’सर्पट्या’ चेंडूच्या (गुगली) शोधाचे श्रेय ज्याला दिले जाते त्या बर्नार्ड जेम्स टिन्डल बोसांकेचा जन्म १३ ऑक्टोबर १८७७ रोजी मिडलसेक्समध्ये झाला (इंग्लंड). गुगली ही ऑस्ट्रेलियात अजूनही राँगवन् (किंवा घाईतील उच्चारात राँगन्) म्हणून प्रसिद्ध आहे. बर्नार्डच्या नावावरून कुणीकुणी तिला ‘बोसी’ असेही म्हणतात.
सर्पट्याच्या आविष्काराची कथा बिलियर्ड्सच्या टेबलापर्यंत आपल्याला नेऊन सोडते. ट्विस्टी-टूस्टी नावाच्या खेळाच्या एका प्रकारात टेबलावर चेंडू असा आपटायचा असतो की टप खाऊन उडाल्यानंतर तो समोरच्या भिडूला झेलता येऊ नये. टेनिसच्या चेंडूने हा खेळ खेळताना बोसांके चेंडूला फिरक देई. (कॉलेजकडून तो हातोडाफेकीतही खेळलेला होता.)
बिल्यर्डसच्या टेबलावर आपल्याला गुगलीची कल्पना सुचली अशी आठवण बर्नार्डने नंतर सांगितलेली आहे. हा चेंडू वळेपर्यंत लेगब्रेकसारखा वाटतो – म्हणजे उजव्या हाताने खेळणार्या फलंदाजापासून, टप्पा पडल्यानंतर तो दूर जाईल असे भासते पण – टप्पा पडल्यानंतर तो फलंदाजाकडे झपकन येतो (म्हणजे हा ऑफब्रेक असतो पण भासतो लेगब्रेकसारखा). सापाने झटकन दुसर्या बाजूला वळावे तसे – म्हणून ‘सर्पट्या’.
एका कथेनुसार १९०३-०४ च्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर बोसांकेने सर्पट्या टाकून व्हिक्टर ट्रम्परची मधली दांडी उखडविली होती आणि प्रतिस्पर्धी कर्णधाराला अनेकदा ती फसवेगिरी वाटे.
बोसांके सातच कसोट्यांमध्ये खेळला आणि त्याने २५ बळी मिळविले. त्याची गडी बाद करण्याची गती प्रचंड होती. सरासरी ३९ चेंडूंमागे (म्हणजे दर साडेसहा षटकांनंतर) तो एक बळी मिळवे ! कारकिर्दीत किमान २५ बळी घेणार्या गोलंदाजांच्या कामगिरीचा विचार करता फक्त दोघाच जणांची ’मारगती’ (एक बळी घेण्यासाठी टाकावे लागलेले चेंडू) बर्नार्डपेक्षा चांगली आहे.
१३ ऑक्टोबर १९८७ रोजी विश्वचषकाच्या सामन्यात विविअन रिचर्ड्सने श्रीलंकन गोलंदाजाची पाठच काय – पोटेही मऊ केली. कराचीत झालेल्या सामन्यात त्याने अवघ्या सव्वाशे चेंडूंवर १८१ धावा फटकावल्या. शतकानंतरच्या त्याच्या ८१ धावा अवघ्या २७ चेंडूंवर आलेल्या होत्या. विंडीजने ४ बाद ३६० धावा उभारल्या. त्यावेळची एकदिवसीय सामन्यांमधील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती. असांथा डिमेलने विवला बाद केले पण आपल्या १० षटकांच्या कोट्यात ९७ धावा देत त्याने विश्वविक्रम केला. त्याच्याहून अधिक धावा देणारे वीर नंतर निघाले हा भाग वेगळा.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply