नुकतेच घरी मंगलकार्य झाले. मुलाच्या लग्नाला आणि स्वागत समारंभाला लोकांची खूप गर्दी झाली होती. आनंद झाला, समाधान वाटले. या निमित्ताने अनेक सुहृदांच्या भेटी झाल्या, बोलणे झाले, खूप बरे वाटले. लग्नदेखील अगदी मनासारखे थाटामाटात पार पडले. या निमित्ताने किमान चाळीस हजार लोक अमरावतीला लग्नाला येऊन, भेटून गेलेत. दोन दिवसानंतर अकोल्यात स्वागत समारंभालाही 7-8 हजार लोकांची गर्दी झाली होती. लोक नवदांपत्याला आशीर्वाद द्यायला येत होते, सोबत लहान-मोठी भेटवस्तु असायची. खरे तर त्याची काही गरज नव्हती. परंतु एखाद्याला भेटायला जाताना, एखाद्याचे स्वागत करताना आपले हात रिकामे असू नये, अशी बहुतेकांची भावना असते. परंतु तरीही लोकांच्या भेटवस्तू स्वीकारताना संकोच होत होता. पुष्पगुच्छांचा तर अक्षरश: ढीग लागला होता. एवढ्या पुष्पगुच्छांचे काय करावे हा प्रश्नच पडला. फुले नाशवंत असतात, दुसऱ्या दिवशी कामात येत नाही. त्यामुळे इतकी महागडी पुष्पगुच्छे अक्षरश: वाया जात होती. हे सगळं पाहून अशा प्रसंगात भेटवस्तू देताना लोकांनी दिखाव्याला फाटा देत ज्याला काही भेटवस्तू द्यायच्या आहेत त्या त्याच्या उपयोगात पडतील अशा असाव्या, याची दक्षता घेतली किंवा सरळ पाकिटात पैसेच घालुन दिलेत तर? असा विचार मनात आला. त्या दिवशी जवळपास दोन हजार पुष्पगुच्छ येऊन पडलेत. पुष्पगुच्छांचा आजचा बाजारभाव लक्षात घेता किती तरी पैसे वाया गेले, असेच म्हणावे लागेल. अर्थात त्या पुष्पगुच्छांमागच्या भावनांचा अपमान करायचा नाही, परंतु या भावना अधिक चांगल्याप्रकारे पोहचवता येतात. एकतर अशा प्रसंगात भेटवस्तु वगैरे देण्याचा बडेजाव असायलाच नको. त्यामुळे उगाच स्पर्धा वगैरे निर्माण झाल्यासारखे वाटते. तुम्ही काय दिले, त्यांनी काय दिले अशाप्रकारचे नाहक प्रश्न विचारले जातात. कुणी कोणती भेटवस्तु दिली यावरून कुणाचे किती प्रेम आहे, हे ठरत नसते. स्वत:ची अनेक कामे बाजुला सारून व प्रसंगी प्रवासाचा खर्च करून तर तो आर्वजून सभारंभाला आला हे महत्वाचे असते. परंतु आपल्याकडे विनाकारण भेटवस्तुंचा संबंध प्रतिष्ठेशी जोडला जातो. बऱ्याच लग्नात आमंत्रण देतानाच आहेर किंवा भेटवस्तु आणू नये, असे स्पष्ट शब्दात पत्रिकेतच लिहिले असते. ही अतिशय चांगली प्रथा आहे. तरीही कुणाला काही द्यायची इच्छा असलीच तर त्यांनी सरळ रोख पैशाच्या स्वरूपात पाकीट भेट द्यावे. वधू वरांना काय करायचे ते ठरवतील. आम्हाला अशाप्रकारच्या रोख भेटीची अपेक्षा नव्हती आणि गरजही नव्हती, आणि ईश्वरकृपेने गरजही नव्हती, म्हणून मी हे अधिकारवाणीने म्हणू शकतो इतर व्यत्त*ी मात्र कुठे सांगावे आणि कुणाला सांगावे आणि बरे दिसते का? इत्यादी बाबीमध्ये अडकुन पडतात आणि हया अश्या पद्धतीच्या अनेक गोष्टी वर्षानुवर्ष तश्याच चालत राहतात किंवा त्याला अजुनच वेगळे स्वरूप दिले जाते त्यामुळे कुणीतरी बोलल्याशिवाय विचार चक्र सुरू होणार नाही म्हणुनच मी हे मांडत आहे. फुलांची भेट दिल्याने फुलांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत होऊ शकते, असा तर्क समोर केल्या जाऊ शकतो. परंतु शेतकऱ्यांना फुलांची शेती करायचीच असेल तर अश्या दुसऱ्या दिवशी कोमेजून जाणाऱ्या फुलांची शेती न करता गुलाब, जरबेरा, निशिगंध अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या फुलांचे उत्पादन त्यांनी घ्यावे आणि ते थेट पुणे, नाशिक, मुंबईच्या बाजारपेठांमध्ये पाठवावे, विदर्भासारख्या आर्थिकदृष्टया मागास भागात होणारे लग्नसमारंभ, वाढदिवस वगैरे डोळ्यासमोर ठेवून नाजुक फुलांची शेती करण्याच्या फारसे भानगडीत पडू नये.
लग्नात होणारा खर्च वगैरेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. आम्ही हे लग्न थाटामाटात केले, आणि ते का करू नये? शेवटी अशा मंगलप्रसंगातच सगळ्यांचा आनंद शिगेला पोहचत असतो. ह्या एवढ्या धकाधकीच्या काळातही कुटुंबीय,नातलग गोळा होतात, अनेक आप्तस्वकीयांच्या व जुन्या मित्रांच्या भेटी होतात, दोन घराण्यांचे ऋणानुबंध जुळतात, सगळीकडे आनंदी वातावरण असते, हा आनंद थाटामाटात साजरा केला तर बिघडते कुठे? घरच्या मंडळीच्या इच्छेनुसार चांगला पाच दिवस विवाह सोहळा चालला आणि अगदी मेंहदी, हळद, वरात, अहेर मान वगैरे सर्व बाबींवर आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे खर्च केला. प्रत्येकाने तो करायला हवा. शेवटी आयुष्यात करायचे काय ? आपल्या घरच्या अशा मंगलप्रसंगात सहभागी होण्याची संधी आयुष्यात नेहमी नेहमी येत नाही. शेवटी ऐपतीप्रमाणे खर्च करणे आणि उधळपट्टी करणे यात मूल्यात्मक अंतर आहे. माझी मिळकत शंभर रूपये असेल आणि मी पंचवीस रूपये खर्च करीत असेन तर ती उधळपट्टी ठरू शकत नाही. हं, माझी कमाई शंभर रूपये असताना मी उधार-उसनवारी करून दीड-दोनशेचा खर्च करीत असेन तर मात्र ती उधळपट्टी ठरेल. त्यामुळे आमच्याकडच्या लग्नातील थाटमाटाला उधळपट्टी किंवा बडेजाव म्हणता येणार नाही आणि शेवटी जो काही खर्च झाला तो कॅटरर्स, डेकोरेशनवाले, साऊंड सिस्टिमवाले, बिछायत केंद्र, फोटोठााफर, वाजंत्री आदिंवरच झाला. हा पैसा त्यांच्यामार्फत मजुर व कारागीरांपर्यंत पोहचला. त्यांचा धंदा झाला. हया सगळयांना फाटा दयायचा तर मग सरळ रजिस्टर लग्न करावे किंवा लोककवी विठ्ठल वाघांनी त्यांच्या मुलांची केली तशी अगदी जवळची 50-100 नातलग मंडळी जमा करून लग्न करावे आणि एक दिवसात मोकळे व्हावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. मात्र सगळ्यांनी जर रजिस्टर लग्नच करायची ठरवली तर वर उल्लेख केलेल्या लोकांच्या धंद्याचे काय होईल? आणि आनंदाचे काय ? शेवटी पैसा ‘सक्र्यूलेट’ व्हायलाच हवा. प्रत्येकाने पैसा केवळ जमा करून ठेवतो म्हटले तर मग पैसा कमवायचा कशाला असा प्रश्न उपस्थीत होइल, असो.
बरेचदा भेटवस्तुंचा एखादा ट्रेण्ड निर्माण होतो, काही काळ तो टिकतो. त्यामुळे एकाच प्रकारच्या भेटवस्तुंची गर्दी झालेली दिसून येते. काही वर्षांपूर्वी ‘वॉल क्लॉक’ भेट देण्याचा जणू रिवाजच पडला होता. परिणामी नवदांपत्याकडे भांड्यांपेक्षा घड्याळीच अधिक गोळा झाल्याचे दिसून यायचे. गणपतीचे प्रे*म केलेले फोटो, किचन सेट आदी प्रकारांनीही एक काळ गाजवला. सध्या ‘बुकें’चा जमाना आहे. मात्र या भेटवस्तु निरर्थक ठरतात कारण बुके तर दुसऱ्या दिवशीच फेकून द्यावा लागतो. विषय माझा म्हणुन मी म्हणत नाही हे कृपया समजुन घ्या आणि विचारचक्र चालवा. शेवटी कुणीतरी बोलायला हवेच. कुठल्याही समारंभात जाणे आणि सदिच्छा देणे महत्वाचे असते ज्यामुळे ऋृणानुबंध घट्ट होतात, भेटवस्तु दिल्यानेच संबंध वाढतात असे नव्हे तर आशीर्वाद दिल्याने ते वृद्धींगत होतात हे समजुन घेणे महत्वाचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांनी भेटवस्तु देतांना परीस्थितीनुसार एकतर रोख रक्कम द्यावी किंवा संसारोपयोगी वस्तू द्यायला हव्यात ज्यामुळे अशा समारंभामुळे आलेला आर्थिक ताण आयोजनकर्त्यांना पेलण्यास हातभार लागतो. यजमानाची परीस्थिती पाहून अगदी गहू, तांदूळ, साखर दिली तरी चालेल कारण ते किमान उपयोगी तरी पडतात. दरवर्षी नित्यनेमाने येणाऱ्या 17 मार्च हया माझ्या वाढदिवशी तर हार आाणि पुष्पगुच्छांचा महापुर आलेला असतो. हार, पुष्पगुच्छांऐवजी वर्धेच्या गांधी आश्रमात तयार होणारे सुताचे हार किंवा सरळ कापडी दुपट्टे द्यायला काय हरकत आहे? आणि ह्यावर्षी मी तसेच करायचे ठरविले आहे. वाटल्यास वर्ध्याच्या मंडळींना तसा स्टॉल निशांत टॉवरलाच लावायला सांगेन. किमान त्यामुळे ते सुताचे हार किंवा कापडी दुपट्टे ज्या कापसापासुन बनतात त्या शेतकऱ्यांच्या कापसाला तरी भाव येईल आणि असे सुताचे हार भरपूर जमा व्हायला लागले म्हणजे एखाद्या खादी हातमाग संस्थेला ते दान तरी देता येतील, आणि ती संस्था गरजुंकरिता कापड तरी तयार करेल. पैसा खर्च करतांना त्या मधुन सक्र्यूलेशन वाढेल याची काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे. त्यामुळेच नाशिवंत वस्तू भेट स्वरूपात देण्यापेक्षा ज्या वस्तुंचा पुन्हा-पुन्हा उपयोग होऊ शकतो, अशा वस्तू भेटीदाखल देणे अधिक योग्य होईल. लग्न किंवा कुठलेही घरचे कार्य असले की अशा अनेक गोष्टींचे आपसूक ज्ञान होते.
लग्नात वधू किंवा वराच्या मातापित्यांची काय धावपळ उडते, हा अनुभव प्रत्यक्ष घेतल्याशिवाय समजूच शकणार नाही. अगदी आखीव-रेखीव नियोजन करून देखील यावेळी काही त्रूटी राहूनच गेल्या. अगदी जवळच्या लोकांना आमंत्रणपत्रिका द्यायचे राहून तरी गेले किंवा आंगडीयावाल्याच्या चालुगिरीमुळे पत्रिका पाठवुनही अनेकांना मिळाल्याच नाहीत. आमच्यावरील स्नेहापोटी पत्रिका न मिळतादेखील बरीच मित्रमंडळी लग्नाला, स्वागत समारंभाला उपस्थित राहिली. परंतु ही खंत आमच्या मनात आहेच. पुढच्या वेळी अशी चुक होणार नाही याची काळजी घेणे एवढेच आपल्या हाती. शेवटी काही धडे चुकल्यावरच शिकायला मिळतात हेच खरे. असो, मुळ मुद्दा हा आहे की लोकांनी भेटवस्तु देताना आणि देणे गरजेचे असेल तरच, शक्यतो नाशवंत वस्तुंचा वापर करू नये. फुले देवांसाठी असतात, देवांच्या चरणावर वाहिली तरच त्यांचे निर्माल्य होते. ती तिथेच वाहायला हवीत कारण तिथेच ती शोभतात आणि शेतकऱ्यांनी किंवा बुकेवाल्यांनी फुलांचा व्यापारच करायचा असेल तर मोठे मार्केट शोधावे, दीर्घकाळ टिकणाऱ्या, सुवास नसला तरी सौंदर्य टिकून राहणाऱ्या फुलांचे उत्पादन करावे आणि ते निर्यात करावेत. लोकांनी प्रेमाने दिलेली फुले दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या ढिगावर जाताना पाहुन मनाला खूप क्लेश होतात, परंतु करणार तरी काय? असा प्रसंग आपणच कुणावर येऊ दिला नाही तर प्रत्येकाने जर असा विचार केला की ही सुधारणा माझ्यापासुन नव्हे तर पुढच्या व्यत्त*ीपासुन व्हावी तर बदल हा कधी होणारच नाही. शिवाजी जन्माला यावा असे प्रत्येकालाच वाटते, परंतु तो शेजारच्या घरात ही मानसिकता सोडल्याशिवाय समाजपरीवर्तन शक्यच होणार नाही.
— प्रकाश पोहरे
9 रविवार,डिसेंबर 2007
Leave a Reply