र. धों. (भारत), मार्गारेट सँगर (अमेरिका)आणि मेरी स्टोप्स (इंग्लंड) या तीन समकालीन व्यक्तींनी आपापल्या देशात साधारण शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांच्या प्रजनन स्वास्थ्याबद्दलचे हक्क, लंगिक समाधान, संततिनियमन यांसारख्या विषयासंबंधी जनजागृती व्हावी यासाठी समाज विरोध पत्करून बेधडक कार्य केलं. त्यांनी केलेलं कार्य म्हणजे आजच्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाची पायाभरणी होती.
त्यांच्या कार्याचं पुण्यस्मरण करण्याचा हा दिवस.
आपल्या देशाचे आदरणीय रघुनाथ धोंडो कर्वे, अमेरिकेची मार्गारेट सँगर आणि इंग्लडची मेरी स्टोप्स हे तिघेही समकालीन. जन्म साधारणत: १८८०च्या सुमाराचा. आयुष्य सरासरी ७५ वर्षांचं. मुख्य कार्यकाल ९० ते १०० वर्षांपूर्वीचा. या तिघांनी जगाच्या विविध खंडांत एकाच वेळी, एकाच ध्येयाने प्रेरित होऊन समाजहिताच्या एका अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी आयुष्य वेचलं. समाजात असणाऱ्या स्त्री-पुरुष लंगिक संबंधाच्या संदर्भात प्रचंड गरसमज, त्यातून होणारे शारीरिक आजार, मानसिक ओढाताण, कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी कोणते साधन वापरावे याबद्दलचे अज्ञान असे प्रश्न तिघांनाही भंडावून सोडत असत. लंगिक समस्येबद्दल उघडपणे बोलणं देखील पाप समजलं जात होतं असा तो काळ होता. आज गर्भपात जगभर सर्रास केले जातात. तेव्हा ‘अॅाबॉर्शन’ या नुसत्या नावालाही प्रचंड विरोध होता. आपण करत असलेल्या कामास मोठय़ा प्रमाणावर विरोध असतानाच्या सामाजिक वातावरणात आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी संशोधनात्मक कार्याच्या आधारावर लोकशिक्षणाचं काम त्यांनी केलं. अश्लीलता, व्यभिचार या संदर्भातील प्रश्न हाताळणं म्हणजे आजही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं असं समजलं जातं. िलग मानसशास्त्र आणि सामाजिक आरोग्य या संबंधी उघडपणे चर्चा घडवून, या संदर्भातील प्रश्न कसे सोडवता येतील याचा त्यांनी पाठपुरावा केला तो कृतिशील योजनेतून.
वास्तविक पाहता, हा विषय वैद्यकीय आणि समाजशास्त्राशी संबंधित. तिघांपकी ना कुणी डॉक्टर होतं ना कुणी समाजशास्त्राचा अभ्यासक, तरीही या विषयाकडे ते आकर्षति झाले ही विशेष उल्लेखनीय बाब होय. एवढंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातदेखील कुणी डॉक्टर नव्हतं. तिघांच्या व्यक्तिमत्त्वात स्त्रीवादी गुणधर्म ठासून भरला होता. स्त्रियांच्या प्रजनन स्वास्थ्यासंबंधित प्रश्नांची उकल करणं असं समान ध्येय त्यांच्यासमोर होतं हे खरं आहे, पण प्रत्येकाचा सुरुवातीचा जीवनप्रवास थोडा थोडा वेगळा होता.
रधोंना थोर समाजसेवक महर्ष िधोंडो केशव कर्वे यांचा वारसा लाभला होता. त्यांचा मूळ विषय गणित. दहावीत गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर, फग्र्युसन कॉलेजातून गणित या विषयासह पदवी आणि फ्रान्समध्ये जाऊन गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. इंग्लडची मेरी स्टोप्सचे आई-वडील दोघेही सुशिक्षित. युनिव्हर्सटिी कॉलेज, लंडन येथे वनस्पतीशास्त्रात पीएच.डी.पर्यंतचं शिक्षण तिनं घेतलं होतं. तर अमेरिकेच्या मार्गारेट सँगरचा जन्म मात्र सामान्य कुटुंबातला. वडील आर्मीमध्ये होते. आई घरकाम करणारी. आईला एक-दोन नाही तर अठरा वेळेस गर्भधारणा झाली होती. त्यापकी ११ अपत्ये जिवंत होती. त्यातून मार्गारेट सँगरचा क्रमांक सहावा. बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्यानं आईचं वयाच्या ४९व्या वर्षी निधन झालं. गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या हालअपेष्टा सहन करण्यातच आपल्या आईचं आयुष्य वाया गेलं अणि त्यामुळेच तिचं निधन झालं. या घटनांचा मार्गारेट सँगरच्या मनावर खोलवर आघात झाला. नको असलेल्या गर्भधारणेपासून स्त्रियांना मुक्ती मिळाली पाहिजे, स्त्री म्हणजे काही मुलांची पदास करणारी मशीन नव्हे या विचारानं मार्गारेटनं परिचारिका होण्याचं ठरवलं. संबंधित शिक्षण पूर्ण करून ती नर्स झाली. सुरुवातीला अमेरिकेत ती घरोघरी भेटी देत असे.
मार्गारेटचं लग्न आíकटेक्टशी झालं. तिला तीन अपत्ये झाली. या तुलनेत रधोंच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रवास ऐकला तर आजही आश्चर्याचा धक्का बसतो. शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९११ मध्ये त्यांचा मालतीशी प्रेमविवाह झाला. तेव्हा कमी वयातच लग्न होत असत. मात्र रधों लग्नाच्या वेळी २९ वर्षांचे तर मालती २१ वर्षांच्या. लग्नानंतर आपल्या जीवनध्येयाची त्यांनी पत्नीला कल्पना दिली. आपल्याला एकही अपत्य नको, असा निर्णय दोघांनी मिळून घेतला. एवढंच नव्हे तर ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार त्यांनी स्वत:ची नसबंदी करून घेतली. तेव्हा त्यांच्यावर कुणी डॉक्टर नसबंदी करण्यास तयार नव्हता, म्हणून ते नरोबीत गेले आणि तिथे एका पारसी डॉक्टरच्या हातून नसबंदी करून घेऊन इतिहास घडवला. आजही पुरुष नसबंदीचं प्रमाण किती नगण्य आहे या पाश्र्वभूमीवर ही घटना ऐतिहासिकच वाटते.
इंग्लडच्या मेरी स्टोप्सची मात्र दोन लग्नं झाली. वनस्पतीशास्त्राकडून स्त्री आरोग्याच्या समस्येकडे वळण्याचं तिच्या जीवनातील मुख्य कारण म्हणजे तिचा पहिला नवऱ्याशी झालेला घटस्फोट. मार्गारेट सँगरच्या जीवनात आईच्या बाळंतपणात झालेलं अकाली निधन आणि मेरी स्टोप्सच्या वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीलाच झालेला घटस्फोट या घटनांनी त्या दोघींच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
रधों आपला गणित विषय सोडून संततिनियमनसारख्या विषयाकडे का वळले? हे मात्र सांगता येणार नाही.
आपला संबंधित विषय सोडून स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठी त्या तिघांनी स्वत:ला झोकून दिलं हे मात्र खरं.
तिघांमध्ये आणखी एक साम्य म्हणजे, जनजागृती करण्यासाठी त्यांनी भरपूर लेखन केलं. रधोंचं नियतकालिक ‘समाजस्वास्थ’ हे आपल्यापकी बऱ्याच जणांना माहिती आहे. पदरमोड करून दर महिन्याच्या १५ तारखेला वाचकाच्या हाती समाजस्वास्थचा अंक कसा पडेल यासाठी रधों शेवटपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांनी लिहिलेलं ‘संततिनियमन’ हे पुस्तकदेखील अनेकांना मार्गदर्शक ठरलं. अशी पुस्तकं लोकांना वाचायला आवडायची, पण उघडपणे बोलण्याची मनाई होती. मार्गारेट सँगर न्यूयॉर्क येथून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रातून ‘व्हॉट एव्हरी मदर शुड नो’ या मथळ्याचं स्तंभ लिहीत असे. नंतर तिने ‘द वुमन रिबेल’ नावाचं नियतकालिक सुरू केलं. याशिवाय देखील रधोंनी आणि मार्गारेट सँगरनी लिहिलेलं भरपूर साहित्य आजही उपलब्ध आहे. मेरी स्टोप्सचं लिखाणदेखील उल्लेखनीय आहे. ‘मॅरिड लव्ह ऑर लव्ह इन मॅरेज’ या नावाचं पुस्तक तिनं आपल्या घटस्फोटाच्या कालावधीत लिहिलं. ‘वाइज पॅरेंटहूड’ हे तिनं लिहिलेलं दुसरं पुस्तक. या शिवाय संपूर्ण ग्रेट ब्रिटनमध्ये मेरी स्टोप्सनं संपादन केलेलं कुटुंब नियोजनाशी संबंधित ‘बर्थ कन्ट्रोल न्यूज’ हे नियतकालिक वाचलं जात असे.
अजून एक योगायोगाची गोष्ट म्हणजे साधारणत: चार-पाच वर्षांच्या अंतरानं तिघांनीही आपल्या देशातील पहिलं ‘बर्थ कन्ट्रोल क्लिनिक’ सुरू केलं. मार्गारेट सँगरनं १९१६ मध्ये न्यूयॉर्क येथे, रधोंनी १९२० साली मुंबईमध्ये तर मेरी स्टोप्सनं १९२१ साली लंडन येथे सुरुवात केली. मेरी स्टोप्सनी सुरू केलेल्या क्लिनिकचं नाव ‘मदर्स क्लिनिक’ असं होतं. मार्गारेट सँगर आणि मेरी स्टोप्सची एकदा प्रत्यक्ष भेट झाल्याचा उल्लेख आहे, पण रधोंची या दोघांशी कधीच भेट झाली नाही असं लक्षात येतं.
रधों आणि मार्गारेट सँगरमधील एक साम्य म्हणजे दोघांवरही समाजविरोधी कार्य करतात म्हणून खटले चालवले गेले. मार्गारेट सँगरला ‘बर्थ कन्ट्रोल क्लिनिक’ चालू केल्याच्या काही दिवसांतच अटक करण्यात आली. मार्गारेटला स्त्रियांच्या निरोगी प्रजनन स्वास्थ्यासाठी लढताना आठ वेळेस तुरुंगात जावे लागले. तरीही त्या दोघी आपल्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहीत.
मेरी स्टोप्स गर्भपाताच्या विरोधात होती. अनावश्यक गर्भधारणा नकोच, ‘साधनं’ वापरा या विचारावर तिचा भर होता. तिच्या क्लिनिकमधून सर्वाना मोफत सेवा देण्यात येत होत्या, मार्गारेट मात्र गर्भपाताच्या बाजूने होती, कारण बेकायदेशीर गर्भपाताने स्त्रियांचा जीव जात असताना तिने पाहिलं होतं.
मार्गारेट, अमेरिकी स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारी एक अतिशय उत्साही, न घाबरता काम करणारी स्वयंसेविका होती. तिच्या ‘बर्थ कन्ट्रोल क्लिनिक’चं रूपांतर ‘प्लॅन्ड पॅरेंटहूड’सारख्या संस्थेत ती करू शकली. मार्गारेटच्या निधनानंतर आजही न्यूयार्क येथे ही संस्था कार्यरत आहे. मेरी स्टोप्सच्या निधनानंतरदेखील तिनं सुरू केलेली ‘मेरी स्टोप्स इंटरनॅशनल’ ही लंगिक आणि प्रजननस्वास्थ्याशी संबंधित संस्था लंडन येथे कार्यरत आहे. रधोंच्या आयुष्यात असं घडलं नाही. इंग्लंड आणि अमेरिकेतलं वातावरण, तुलनात्मकदृष्टय़ा या सर्व गोष्टींसाठी भारताच्या मानानं पोषक होतं. त्यांना काही लोकांची साथ होती, कार्यकर्त्यांचं जाळं त्या दोघी निर्माण करून आपलं कार्य अखंड चालवू शकल्या. रधोंनी मात्र ही लढाई जवळपास एकटय़ानं लढली. त्यांचं व्यक्तिमत्त्व वादळी होतं. विचार क्रांतिकारक होते, पण पत्नी मालतीबाईशिवाय म्हणावी तशी ठोस अशी त्यांना साथ मिळाली नाही. स्त्रियांनादेखील पुरुषांइतकाच संभोगाचा आनंद घेता आला पाहिजे, असं म्हणण्याइतकं धर्य त्यांच्या स्थायी होतं, पण मार्गारेट आणि मेरी स्टोप्सइतकी आíथक मदत त्यांना मिळाली नाही.
काही जरी असलं तरी या तिघांनी आजच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमाची जगभर मजबूत पायाभरणी केली. सर्वानी अनुकरण करावं असं कार्य त्यांनी करून ठेवलं. विशेषत: रधोंनी. रधोंचे विशेष योगदान यासाठी, कारण रधों एक पुरुष असून स्त्रियांच्या हक्कांसाठी लढत होते. अमेरिकेत १९५३ साली किनसे रिपोर्ट, १९६६ साली मास्टर्स जॉन्सन रिपोर्ट, १९७६ साली जर्मनीत प्रकाशित झालेले स्त्री-पुरुषांच्या लंगिकतेबद्दलचे रिपोर्ट जगप्रसिद्ध झाले. या रिपोर्टमध्ये त्या वेळेस रधोंनी सांगितलेल्या ज्या विचारांना विरोध झाला त्याच विचारांची प्रशंसा करण्यात आली आहे, पण त्या क्षणाचा आनंद घेण्यासाठी रधों हयात नव्हते.
आपलं कार्य करत असताना या तिघांना कोणतीच अडचण फार मोठी वाटली नाही. कोणत्याचं नकारात्मक टीकेने किंवा कायदेशीर कारवाईनं त्यांचं लक्ष ध्येयापासून तसूभरही विचलित झालं नाही, म्हणूनच त्या वेळेसचं ते बर्थ कन्ट्रोल वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर ‘फॅमिली प्लॅिनग’ झालं आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला लोकसंख्या नियंत्रणाचं स्वरूप आलं आहे. रधों कर्वे, मार्गारेट सँगर आणि मेरी स्टोप्स या तिघांचे त्यांच्या या प्रेरणादायी कार्यासाठी आपण कृतज्ञ राहिले पाहिजे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / डॉ. किशोर अतनूरकर /लोकसत्ता
Leave a Reply