अनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता.
स्वप्न बघा
झुकेरबर्गने एक स्वप्न पाहिले होते, सर्वात श्रीमंत होण्याचे, जगात प्रसिद्ध होण्याचे. त्यासाठी त्याने कष्ट केले. जर तुम्हालाही तसेच यश मिळवायचे असेल तर तुम्हाला स्वत:ला विचारावे लागेल की, तुम्ही आयुष्यात काय मिळवू इच्छिता. आगामी 10 वर्षांत तुम्ही कोठे असाल? मृत्यूनंतर तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवले जाईल? स्वप्न बघा, काही तरी मिळवण्याची इच्छा बाळगा.
मोठा विचार करा
फेसबुक हा खरे तर झुकेरबर्गचा संगणकावरील एक प्रकल्प होता. तो विकण्याचा पर्यायही त्याच्याकडे होता. मात्र, त्याने असे केले नाही. त्याला नोकरी करायची नव्हती. तो जगाची व लोकांची संवाद साधण्याची पद्धत बदलू इच्छित होता. त्याचे मित्र एफबीला महाविद्यालयातील प्रकल्प म्हणत होते. मात्र, झुकेरबर्ग त्यास लाखो लोकांना एकमेकांशी जोडणारा जागतिक प्रकल्प म्हणायचा. लोकांनी सुरुवातीला एफबी हा लक्षावधी डॉलर प्रकल्प असल्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, त्याने फेसबुकला अब्जावधी डॉलरची कंपनी बनवले.
सुरुवात छोटी करा
आपल्या हातात अब्जावधी डॉलरचा विश्वव्यापी प्रकल्प असल्याची कल्पना असूनही त्याने सुरुवात छोटी केली. त्याने लाखो डॉलरचा निधी मिळण्याची वा प्राथमिक भांडवल मिळण्याची वाट पाहिली नाही. छोटी सुरुवात करण्यात काहीही लाज बाळगू नये.
स्वत:वर विश्वास ठेवा
यशस्वी होण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. इतरांवर जबाबदारी टाकून कधीही यश मिळत नाही. स्वत:ला कधीही कमकुवत समजू नका आणि तुम्ही तुमचे काम कराल, ही क्षमता तुमच्यात ईश्वर निर्माण करेल.
वेड कायम ठेवा
तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वेड आहे का? तुम्ही त्यासाठी कशाचाही त्याग करायला तयार आहात का? यशस्वी होण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे स्वत:ला विचारा. झुकेरबर्गला बालपणापासूनच प्रोग्रामिंगचे वेड होते आणि त्याने ते कायम ठेवण्यासाठी हॉर्वर्ड महाविद्यालयासही दांडी मारली.
टीकेसाठी तयार राहा
प्रत्येक यशस्वी व्यावसायिकाप्रमाणेच झुकेरबर्गला टीका सहन करावी लागली. मात्र, त्याने ती कधीच लपवली नाही. त्याच्या मते, यश मिळवण्यासाठी टीका आवश्यक आहे आणि ती सहन करण्यासाठी तयार राहायला हवे; परंतु तिचा फायदाही घ्यायला हवा.
लक्ष केंद्रित करा
झुकेरबर्गने फेसबुकची मोहीम पूर्ण करण्याच्या उद्देशावर लक्ष केंद्रित केले. वॉरेन बफेट, बिल गेट्स, अँड्र्यू कार्नेजी या यशस्वी उद्योजकांनी नेहमी स्वत:चे लक्ष ध्येयावर केंद्रित केले. विविध प्रयत्नांनी कमी आणि केंद्रित प्रयत्नांनी अधिक यश मिळते.
जोखीम घेणे शिका
कोणतीही व्यक्ती जोखीम घेतल्याविना यश मिळवू शकत नाही. त्याने फेसबुक तयार करण्यासाठी जोखीम घेतली आणि महाविद्यालयाला रामराम ठोकला. जर तो आपल्या प्रकल्पात अपयशी ठरला असता, तर फेसबुकही हातचे गेले असते आणि महाविद्यालयातही त्याला प्रवेश मिळाला नसता. गुगलशी स्पर्धा करण्यातही त्याने जोखीम घेतली. जोखीम घेण्याच्या क्षमतेवर व्यवसाय अवलंबून असतो. जोखीम घेतली नाही तर जग स्थिर बनेल.
प्रक्रियेत सहभागी व्हा
उद्योजकतेच्या खेळात ध्येयापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे प्रक्रिया. जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करता, तेव्हा आपण एका प्रवासास सुरुवात करता, एका प्रक्रियेस सुरुवात करता. त्यात तोच यशस्वी होईल, जो आपल्या प्रक्रियेत प्रामाणिक असेल. झुकेरबर्गने एक स्वप्न पाहिले, त्याचे नियोजन केले आणि त्यावर काम केले. त्याने आपले वेड कायम ठेवले आणि संपूर्ण प्रक्रियेत सुरुवातीपासून अखेरपर्यंत सहभागी राहिला.
दिग्गजांना घाबरू नका
झुकेरबर्ग फेसबुकला इंटरनेटचे हृदय बनवू इच्छित होता. मात्र, त्यात एक अडथळा होता तो पूर्वीपासून प्रस्थापित गुगलशी सामना करण्याचा. मग गुगलला घाबरून कामच सुरू करायचे नाही का? नाही, यशासाठी मोठे होण्याची भावना हवी म्हणून कोणत्याही दिग्गजाला घाबरण्याऐवजी त्याचा सामना करा.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply