एकदा एका शेतकऱ्याने थेट इंद्रदेवाकडे धाव घेऊन आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली. त्या शेतकऱ्याचा आरोप होता की, पर्जन्याचा स्वामी असलेल्या इंद्राला मुळात पाऊस केव्हा, कुठे आणि कसा पाडावा याचे प्राथमिक ज्ञानदेखील नाही. जेव्हा पिकाला पाण्याची गरज असते तेव्हा आकाशात एकही ढग नसतो आणि जेव्हा उघाड पाहिजे असते तेव्हा धो-धो पाऊस कोसळतो. कदाचित शेती म्हणजे काय हेच इंद्राला माहीत नसल्याने पावसाचे वेळापत्रक त्याला जमत नसावे, असे त्या शेतकऱ्याने इंद्राला सुनावले. इंद्राच्या या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मात्र अतोनात हाल होतात. कारभार नीट करता येत नसेल तर इंद्राने आपल्याकडील पर्जन्य खाते दुसऱ्याकडे सोपवावे, असा उपरोधिक सल्लाही त्या शेतकऱ्याने देऊन टाकला. आपण आपल्या खात्याचा कारभार नीट पाहात आहोत, थोडे कधी कमी-जास्त होते परंतु कारभार तसा ठीक चालला आहे, असे स्पष्टीकरण इंद्राने देऊन पाहिले, परंतु शेतकऱ्याचे समाधान झाले नाही. त्याचा रागही शांत झाला नाही. अखेर इंद्राने त्या शेतकऱ्यालाच पुढच्या मोसमात पर्जन्यखात्याचा कारभार सांभाळण्याची विनंती केली. शेतकरी आनंदाने तयार झाला. पुढच्या मोसमात शेतकऱ्याने अगदी पाहिजे तेव्हा, पाहिजे तितका पाऊस पाडला. सगळं अगदी वेळेवर पार पडलं. पेरणी झाली, पिकांची रोपे वर आली, पुढे संपूर्ण शिवार पिकांच्या हिरव्यागार रोपाने भरून गेले. कुठे कीड नाही की कुठे रोग नाही. संपूर्ण गाव त्या शेतकऱ्याचे पीक पाहण्यासाठी लोटले. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान होते. त्याने इंद्राची भेट घेतली. इंद्राला शेतात डोलत असलेले पीक दाखवले. इंद्र केवळ हसले. त्यानंतर पिकाची कापणी करण्याची वेळ आली. कापणी करताना मात्र शेतकऱ्याच्या लक्षात आले की, पिकं जोमाने वर आलेली असली तरी ज्वारीच्या कणसात दाणेच भरलेले नाहीत. सगळी माणसं तशीच, एकातही ज्वारीचा दाणा नाही. हे पाहून शेतकरी हबकला. हे कसे झाले, म्हणत त्याने परत इंद्राकडे धाव घेतली.
इंद्राने त्याला समजाविले, ” हे असेच होणार होते. तू पिकांना जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जे पाहिजे ते पुरवीत गेलास. त्यामुळे त्या पिकांची परिस्थितीशी झगडून उभे राहण्याची जिद्दच मारल्या गेली. पिकं आळशी झाली. विपरीत परिस्थितीत तरारून उभे राहण्यासाठी जो कस लागतो त्या कसातूनच पिकं फुलत असतात, फळत असतात. यावेळी तसा कस लागलाच नाही. त्यामुळे पिकांमध्ये दाणे भरले नाहीत.” शेतकरी काय समजायचे ते समजला. सृष्टीचा हा नियमच आहे, विपरीत परिस्थितीतूनच विकासासाठी लागणारी ताकद निर्माण होत असते. संकटे किंवा आव्हाने ही मुळात संकटं नसून विकासाच्या, प्रगतीच्या दिशेने ढकलणारी, जोर लावणारी प्रेरकेच असतात. फक्त त्या दृष्टीने आणि दिशेने विचार करणे गरजेचे असत. केवळ आपल्या देशापुरता विचार करायचा झाल्यास आज हा देश अतिशय विपरीत परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. वर्तमानपत्र उघडले की रोज एकीकडे पुराच्या, जीवित आणि वित्तहानीच्या तर दुसरीकडे दुष्काळाच्या, कुपोषणाच्या बातम्या वाचायला मिळतात. खून, दरोडे, बलात्काराच्या बातम्या तर नित्याच्याच झालेल्या आहेत. भ्रष्टाचार तर केव्हाचाच शिष्टाचार झाला आहे. पुढारलेले राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती नाही. नैसर्गिक संकटांनी आधीच हवालदिल झालेल्या महाराष्ट्राला राज्यकर्त्यांच्या बेपर्वा वृत्तीची झळ पोहोचत आहे. संकटठास्तांना पुरेशी मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. मदतनिधी मधल्यामध्ये हडप होत आहे. तिजोरीतील खणखणाटाची धून सतत वाजविली जाते. तिजोरीत पैसा नाही, परंतु आश्वासनांचा मात्र पूर आलेला आहे. नुकतेच नागपूरला ‘स्पेशल इकॉनॉमी झोन’ घोषित करण्यात आले. त्यासाठी खास ‘पॅकेज’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. हा पैसा कुठून येईल, हे समजायला मार्ग नाही. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) गिरण्या विकायला काढल्या आहेत. सूतगिरण्यादेखील बंद पडल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा यासारख्या राज्याच्या मागासलेल्या भागाला अधिक मागास करणारी धोरणे राबविली जात आहेत. राज्यात ऐक्याची भावना नाही. नेते आपल्या विभागापुरते किंवा मतदारसंघापुरते मर्यादित झाले आहेत. शरद पवारांना साखर कारखानदारीची काळजी आहे. बंद पडलेल्या साखर कारखान्यांना जीवनदान देण्यासाठी पवारांनी 525 कोटींचे ‘पॅकेज’ जाहीर केले. त्यानुसार साखर कारखान्यांनी घेतलेल्या कर्जावरील थकलेल्या व्याजापोटी 525 कोटी रुपये केंद्र सरकार बँकांना देणार आहे. म्हणजेच साखर कारखान्यांना तेवढी माफी मिळणार आहे. सूतगिरण्यांचे शरद पवारांना सोयरसुतक नाही आणि पवारांएवढी ‘पॉवर’ असलेला, लढणारा, मदत खेचून आणणारा नेता या भागात उभा होऊ दिल्या गेला नाही. सूतगिरण्या संपल्या, कापूस पार बुडाला, कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करू लागला, तरीही इकडच्या नेत्यांना जाग आली नाही. हा सहिष्णुतेचा अतिरेक म्हणावा की संवेदनहीनतेचा? मराठी माणसाचे महाराष्ट्रातच हाल होत आहेत, परंतु त्याची दखल घ्यायलाही कुणाला वेळ नाही. आपलं घर सोडून दूर जायला मराठी माणूस तयार होत नाही आणि त्याचे घरसुद्धा आता त्याचे राहिलेले नाही. इथेही परप्रांतीयांनी सर्वच ठिकाणी घुसखोरी केली आहे. इकडे साधे मजूर येतात तेदेखील छत्तीसगड , बिहारमधून आणि आयएएस ऑफिसर्स येतात दक्षिण भारतातून! जगासाठी भारत ही एक व्यापारपेठ आहे आणि उर्वरित भारतासाठी महाराष्ट्र! इथे लुटायला सगळेच येतात, द्यायला कुणीच तयार नसतो. मुंबईच्या, महाराष्ट्राच्या जोरावर मोठी झालेली माणसे मुंबईलाच महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करतात. एकंदरीत सगळी परिस्थितीच अंधकारमय आहे. वर्तमानातला काळोख भविष्यही व्यापणार असे दिसते. परिस्थितीच्या विपरीतपणाने कमाल मर्यादेचे टोक गाठले आहे. तरीही खचून चालणार नाही. इतिहासात याच मराठी माणसाने दिल्लीचे तख्त फोडले होते. ती जिद्द, तो लढाऊ बाणा पुन्हा जागवावा लागेल. संकटांचा संधीसारखा उपयोग करावा लागेल. नुकताच एक सुंदर शेर वाचण्यात आला, ‘हो न हो मंजील करीब आयी जरूर रास्ते सुनसान नजर आते है।’ सध्या आपल्या राज्याची परिस्थिती अशीच आहे. सगळे रस्ते सुनसान झाले आहेत. कुठं जावे तेच कळत नाही. भविष्याची काळजी वाटत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे याचाच अर्थ लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. संकटाच्या या वर्षावातूनच समृद्धीचे, सुखाचे पीक डोलणार आहे. फक्त गरज आहे ती संकटाला घाबरून न जाता धैर्याने संकटांना तोंड देण्याची. जेव्हा पळून जाण्याचे कोणतेच मार्ग नसतात तेव्हाच लढण्याची जिद्द पेट घेत असते. परतीचे दोर कापल्या गेल्यावरच कोंडाण्याचा ‘सिंहगड’ झाला होता. सध्या तशीच परिस्थिती आहे आणि हीच परिस्थिती महाराष्ट्राला कलाटणी देणार आहे.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply