प्रकाशन दिनांक :- 11/04/2004
एखाद्या सरकारी खात्यात ‘सद्भावना सप्ताह’ दरम्यान जसे वातावरण असते तसे वातावरण सध्या संपूर्ण देशात दिसून येत आहे. विशेषत: राजकीय पक्षाशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते चेहऱ्यावर विलक्षण माधुर्य ठेवून वावरत आहेत. अर्थात त्यामागे सद्भावनेचा भाव किती आणि स्वार्थाचा मुलामा किती, हा वेगळा विषय ठरतो. परंतु आजकाल सगळीच राजकीय मंडळी अत्यंत विनयशील झालेली दिसून येत आहे. राजकीय लोकांसाठी हा ‘सद्भावना सप्ताह’ दर पाच वर्षांनी येतच असतो. जनतेलादेखील त्याची सवय झालेली आहे. पुढची पाच वर्षे सत्तेची गोडी चाखायची असेल तर निवडणूक प्रचारादरम्यानचा महिना-दीड महिना अतिनम्र होऊन जगण्यात या लोकांना कोणतीच अडचण नसते. प्रत्येकाची मान विनयाने खाली झुकलेली, हात जोडलेले, चेहऱ्यावर साधु-संतालाही लाजवेल असा सेवाभाव, असे एकंदरीत या लोकांचे वर्णन करता येईल. कधी चुकूनही नमस्कार न करणारा माणूस केवळ नमस्कार करूनच थांबत नसेल; कुटुंबाची, प्रकृतीची आस्थेने चौकशी करत असेल तर नक्की समजावे की, कोणत्यातरी राजकीय पक्षाचा तो कार्यकर्ता आहे. निवडणुकीच्या काळात हे वातावरण संपूर्ण देशभर पाहायला मिळते.
लोकशाहीत एक दिवसाचा राजा म्हणून गणल्या गेलेल्या मतदारासाठी हाच काळ थोडाफार सुगीचा ठरतो. एरव्ही त्याची साधी दखलही न घेणारे नेते-कार्यकर्ते त्याच्यासमोर लाचार होऊन उभे असतात. आपल्याकडच्या राजकीय व्यवस्थेत सामान्य जनतेला हा पंचवार्षिक उपहार देण्याची व्यवस्था केलेली आहे. वास्तविक मताचा मिळालेला अधिकार हे सामान्य जनतेच्या हातातील एक अमोघ शस्त्र आहे. परंतु या शस्त्राचा वापर करण्याची इच्छाशक्ती बऱ्याच मतदारांना नसते. या शस्त्राच्या घातक क्षमतेचीही त्यांना कल्पना नसते. एक सोपस्कार म्हणून केवळ मतदान केले जाते. 40 टक्के मतदार तर तेही करत नाहीत. राजकार
ण्यांचा भ्रष्टाचार, बेबंदशाही, सामान्य जनतेची परवड यावर सतत चिंता व्यक्त करणाऱ्या लोकांना जेव्हा या प्रकाराला आळा घालण्याची संधी
मिळते तेव्हा मात्र माझ्या एका
मताने काय फरक पडणार, अशी नकारात्मक भूमिका घेऊन बरेच लोक मतदानच करीत नसतात. जे मतदान करीत नाहीत त्यांना या व्यवस्थेतील दोषांवर बोलण्याचा अधिकारही उरत नाही. प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे आणि तेही जाणीवपूर्वक, संपूर्ण विचारांती! आज नेते-कार्यकर्ते झोळी घेऊन मतांची भीक मागण्यासाठी आपल्या दारी येत आहेत. कोणाच्या पदरात आपले मत टाकावे, याचा निर्णय घेण्यापूर्वी दारी येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक मतदाराने त्यांच्या कर्तृत्वाचा जाब विचारायलाच पाहिजे. लोखंड गरम असते तेव्हाच त्याला पाहिजे तसा आकार देता येतो. एकवेळ ते थंड झाले की, त्याचा आकार बदलणे शक्य होत नाही. प्रस्थापित व्यवस्थेबद्दल आपल्या काही तक्रारी असतील, नेत्यांच्या कर्तृत्वावर आपला आक्षेप असेल तर आपल्याला पाहिजे तसा बदल घडवून आणण्याची ही एक संधी आहे. आज देशासमोर अनेक समस्या आहेत. साध्या फाटक्या शेतकऱ्यापासून ते थेट बड्या उद्योगपतीपर्यंत प्रत्येकजण हवालदिल आहे. उद्योजक आपला उद्योग गुंडाळत आहेत तर शेतकरी निराश होऊन आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडत आहेत. आपल्या मताचे दान एखाद्याच्या झोळीत टाकण्यापूर्वी त्याला देशाची ही अवस्था कुणामुळे झाली, असा प्रश्न प्रत्येकाने विचारणे आवश्यक ठरले आहे. कदाचित आपल्या स्वत:च्या काही समस्या नसतील, परंतु ही निवडणूक वैयक्तिक लाभहानीचा विचार करण्यासाठी नाही. ही लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीकडे पाहताना आपला दृष्टिकोनसुद्धा व्यापक असायला हवा. तुम्ही माझ्यासाठी, माझ्या समाजासाठी काय केले, हा प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही देशासाठी काय केले, असे प्रत्येक उमेदवाराला विचारायला
पाहिजे. शेतकरी निराशेने आत्महत्या करीत असताना तुम्ही कोठे होते, देशांसमोरील समस्यांची तुम्हाला कितपत जाणीव आहे, या समस्या सोडविण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत, सत्तेवर असतील तर सत्तेवर असताना तुम्ही काय केले आणि सत्तेवर नसतील तर सत्तेत आल्यावर तुम्ही काय करणार आहात, या प्रश्नांची उत्तरे संबंधित उमेदवारांना मतदारांनी विचारायला हवीच. केवळ उत्तर विचारूनच भागणार नाही. दिलेला शब्द फिरविण्यात आपल्याकडचे नेते वाकबगार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून लिखित स्वरूपात या प्रश्नांची उत्तरे घ्यायला पाहिजेत. आपल्याकडे निवडणुकीला जातीय आणि धार्मिक रंग दिला जातो. या विषयावर जनतेच्या भावना भडकावून निवडणूक लढविणे बऱ्याच राजकीय पक्षांना सोयीचे जाते. खरे तर त्यासाठीसुद्धा मतदारांनाच जबाबदार धरायला पाहिजे. हा आपल्या जातीचा, धर्माचा म्हणून हाच आपला प्रतिनिधी असावा, असा संकुचित दृष्टिकोन ठेवून मतदान करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही, किंबहुना जातीच्या, धर्माच्या या वृथा अभिमानानेच आज आमचा देश जगाच्या तुलनेत कित्येक वर्षे मागे राहिला आहे.
आम्हाला एक विकसित राष्ट्र म्हणून पुढे जायचे असेल तर जाती, धर्म असल्या क्षुल्लक गोष्टींच्या पलीकडे जाऊन राष्ट्राच्या सकल विकासाचे भान असणारे नेतृत्व निवडणे ही आज राष्ट्रीय गरज झाली आहे. सध्याच्या राजकीय व्यवस्थेच्या किंवा नेत्यांच्या नावाने खडे फोडण्याआधी मतदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ही व्यवस्था आणि हे नेते आपणच मोठे केले आहेत. नेते आकाशातून पडत नाहीत. आपणच त्यांना मोठे करतो. आज जर ते नालायक सिद्ध झाले असतील तर त्यामध्ये आपलाही फार मोठा वाटा आहे. सुदैवाने दर पाच वर्षाने आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी मिळत असते. आज ही संधी मिळत आहे. या संधीचा प्रत्येक मतदाराने जाणीवपूर्वक वापर करून खऱ्या अर्
ाने योग्य ठरेल असे नेतृत्व उभे केले पाहिजे. आपले मत वाया गेले अशी पश्चात्तापाची वेळ आपल्यावर येणार नाही, याची दक्षता घेऊनच प्रत्येकाने योग्य उमेदवार निवडला पाहिजे. देशाच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याही आहेत. आपण देशापेक्षा वेगळे ठरू शकत नाही. बेरोजगारी, गरिबी, भ्रष्टाचार आपल्या विकासात फार मोठा अडसर बनले आहे. हा अडसर दूर करण्याची क्षमता असलेले, जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले, या समस्या दूर करण्याची
खरी कळकळ असलेले नेते आम्हाला जाणीवपूर्वक निवडावे लागतील. जे
सत्तेत होते आणि जे सत्तेत जाऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना जाब विचारण्याची, त्यांना पारखण्याची ही एक संधी आहे. ती आपण दवडली तर पुन्हा आपला देश किमान पाच वर्षाने मागे ढकलला जाईल आणि त्यासाठी आपणच सर्वस्वी जबाबदार असू. देशाला विकासाच्या वाटेवर अठोसर करायचे असेल, देशाच्या विकासासोबतच आपलेही जीवनमान उन्नत करायचे असेल तर प्रत्येकाने जाणीवपूर्वक मतदान करण्याची हीच योग्य वेळ आहे.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply