सौराष्ट्राच्या पुण्यभूमीत असलेल्या या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ असं नाव पडण्याविषयीची कथा आपल्या स्कंदपुराणात आहे. त्यात म्हटलं आहे की, “चंद्राला अनेक बायका होत्या पण चंद्राचं रोहिणीवर प्रेम जास्त होतं. साहजिकच दशकन्यांनी आपला पिता दक्ष याच्याकडे त्याविषयी तक्रार केली. दक्षाने चंद्राला बोलावून रोहिणीप्रमाणेच सर्व बायकांवर सारखं प्रेम कर असा सल्ला दिला पण चंद्राचं गाड पूर्वीप्रमाणेच असल्याचं त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तुझा क्षय होईल असा शाप दिला. त्याबरोबर चंद्र घाबरला आणि त्याने भगवान शंकराकडे धाव घेतली व भगवान शंकरांनी त्यावर त्याला किंचित सूट दिली व “महिन्यातून तुझा अर्धा भाग वाढेल व अर्धा भाग क्षय होईल आणि एक दिवस पूर्ण क्षय होईल” असे सांगून भगवान शंकर गुप्त झाले व त्याच ठिकाणी तेजस्वी स्वरुपात ज्योतिर्लिंग प्रगट झाले. चंद्राने (सोम) अत्यंत भक्तिभावाने लिंगाची पूजा केली हेच ते सोमनाथ ज्योतिर्लिंग. अशा या पवित्र देवालयावर धार्मांध मुस्लिमांनी वारंवार हल्ले करुन वेळोवेळी प्रचंड नुकसानही केले. इ.स. ७२२ साली सिंध प्रांतात सुभेदार असलेल्या जुनायदने, नंतर इ.स. १०२५ साली गझनीच्या महम्मदने तर १२९७ साली अल्लाउद्दिन खिलजीने, १३९० ला मुजफ्फर शहाने, १४७९ ला महंमद बेगडाने, १५०३ साली दुसरा मुजफ्फर शहाने व १७०१ मध्ये औरंगजेबाने स्वार्या केल्या व प्रचंड लूटही केली. परंतु त्यानंतर मंदिर उभारलं तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी जीर्णोद्धार केला आणि या दिव्य ज्योतिर्लिंगाची शुद्ध प्रतिष्ठापना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केली आणि प्रकांडपंडित लक्ष्मणशास्त्री जोशींनी स्वत: पौराहित्य केले.
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply