नवीन लेखन...

सभ्यता महत्वाची की लैंगिक शिक्षण?




सध्या महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण द्यावे की देऊ नये, या विषयावर बरेच रणकंदन सुरू आहे. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंडळाने या विषयाच्या संदर्भात प्रकाशित केलेल्या पुस्तकांवर बंदी आणली आहे. राज्य सरकारची ही कृती योग्य की अयोग्य हा आता चर्चेचा मुद्दा ठरू पाहत आहे. काही बुद्धिवंत किंवा स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारे शालेय विद्यार्थ्यांना या विषयाचे शिक्षण दिल्याच गेले पाहिजे, या भूमिकेवर ठाम आहेत, तर या शिक्षणाचा काही लाभ होण्यापेक्षा त्याचे गैरपरिणामच अधिक होतील, असे काहींचे मत आहे. थोडक्यात या विषयावर प्रचंड मतभेद आहेत. आपल्या समाजात लैंगिकता हा विषय कधीच सार्वजनिक चर्चेचा नव्हता. या विषयाने ‘बेडरूम’चा उंबरठा कधी ओलांडला नाही. हा विषय शिकण्याचा किंवा शिकविण्याचा आहे, असे कधी कुणाला वाटले नाही आणि त्याची गरजही भासली नाही. ज्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये या विषयावर मुत्त* चर्चा होते किंवा या विषयाच्या शिक्षणासाठी सगळीच कवाडे अगदी सताड उघडी असतात, त्या राष्ट्रांमधील लैंगिक गुन्ह्यांचे, लैंगिक स्वैराचाराचे प्रमाण पाहता या ‘मुत्त*तेचा’ सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणामच झालेला दिसून येतो. त्या तुलनेत आमच्या या विषयाच्या बाबतीत ‘अडाणी’ समजल्या जाणाऱ्या देशाची स्थिती बरीच चांगली म्हणावी लागेल. आमच्या देशात हे शिक्षण देण्याची गरज आम्हाला भासत नाही, कारण काही गोष्टी निखळ नैसर्गिक असतात आणि त्या तशाच राहू देण्यातच शहाणपण असते. आमच्याकडची आई मुलीला किंवा वडील मुलाला याबाबतीत मार्गदर्शन करताना दिसून येत नाहीत आणि तरीही कुणाचे काही अडत नाही. भारताच्या अफाट वाढणाऱ्या लोकसंख्येकडे पाहता हे सिध्द होते. या लैंगीक शिक्षणाच्या अभावातूनही एक मोठा देश उभा राहू शकतो, हे आम्ही आमच्याच उदाहरणाने

जगाला दाखवून दिले आहे. उलट या गोष्टी थेट शालेय वयापासून विद्यार्थ्यांना समजू लागल्या तर

खूप मोठी समस्या उभी राहू शकते.

मुलांची आणि मुलींचीही उत्सुकता, त्यांच्या जाणीवा नको त्या वयात चाळवल्या जाऊ शकतात. त्यातच ‘सुरक्षित’ मार्गांची सखोल माहिती मिळू लागली की सहज मजा मारण्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. आज इतके सामाजिक बंधन असूनही लैंगिक गुन्हेगारी प्रचंड वाढत आहे, अशा परिस्थितीत कोवळ्या मुलांना नको त्या वयात नको त्या गोष्टींची जाणीव करून देऊन आम्ही कदाचित आमच्याच पायावर दगड मारून घेऊ. खरेतर शिक्षणाच्याच संदर्भात बोलायचे झाल्यास सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकतील अशा इतर अनेक गोठी आम्ही मुलांना शिकवू शकतो की ज्या आजपर्यंत मुलांना शिकविल्याच गेल्या नाही. त्या गोठींची कधी चर्चा नाही, त्यावर कसलेही विचारमंथन नाही. सभ्यतेच्या शिक्षणाची कुठे चर्चा नाही. चालताना, बोलताना, वागताना, समाजात वावरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे शाळेत शिकविण्याची गरज आहे. निव्वळ पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे नाही. स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवायला मुलांना शिकविणे गरजेचे आहे. आज आपल्या देशात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे, कारण कचरा करणाऱ्यांची, घाण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे सगळेच लोक अशिक्षित किंवा अडाणी नसतात. उलट असे म्हणता येईल की अडाणी, ठाामीण लोकांना स्वच्छतेची अधिक जाणीव असते. चांगले शिकले सवरलेल्या लोकांना रस्त्यावरून चालताना थुंकायला कसलीच लाज वाटत नाही. ‘येथे कचरा टाकू नये’ असा फलक असलेल्या ठिकाणी कचऱ्याचा ढिग करणारे कधी शाळेत गेलेलेच नसतात का? स्वच्छतेच्या, सभ्यतेच्या, सदाचाराच्या बाबतीत शाळेत धडे देणे अधिक महत्त्वाचे ठरते. आजपर्यंत शाळांमधून लैंगिक शिक्षण दिले जात नव्हते. समाजाचे, देशाचे क
हीच अडले नाही, परंतु स्वच्छतेच्या, सभ्यतेच्या सवयी आम्ही शाळेतून लावल्या नाहीत आणि देशाचा हळूहळू उकिरडा झाला. भारत आज एक अतिशय अस्वच्छ, घाण देश म्हणून ओळखला जातो आणि ही ओळख चुकीची नाही. युतीच्या शासन काळात शाळांमधून इतर तासिकांची वेळ कमी करून ‘मूल्यशिक्षण’ ही जादाची तासिका सुरू करण्याचा अतिशय स्वागतार्ह निर्णय घेण्यात आला होता, अर्थात अजूनही हा निर्णय कायम आहे. त्याच्या परिणामकारकतेबद्दल फार काही बोलता येणार नाही कारण शेवटी ती निर्णय राबविणाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. परंतु निर्णय चांगला होता. पुस्तकी ज्ञानासोबतच मूल्यांचे शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे असते. स्वच्छता हेही असेच एक मूल्य आहे आणि आपल्याकडे अगदी पहिल्या इयत्तेपासून मुलांमध्ये ते रुजविण्याची गरज आहे. लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत पाश्चात्यांचे अनुकरण करण्यास तत्पर असणाऱ्यांनी त्यांच्या इतर अधिक चांगल्या गोष्टींचे आधी अनुकरण करणे गरजेचे आहे. विदेशात विशेषत: युरोपियन देशात स्वच्छतेला अतिशय महत्त्व दिले जाते. घाण किंवा कचरा दृष्टीसही पडत नाही. ठिकठिकाणी कचरा पेट्या असतात आणि त्या तुडुंब भरून वाहत आहेत, कचरा त्या डब्यांपेक्षा डब्यांच्या बाहेरच अधिक पडला आहे, हे आपल्याकडे सर्रास दिसणारे दृश्य तिकडे कधीच दिसत नाही. कचरादेखील वेगवेगळा जमा केला जातो. कुजणारा कचरा वेगळ्या पेट्यात जमा होतो. प्लास्टिक, कागद, काच यासारख्या वस्तुंचा कचरा वेगळ्या पेट्यात जमा होतो. या कचऱ्यांवर प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर केला जातो. त्या माध्यमातून उत्पन्नही मिळते. शिवाय प्लास्टिकचा कचरा इतरत्र पडला तर पर्यावरणाच्या दृष्टीने ते अतिशय घातक ठरू शकते. त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत. दोन वर्षांपूर्वी मुसळधार पावसाने मुंबईची मिठी नदी आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तु
ंबल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण मुंबईच अक्षरश: जलमय झाली होती. ती नदी आणि नाले तुंबण्याचे मुख्य कारण त्यामध्ये अडकलेला प्लास्टिकचा कचरा हेच होते. प्लास्टिक किंवा एकूणच कचऱ्याच्या बाबतीत आपण फारच बेजबाबदारपणे वागतो. कुठेही काहीही टाकले जाते. जनावरांच्या पोटातून पंचवीस-पंचवीस किलो प्लास्टिक निघाल्याची उदाहरणे आहेत. हे टाळता येणार नाही का? सहज टाळता येईल, परंतु स्वच्छतेचे हे मूल्य संस्कारक्षम मुलांवर

रुजविता आले पाहिजे. केवळ स्वच्छताच नाही तर इतर अनेक साध्या साध्या

बाबतीत आपल्याला पाश्चात्यांकडून बरेच काही शिकता येईल, आपल्या मुलांना शिकविता येईल. मागे एकदा असाच विदेशात असताना एक गाडी खूप सुंदर दिसत होती म्हणून मी त्या गाडीला जवळून निरखत होतो, तोच माझ्या मित्राने असे करू नको, असे करणे इकडे ‘आउट ऑफ मॅनर्स’ समजले जाते, असे सांगितले. मला खूप आश्चर्य वाटले. सभ्यतेचे असेही मानदंड असू शकतात, यावर विश्वासच बसला नाही. आमच्याकडे तर आम्ही कुणीही कुठेही सहज डोकावतो, डोकावतो म्हणण्यापेक्षा नाक खुपसतो म्हटले तर अधिक योग्य ठरेल आणि त्याचे कुणालाही वैषम्य वाटत नाही. प्रत्येक जण दुसऱ्याच्या कामात कारण नसताना अवास्तव दखल देतो. सभ्यता, शिस्त आणि स्वच्छता याबाबतीत आपण पाश्चात्यांच्या तुलनेत खरोखरंच खूप मागासलेले आहोत. कुठल्याही कार्यक्रमात जा, हॉलच्या बाहेर चपलांचा, बुटांचा ढीग लागलेला दिसेल. चपला, बुट काढून निट रांगेत ठेवणे आपल्याला का जमू नये? अनेकांच्या घरात कचरा पेटीच नसते. कचरा जमा करून बाहेर कुठेही टाकला जातो. त्यातून अस्वच्छता वाढते. रोगराई पसरते. सार्वजनिक ठिकाणांची अवस्था तर विचारूच नका. रेल्वेस्थानक, बसस्थानक म्हणजे जणू काही कचऱ्याचे आगरच असतात. मनपा / नपा प्रशासन किंवा रेल्वे प्रशासन सुध्दा ह्या बाबतीत फारच उदासीन दिसते. आमच्याकडील सा
र्वजनिक मुताऱ्या किंवा संडासाबाबत न बोलणेच बरे, विदेशात संडासांना रेस्ट रूम म्हणतात आणि त्या देवघराएवढ्या स्वच्छ व सुंदर असतात.ही परिस्थिती बदलायची असेल तर आधी आपली मानसिकता बदलायला हवी. मानसिकता बदलण्याचे प्रभावी माध्यम शिक्षण हेच आहे. कायद्याने सगळ्याच गोष्टी साध्य होत नाहीत. या पृष्ठभूमीवर शाळांमधून लैंगिक शिक्षणाच्या आवश्यकतेवर भर देण्यापेक्षा उत्तम नागरिक घडविण्याच्या दृष्टीने आवश्यक इतर बाबींचे शिक्षण देणे अधिक महत्त्वाचे ठरते. सभ्यता, स्वच्छता आणि सदाचार या मूल्यांची आज समाजाला अधिक गरज आहे आणि म्हणूनच उद्याच्या नागरिकांमध्ये ही मूल्ये निर्माण व्हायची असतील तर आजच्या विद्यार्थ्यांना या मूल्यांची जाणीव करून द्यावी लागेल. ‘सेक्स एज्युकेशन’ पेक्षा ‘सिव्हीलायझेशन’चे शिक्षण हीच काळाची गरज आहे. ज्या गोष्टी शिकवाव्या लागत नाही त्या शिकविण्यावर भर द्यायचा आणि ज्याची नितांत गरज आहे त्याकडे दुर्लक्ष करायचे हेच आपल्या शिक्षण पद्धतीचे सगळ्यात ठळक वैशिष्ट्य आहे. हे बदलावे लागेल. शिक्षण अधिक व्यावहारिक करावे लागेल आणि ते निखळ पुस्तकीही राहायला नको!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..