नवीन लेखन...

साधी जखम झाली गँगरीन!

नक्षलवादी चळवळ काही वर्षांपूर्वी किंवा आता आतापर्यंत या देशातील उपेक्षितांची, वंचितांची चळवळ होती. त्यांनी अंगीकारलेला सशस्त्र क्रांतीचा मार्ग योग्य होता की नाही हा कायम वादाचा विषय राहत आला असला तरी हा संघर्ष देशांतर्गत होता. नक्षलवादी म्हणजे आपलीच माणसे होती आणि आपल्या हक्कांसाठी ती भांडत होती. ते वादळ घरातले होते. सरकारने वेळीच या वादळाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली असती तर एव्हाना ही चळवळ संपुष्टातही आली असती; परंतु गोळीला गोळीनेच उत्तर देत सरकारने ही चळवळ फोफावण्यास हातभार लावला. नक्षलवादी ज्या लोकांसाठी लढत होते आणि ज्या प्रश्नांसाठी लढत होते त्यामागे एक निश्चित तार्किकता होती, तत्त्व होती, एक विचार होता. त्या विचारांचे समर्थन करणारा मोठा वर्ग समाजात होता. विशेषत: पीडित, शोषित आदिवासींना, मजुरांना, कामगारांना हाती बंदूक घेतलेले नक्षलवादी आपले मुत्ति*दाते वाटत होते. सरकारपेक्षा त्यांचा त्यांना अधिक आधार वाटायचा. त्यांच्यासाठी ते न्यायदूत होते. नक्षलवाद्यांच्या पाठीशी असलेल्या समाजाच्या एका मोठ्या वर्गाच्या या सहानुभूतीकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी ही चळवळ, या चळवळीला असलेली सहानुभूती वाढतच गेली. नक्षलवाद्यांनी आपले प्रभाव क्षेत्र विस्तारायला सुरुवात केली. प. बंगालमध्ये रूजलेल्या या चळवळीने नंतर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेशसारख्या राज्यातही आपले हातपाय पसरले. दुर्दैवाने सरकारी धोरणामुळे निराश झालेल्या युवकांची कुमक या चळवळीला सातत्याने मिळत गेली. चळवळीला जन्म देणारे, ती वाढविणारे नेतृत्व अस्तंगत झाले आणि कालांतराने कोणत्याही सशस्त्र चळवळीला लागू शकणारे घातक वळण या चळवळीलाही लागले. नक्षलवादी चळवळ आपल्या मूळ उद्देशापासून भरकटत गेली. केवळ हिंसा करणे आणि दहशत पसरविणे हाच एककलमी कार्यक्रम नक्षलवादी राबवू लागले. ज्या आदिवासींच्या उत्थानासाठी ध्येयवेड्या युवकांनी हाती बंदूक घेतली त्यांचेच पाईक याच आदिवासींचे मुडदे पाडू लागले. आदिवासी भागाच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या सरकारी योजनांना सुरुंग लावू लागले. नक्षलवादी चळवळीत आलेले हे परिवर्तन अगदीच अतक्र्य म्हणता येणार नाही. विशेषत: नक्षलवाद्यांनी नुकतेच पोलिसांचे जे नृशंस हत्याकांड घडवून आणले ते पाहता एका तर्काला पुष्टीच मिळते आणि तो म्हणजे ही चळवळ आता आदिवासींच्या, पीडितांच्या, उपेक्षितांच्या न्यायाची राहिली नसून ही चळवळ देशविघातक शत्त*ींनी अपहृत केली आहे. परवाच्या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी ज्या क्रूरतेने पोलिसांना ठार केले आणि ठार केल्यावरही त्यांच्या मृतदेहांची जी विटंबना केली ते पाहता या लोकांचे ‘मास्टर माईंड’ या मातीतले नाहीतच याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही. आमचे तरुण शूर आहेत, धाडसी आहेत, प्रसंगी सरकारशी दोन हात करण्याची हिंमत बाळगणारे आहेत, ते कदाचित वाट चुकलेले असतील परंतु या मातीत उपजतच असलेली मूल्ये ते विसरलेले नाहीत. मरणासोबत वैर संपते, ही या मातीचीच शिकवण आहे. त्यामुळेच परवा पोलिसांसोबत जे काही घडले ते घडविणारे या मातीतील असूच शकत नाहीत आणि असतील तरी त्यांचे व्यवस्थित ‘ब्रेन वॉशिंग’ करण्यात आले असावे आणि हे करणारे कोण असू शकतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. चीन आणि पाकिस्तान या भारताच्या हाडवैऱ्यांनी भारतातील नक्षलवादी चळवळ अपहृत करून त्यांच्या माध्यमातून देशात अराजक माजविण्याचा प्रयत्न चालविला असण्याची दाट शक्यता आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांना अतिशय थंड डोक्याने आणि तेवढ्याच क्रूरतेने ठार केले. जखमी पोलिसांवर गोळ्या चालवू नका, त्यांना दगडाने ठेचा, त्यांचे गळे चिरा असा आदेश या नक्षल्यांचा म्होरका देत होता. हे युद्ध नव्हते. हा सूड उगवण्याचा प्रकार होता. मृत जवानांचीही विटंबना करण्यात आली. हा सगळा प्रकार पाहता या नक्षलवादी संघटनेत भारताशी शत्रुत्व करणाऱ्या काही बाहेरील दहशतवादी संघटनांनी घुसखोरी केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नक्षलवादी चळवळीच्या नावाखाली भारतात दहशतवादी चळवळ फोफावत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासींच्या, पीडितांच्या हक्कासाठी तरुणांनी चालविलेली एक चळवळ म्हणून नक्षलवादी चळवळीकडे पाहिले जात होते आणि त्यामुळेच या चळवळीला काही प्रमाणात का होईना समाजाचा नैतिक पाठिंबा होता. परंतु नक्षलवादी चळवळ आता भरकटल्याचे आणि केवळ भरकटल्याचे नव्हे तर या चळवळीचे अपहरण झाल्याचे दिसत आहे किंवा नक्षलवादी चळवळीला बदनाम करण्याकरिता काही शक्ती अशा पद्धतीने कार्य करीत असाव्यात ही शक्यताही नाकारता येत नाही. ही चळवळ आता भारताला तोडू पाहणाऱ्या दहशतवादी संघटनेच्या हातात गेली असावी, अशी साधार शंका येऊ लागली आहे. त्यामुळे नक्षल्यांचा समाचार घेताना सरकारला आता वेगळ्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. नक्षलवादाच्या आकर्षक तत्त्वज्ञानाची भुरळ पाडून तरुणांना आकर्षित करायचे आणि नंतर त्यांच्याद्वारे हिंसाचार घडवून आणायचा, दहशत निर्माण करायची, आदिवासी भागातील विकासकामांना खोडा घालायचा ही नक्षली नेत्यांची किंवा त्यांच्या नावावर काम करणाऱ्या शक्तींची ‘मोडस ऑपरेंडी’ झालेली दिसते. उद्या कदाचित सरकारच्या कडक उपाययोजनांमुळे सीमेपलीकडून येऊन भारतात उत्पात माजविणे शक्य झाले नाही तर भारतातच दहशतवाद्यांची फौज उभारून आपल्या कारवाया सुरू ठेवायच्या, असेही कारस्थान यामागे असू शकते. प्रस्थापितांच्या विरोधात उद्रेक हा नेहमीच स्वाभाविक राहत आला आहे. लोकांच्या त्याच मानसिकतेचा फायदा घेऊन आपले मनसुबे पूर्णत्वास नेण्याची खेळी भारताच्या शत्रूंनी सुरू केली नसेलच असे ठामपणे म्हणता यायचे नाही. त्यामुळे नक्षलवादी चळवळीचा मुकाबला करताना सरकारने अनेक स्तरावर उपाययोजना करणे गरजेचे ठरले आहे. अन्यायठास्त युवक अशा चळवळींकडे सहज ओढला जातो, हे लक्षात घेऊन सरकारने समाजातील सर्व घटकांना न्याय, समता आणि आर्थिक स्थैर्य पुरवण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे. सरकारच्या नोकरशाहीच्या इशाऱ्यावर विशेषत: आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या रिपोर्टनुसार आपले मत बनविते तेही तपासून पाहणे गरजेचे आहे. नक्षलवादी आता दहशतवादी झाले आहेत हे सरकारला विसरता येणार नाही आणि हा प्रवाह इथेच योग्य वेळी खंडित झाला नाही तर आज जंगलात असलेले नक्षलराज उद्या शहरात पोहोचायला वेळ लागणार नाही. नव्हे मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने त्याची चुणूक आपल्याला पाहायला मिळालीच आहे. एका साध्या जखमेकडे वेळीच योग्य लक्ष दिले नाही तर त्या जखमेचे गँगरिन होणारच. आज नक्षलवादी चळवळ विदेशी दहशतवाद्यांच्या हातात पडून तिचे गँगरिन झाले असेल तर त्याचा दोष सरकारच्या अक्षम्य बेपर्वा वृत्तीकडेच जातो.

— प्रकाश पोहरे

रविवार, 8 फेब्रुवारी , 2009

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..