कणभरसुद्धा पाप त्याच्या रेकॉर्डवर नसेल तर त्याला ताबडतोब अमेरिकेत जन्म घ्यायचे फर्मान दिले जात असावे. थोडेफार पाप केले असेल तर इतर विकसित राष्ट्रांमध्ये पापाच्या गुणात्मक दर्जानुसार त्याची रवानगी होत असावी. स्वर्गाच्या त्या कार्यालयात केवळ पापी लोकांसाठी मात्र एक वेगळा कक्ष असावा. पृथ्वीवरील भारत या देशाबद्दल अगदी खडा न् खडा माहिती असलेल्या अधिकाऱ्याचीच बहुधा त्या कक्षात नेमणूक होत असेल. त्यासाठी बरेचदा भारतातूनच काही प्रामाणिक नोकरशहांना तातडीने पापाचरण करण्यात येत असावे. अलीकडील काळात या कक्षाचे काम खूप वाढल्याचे ऐकीवात आहे. आपण करतो ते पुण्य असे समजून सर्रास पाप करणाऱ्याची संख्या खूप वाढल्यामुळे असेल कदाचित. या लोकांची तिथे व्यवस्थित वर्गवारी केली जात असावी, पापाचे प्रमाण आणि स्वरूप नीट तपासले जात असावे. ‘अ’ दर्जाच्या पापी लोकांना (सौम्य पापी) भारतात जन्माला तर घातले जाते, परंतु भविष्यात त्यांना सरकारी नोकरी मिळेल याची आधीच तरतूद केली जाते. काहींना राजकारणात कारकीर्द करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या जाते. परंतु बरेचसे पापी असे असतात की, त्यांना कुठलीही दयामाया दाखविणे शक्य नसते. अशा लोकांना सरळ एकतर शेतकरी कुटुंबात जन्म दिल्या ज
ातो किवा त्याच्या नशिबात उद्योजक होण्याचे लिहिले जाते. त्यातले काही सुदैवी पापी बागायती शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेण्यात यशस्वी होतात, अर्थात त्यासाठी त्यांना पृथ्वीवरचा अनुभव कामास येत असावा. साहेबांच्या नादी न लागता तिथल्या बाबूला पटवून ही ‘अॅडजस्टमेंट’ केली जात असावी. ‘बाबू’ ही जातच अशी आहे की, पृथ्वीवर असो अथवा स्वर्गात, त्याच्या ‘अॅडजस्टमेंट’ या मूळ प्रवृत्तीत काहीच फरक पडत नाही. ज्या लोकांना हे ‘अॅडजस्टमेंट’ जमत नाही, त्यांच्या नशिबात कोरडवाहू आणि त्यातही विदर्भ-मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्म घेणे लिहिल्या जाते. उरल्यासुरल्यांना उद्योजक बनायला भाग पाडले जाते. आजकाल नरकयातना देण्याची जागा स्वर्गस्थ देवांनी बदलली आहे. भारतातील दुष्काळी प्रदेश आणि त्या प्रदेशातील शेतकऱ्यांची घरे इथे ‘नरकयातना’ वर्ग चालविले जातात. यातील विनोद किंवा अतिशयोक्तीचा भाग वगळला तरी भारतातील शेतकरी आणि उद्योजकांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
शेतकरी आणि उद्योजकाचे जीवन कुठल्या तरी घोर पापाची शिक्षा वाटावी इतके दुसह्य झाले आहे. नरकयातनाच त्यांच्या वाट्याला आहेत. त्यातही दुर्दैवाची बाब ही आहे की, या लोकांचा कोणताही दोष नसताना यांच्या वाट्याला हे दुर्दैव आलेले आहे (आणि म्हणूनच त्याचा संबंध नाईलाजाने पूर्व जन्मातील पापाशी जोडावा लागतो.) इतर देशातील व्यवस्थेच्या तुलनेत आमच्याकडे असलेल्या व्यवस्थेचा विचार केला तर दिसून येणाऱ्या प्रचंड तफावतीतच या 80 टक्के लोकांच्या दुर्दैवाचे कारण दडल्याचे स्पष्ट आहे. सरकार नामक सर्वोच्च संचालक असलेल्या संस्थेची दिशाहीन, कुठलाही पाया नसलेली धोरणे आणि या धोरणांना स्वत:च्या अक्कल हुशारीने अधिकच नासविणारी नोकरशाही, या 80 टक्के लोकांना नरकाच्या दारात उभे करीत आहे. अनेक ऐतखाऊंची
पोटे तुडूंब भरणारा शेतकरी स्वत: उपाशी मरत असेल तर याचा स्पष्ट आणि सरळ अर्थ हाच आहे की, ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच फांदी तोडणाऱ्या विद्वानांच्या तंत्राने सगळा कारभार सुरू आहे. आम्हाला एक विकसित राष्ट्र म्हणून उभे व्हायचे असेल तर सर्वात आधी आपल्या धोरणांचे पुनर्विलोकन आवश्यक आहे. प्रयत्न योग्य दिशेने झाले की नाही, हे प्रयत्नांच्या परिणामावरून कळते. आज परिणाम समोर आहे. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ज्या दोन स्तंभावर उभी आहे
त्या शेतकरी आणि उद्योजकांची अवस्थाच आज आसन्नमरण झाली आहे.
याचा अर्थ आपल्या आजवरच्या प्रयत्नांची दिशा साफ चुकली. एकवेळ हे लक्षात आल्यावर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ताबडतोब निर्णय घेणे रास्त ठरते. परंतु आमच्या राज्यकर्त्यांना अद्यापही जाग आलेली दिसत नाही. आमचा सगळा भर उत्पादन वाढविण्यावर आहे. उत्पादन वाढविणाऱ्याचे उत्पन्न मात्र वाढताना दिसत नाही. हे उत्पन्न वाढते कुणाचे? हा पैसा जातो कुठे? कष्ट इथल्या शेतकऱ्यांनी, उद्योजकांनी करायचे आणि फळे मात्र विदेशी कंपन्यांनी चाखायची, असे तर होत नाही ना? जर तसे होत असेल तर भारतात शेती करणे किंवा उद्योगधंदा उघडणे म्हणजे एकप्रकारची शिक्षा भोगणेच म्हणावे लागेल.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply