नवीन लेखन...

सज्जनांनो, आग लावा व्यवस्थेला!




प्रकाशन दिनांक :- 04/05/2003

कलियुगाला प्रारंभ केव्हा झाला याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते भारतीय युद्धाच्या (संदर्भ – महाभारत) प्रारंभापासून कलियुगाला सुरूवात झाली तर बरेच लोक श्रीकृष्णाच्या निर्याणापासून कलियुग प्रारंभ झाल्याचा दावा करतात. भीम आणि दुर्योधन यांच्यातील अंतिम गदायुद्धात भीमाने श्रीकृष्णाच्या निर्देशावरून दुर्योधनाच्या मांडीवर गदाप्रहार केला. त्यावेळी प्रचलीत असलेल्या नियमानुसार गदायुध्दात कंबरेखाली आघात करणे निषिध्द होते. भीमाने सरळ सरळ नियमाचा भंग केल्याचे पाहून बलराम खवळले आणि आपला नांगर उगारून भीमाच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी त्यांना मधेच अडवित श्रीकृष्णाने, आता लवकरच कलियुगाला प्रारंभ होत आहे आणि कलियुगात हे सगळे चालणारच, असे सांगत त्यांची समजूत काढली, असा महाभारतात उल्लेख आहे.
श्रीकृष्णाच्या निर्याणानंतर कलियुगाला प्रारंभ झाला, असे मानणाऱ्यांच्या दाव्याला महाभारतातील हा उल्लेख मजबूती प्रदान करतो. असो, सांगायचे तात्पर्य हेच की, स्वत: भगवान श्रीकृष्णांनी कलियुगात अनीतीलाच प्रतिष्ठा प्राप्त होईल अशी नि:संदिग्ध ग्वाही दिल्यानंतर इतरांनी नीती – अनीतीची चाड बाळगण्याचे काही कारणच नाही. शिवाय श्रीकृष्णाचे अवतारकार्य संपून किमान पाच हजार वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे अनीती आणि अनीतीच्या धर्माचे पालन करणारे किमान पाच हजारपट अधिक बलिष्ठ झाले आहेत. आज सर्वत्र दुर्जनांचे, दुष्टशक्तीचे प्राबल्य आढळून येते ते कदाचित त्याचमुळे. परंतु तरीही प्रत्येक युगात सत्प्रवृत्तीचे लोक राहत आले आहेत. रावणाच्या दरबारात बिभीषण होता, कौरवांना शहाणपणाच्या चार गोष्टी सांगण्याची हिंमत करणारा विदूर होता. या बिभीषण, विदूर प्रवृत्तीचा वारसा आज या कलियुगात देखील जपल्या गेला आहे; पर
तु या बिचाऱ्या अल्पसंख्य समुदायाची अवस्था फारच वाईट आहे. सज्जन म्हणून त्यांना मौखिक मान – सन्मान तर दिला जातो, परंतु प्रत्यक्ष समाजात वावरतांना त्यांना अगदी खड्यासारखे बाजूला सारले जाते. खरेतर इथली व्यवस्थाच अशी

निर्माण करण्यात आली आहे की,

सज्जनता जपून पोट भरणे कुणालाही शक्य नाही. अगदी कुठलेही क्षेत्र असो, तुम्ही सज्जन असाल तर तुम्हाला त्या क्षेत्रात टिकणे ‘मुश्किल ही नहीं, नामुमकिन’ असते. राजकारणाचाच विचार केला तर काय दिसून येते? सज्जनांसारखी संतकोटीतील माणसं दूर राहिलीत, साध्या जेमतेम प्रामाणिक माणसाची सुध्दा राजकारणात पाऊल टाकायची बिशाद नाही. इथे फुलनदेवी सहज खासदार होऊ शकते, परंतु आपले अवघे आयुष्य लोकसेवेसाठी वेचणाऱ्या सुदामकाका देशमुखांसारख्या माणसाला आपली अमानत वाचवता येत नाही. निवडणुकीची किंवा राजकारणाची यंत्रणाच अशा पध्दतीने उभी करण्यात आली आहे की, कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनीच या भानगडीत पडावे. राजकारणच नव्हे तर इतर सर्वच क्षेत्रात अशीच अवस्था आहे. शाळेत प्रामाणिकपणे शिकविणाऱ्या, शिकवणी वर्गातून पैसे उकळणे पाप समजणाऱ्या, ‘गुरूजीला’ शेवटी काय मिळते? आपल्या पुढच्या पिढीसाठी कर्जाचे हप्ते वगळता ते काय मागे ठेवू शकतात? त्याचवेळी नव्यान्नव टक्के असलेल्या ‘सर’ या वर्गवारीत मोडणाऱ्या शिक्षकांचे जीवनमान मात्र अतिशय उंचावलेले दिसते. फ्लॅट, गाडी, बँक बॅलन्स आणि इतर सर्व सुविधा अल्पावधीतच त्यांच्या दिमतीला हजर होतात. हे दृश्य पाहिल्यावर कोणत्या ‘गुरूजीला’ आपण ‘गुरूजी’ राहावे असे वाटेल? आयुष्यभराचा वैताग हीच सज्जनपणाची मिळकत असेल तर ही सज्जनता उराशी कवटाळून बसण्यात काय हशील? त्यामुळे शिक्षणासारख्या एकेकाळी पवित्र समजल्या जाणाऱ्या व्यवसायातूनही सज्जन लोक हद्दपार झाले आहेत.
वैद्यकीय
्षेत्रात काही वेगळी परिस्थिती नाही. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून भ्रष्टाचार सुरू होतो. निव्वळ गुणवत्तेला कोणी विचारत नाही. लाखो रुपयांची देणगी प्रवेशासाठी देणाऱ्या भावी डॉक्टरांकडून कोणत्या नीतिमत्तेची अपेक्षा बाळगणार? रोगी दवाखान्यात आला की, त्याला कशाप्रकारे ‘फाडता येईल’, हेच बघितले जाते. एखाद्या डॉक्टरने अगदी प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतो म्हटले तर त्याचीही अवस्था त्या ‘गुरूजी’ सारखीच होईल. उद्योजक – व्यावसायिकांची कथा आणि व्यथा वेगळी नाही. सरकारी नियम आणि कायद्यांचे सचोटीने पालन करायचे ठरविल्यास कोणताही उद्योग किंवा व्यवसाय उभा राहूच शकत नाही. उलट असेही म्हणता येईल की, उद्योजक – व्यावसायिकाने आपल्या पायावर उभे राहूच नये, अशाप्रकारेच सरकारी कायदे निर्माण करण्यात आले आहेत. जर यदाकदाचित एखाद्याने प्रामाणिकतेचा वसा जपायचाच ठरवला तर मार्केटींग क्षेत्रातील अनीती, विषाक्त स्पर्धा त्याच्या हातात कटोरा दिल्याशिवाय राहणार नाही. या व्यावसायिक मंडळीचे सोडून द्या, सरळमार्गाने जाणाऱ्या साध्या माणसालाही प्रामाणिकतेचे ‘ओझे’ घेऊन चालणे दुरापास्त झाले आहे. चालू वर्षीचा जिवंत असल्याचा दाखला दिल्यावर मागील वर्षी जिवंत असल्याचा दाखला न जोडल्यामुळे निवृत्तीवेतन नाकारणारी सरकारी यंत्रणा ज्या देशात आहे त्या देशात सज्जनांना राहण्याचा हक्कच कुठे उरतो?
सांगायचे तात्पर्य एवढेच की, आज आपल्या देशाची अवस्था सज्जनांना चालते व्हा, असा इशारा देणारी ठरली आहे. ही अशी अवस्था का निर्माण झाली याचा शोध घेण्यास, थोडे थांबून चिंतन करण्यास कोणालाच फुरसत नाही. प्रत्येक जण प्रवाहपतीत होऊन जगण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे जी काही मुठभर मंडळी अद्यापही सज्जन बनून जगत आहेत, ती मंडळीसुध्दा आता मोठ्या नालीत आपला इवलासा प्रवाह विलीन करीत

आहेत. हा संपूर्ण दोष यंत्रणेचा आहे. सामाजिक, राजकीय आणि अगदी कौटुंबिक स्तरावर देखील स्वार्थ साधणे हेच एकमेव ध्येय उरले आहे. हा स्वार्थ साधताना नीतिमत्तेची चाड बाळगण्याची काही गरज राहिलेली नाही. सगळेच स्वार्थी असल्याने कोणी कोणाकडे बोट दाखवायचे, हा प्रश्नच निकालात निघाला आहे. काही वेडे लोक दूरचा विचार करताना प्राप्त परिस्थितीबद्दल काळजी व्यक्त करतात, परंतु त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच सवड नाही. शेवटी जगणे आणि आपल्या दृष्टीने चांगल्याप्रकारे जगणे अधिक महत्त्वाचे ठरते. उदात्त ध्येय, उच्च जीवनमूल्ये वगैरे गोष्टी आता केवळ पुस्तकाच्या पानावरच उरल्या आहेत. या

मूल्यांची बाजारातील किंमत शून्य आहे. तुमच्या सज्जनतेला, प्रामाणिकपणाला बाजारात कोणी

विचारीत नाही. तेव्हा जगायचे असेल तर सगळं काही गुंडाळून ठेवा आणि ते जमत नसेल तर मरणाची वाट पाहत फरफटत, रखडत जगा. निर्णय तुमच्या हाती आहे. तुमच्या विवेकी मनाला हे पटत नसेल तर उठा! क्रांतीची मशाल हाती घ्या आणि बदलून टाका ही सारी व्यवस्था! आग लावा त्या व्यवस्थेला ज्यात माणसाला जगण्यासाठी जनावराच्या पातळीवर उतरावे लागते!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..