मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी ज्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वात आद्य संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद.
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समीक्षा यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम ही संस्था गेली अनेक वर्षे करते आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात मिळून संस्थेच्या ७० शाखा आहेत. दहा हजारापेक्षा जास्त आजीव सभासद असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव साहित्यसंस्था आहे. शतकोत्तर दशकपूर्ती करणाऱ्या या संस्थेची वाटचाल मराठी भाषा आणि साहित्य यांच्या प्रसारासाठी आणि विकासासाठी साह्यभूत ठरलेली आहे.
एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. १८७८ मध्ये पहिले ग्रंथकार संमेलन न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत भरले. दुसरे १८८५ मध्ये बुधवार पेठेतील सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये भरले. तिसरे संमेलन १९०५ मध्ये सातारा येथे भरले. ही संमेलने अनेकदा काही काही कारणांमुळे खंडित होत होती. या खंडित संमेलनांना एखाद्या स्थायी संस्थेचे स्वरूप देण्याचा पहिला प्रयत्न पुण्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात झाला. पुण्यात २६ आणि २७ मे १९०६ रोजी झालेले चौथे संमेलन विद्वान कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागनाथ पाराजवळच्या मळेकर वाड्यात भरलेले होते. लोकमान्य टिळक, न. चिं. केळ्कर, चिंतामणराव वैद्य, विसुभाऊ राजवाडे, पांगारकर, रेव्हरंड टिळक या संमेलनात सहभागी झाले होते. २७ मे रोजी समारोपाच्या दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषद आज रोजी स्थापन झाली आहे, अशी घोषणा केली. लो. टिळकांनी उठून या घोषणेला पाठिंबा दिला.
साहित्य परिषदेची पुण्याच्या टिळक रस्त्यावर जी इमारत उभी आहे, ती १९३५ पर्यंत अस्तित्त्वात नव्हती. तिची उभारणी टप्या टप्याने झाली. आरंभीच्या काळात या संस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रा. श्रीनिवास बनहट्टी, श्री. ना. ग. गोरे, रा. शं. वाळिंबे, प्रा. रा. श्री. जोग, ग. दि. माडगूळकर, गं. बा. सरदार, प्रा. वसंत कानेटकर, श्री. ज. जोशी, शंकरराव खरात, शंकर पाटील, ग. प्र. प्रधान, डॉ. सरोजिनी बाबर, राजेंद्र बनहट्टी, प्रा. द. मिरासदार, डॉ. प्र. चिं शेजवलकर अशा मान्यवरांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. पुणे शहराचा चालता बोलता इतिहास म्हणून ज्यां आदराने उल्लेख केला जातो असे ज्येष्ठ साहित्यसेवक म. श्री. दीक्षित परिषदेशी कार्यालय अधिक्षक, कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि विश्वस्त अशा अनेक नात्यांनी निगडित होते.
केवळ पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापर्यंत कार्यरत असणाऱ्या परिषदेच्या कार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे वाड्मयीन कार्यक्रमांचे आयोजन. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात स्मृतिदिन, व्याख्यानमाला, चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखती, मेळावे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (कै) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय परिषदेच्या वैभवात भर घालण्याचे काम करीत आहे. ५०,००० जुने नवे ग्रंथ, दुर्मिळ नियतकालिके, सर्व प्रकारचे कोश, संदर्भग्रंथ इथे असल्यामुळे हे ग्रंथालय अभ्यासकांच्या आकर्षणाचा विषय बनलेले आहे. अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन करण्याचे मोलाचे काम परिषद करीत आहे. सर्व वाडमय प्रकारातील पुस्तकांना पारितोषिके देऊन गौरविण्याचे काम परिषदेतर्फे केले जाते. मराठी भाषा, साहित्य यांच्या अध्ययनाच्या प्रसारासाठी विविध स्तरांवरील परीक्षांचे आयोजन परिषदेतर्फे केले जाते. या सर्व उपक्रमांबरोबर परिषदेने साहित्यिक साह्यनिधी उभा केला आहे. अपंग, वृद्ध, निराधार अशा साहित्यिकांना या निधीतून दरमहा मानधन देण्यात येते. अनेक प्रज्ञावंत साहित्यिकांनी आणि निष्ठावंत साहित्यसेवकांनी तन, मन आणि धन अर्पण करुन, आपल्या आयुष्यातला बाहुमोल वेळ देऊन ही संस्था नावारूपाला आणली. लो. टिळक, न. चिं. केळकर, कृ. प. खाडिलकर, वा. गो. आपटे, दा. ग. पाध्ये. विविधवृत्तकार मोरमकर रेव्हरंड जोशी, धनंजयराव पटवर्धन, न. र. फाटक, वा. दा. गोखले, गं. भा. निरंतर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ग. ल. ठोकळ, के. नारायण काळे, रा. श्री. जोग, श्री. के. क्षीरसागर, स. कृ. पाध्ये, अनंतराव कुलकर्णी, रा. ज. देशमुख, रा. शं. वाळिंबे, ग. दि. माडगूळकर, कवी यशवंत, न. का. घारपुरे, वि. भि. कोलते, भालबा केळकर, ना. ग. गोरे, दि. के. बेडेकर, गं. बा. सरदार, ग. वा. बेहेरे, अ. ना. भालेराव, म. वि. फाटक, म. ना. अदवंत, कृ. ब. निकुम्ब, वा. रा. ढवळे, श्री. ना. बनहट्टी, स. गं. मालशे, श्री. ज. जोशी, शंकर पाटील, भालचंद्र फडके, वि. स. वाळिंबे, व. दि. कुलकर्णी, गो. म. कुलकर्णी, शंकरराव खरात, भीमराव कुलकर्णी या मान्यवरांनी संस्थेच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. या कर्तुत्त्वसंपन्न परंपरेत मोलाची भर घालून परिषदेची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम डॉ. गं. ना. जोगळेकरांनी केले.
१९६१ मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्था मिळून महामंडळ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी, समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. त्यातही भाषेच्या प्रश्नाला अग्रक्रम देण्यात आला होता. दत्तो वामन पोतदारांबरोबर विदर्भ साहित्य संघाचे ग. त्र्यं. माडखोलकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अनंत भालेरव, भगवंतराव देशमुख, नरहर, कुरुंदकर आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे वा. रा. ढवळे आणि पत्रकार श्री. शं. नवरे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते.
महामंडळाच्या स्थापनेच्या वेळी महामंडळाने अखिल भारतीय मराठी भाषकांची संमेलने भरविण्याचे काम हाती घ्यावे असे आपल्या घटनेत नमूद केले. त्यानुसार १९६५ च्या सुरुवातीला संमेलनाची योजना पूर्ण करून ते काम महामंडळाने आपल्या हाती घेतले. या योजनेनुसार डिसेंबर १९६५ मध्ये प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबादला जे संमेलन भरले होते, ते साहित्य महामंडळाचे पहिले संमेलन ठरले, त्यापूर्वी १९६४ पर्यंतची ४५ साहित्य संमेलने भरविण्याचे महत्त्वाचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले.
१९६४ साली कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगाव (गोवा) येथे भरलेले संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेले शेवटचे संमेलन. आपली साहित्य संमेलने गणनेसाठी उदारपणे साहित्य महामंडळाला देऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेने महामंडळासाठी मोठाच त्याग केलेला आहे. त्यामुळेच संमेलनाची गणना होती तशीच कायम राहिली आणि हैदराबादचे संमेलन हे महामंडळाचे पहिले संमेलन असूनही ते सेहेचाळीसावे संमेलन ठरले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मोठे असले तरी त्यात सहभागी होणाऱ्या लेखक, कवी, वक्त्यांच्या संख्येला मर्यादा येते. त्यामुळे इच्छा असूनही सर्वांना कार्यक्रमात सहभागी करून घेणे अवघड जाते. त्या त्या विभागातील प्रतिभावंतांना अभिव्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करावे या भावनेतून विभागीय साहित्य संमेलनाची कल्पना पुढे आली. गेल्या काही वर्षांत विभागीय साहित्य संमेलनांना मिळणारा प्रतिसाद विलक्षण आहे. प्रतिभेचे अनेक नवीन कवडसे अशा संमेलनातून साहित्यक्षेत्राला मिळाले आहेत. मसापच्या विविध शाखांनी आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलनांनी आदर्श नियोजनाचा आणि गुणवत्तपूर्ण कार्यक्रमांचा वस्तुपाठ निर्माण केला.
जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि उदारीकरणाचे जीवनाच्या सर्व क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत. जगण्याचा तीव्र झालेला संघर्ष, साहित्यातूनही तेवढयाच प्रभावीपणे प्रकट होत आहे. बदलांचा वेध घेत जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत रचनात्मक अशी कामे उभी करण्याचा प्रयत्न परिषदेने यापूर्वी केलेला आहे आणि या नंतरही तो तसाच पुढे चालू राहील.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply