नवीन लेखन...

विंदांच्या १५ व १९ शब्दांच्या बालकविता..

15 and 19 Words Poems for children by Vinda Karandikar

विंदाच्या बालकविता भन्नाटच आहेत. कारण त्या दोन पातळीवर आहेत. जेव्हा त्या कविता मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा, मूल समजून घेण्याचा नवीन दृष्टीकोन देतात. या बालकविता मोठ्या माणसांना अधिक प्रगल्भ करतात.

मुलांसोबत विंदांच्या बालकविता वाचताना तर मी अनेकवेळा थरार अनुभवला आहे. त्यांची सर्कसवाला ही दीर्घ कविता तर मास्टरपीस आहे. या कवितेची शैली इतकी चित्रमय आहे की वाचता वाचता आपल्या डोळ्यासमोरून एक चित्रपटच सरकू लागतो. या कवितेतून विंदांनी मुलांचं भावविश्व अलवारपणे उलगडलं आहे. दोस्ती, प्रेम, असूया,जिव्हाळा आणि असाह्यता या भावभावनांचा गोफ या कवितेत असा घट्ट विणला आहे की कवितेचा शेवट जसजसा जवळ येऊ लगतो तेव्हा व्याकूळ होणारी मुले मी पाहिली आहेत.

विंदाच्या बालकविता मुलांसोबत वाचताना मी अनेकवेळा मुलांशी त्याबाबत बोलत असे. मुले कविता ऐकल्यानंतर त्यांना खास भावलेल्या त्यातल्या गोष्टी सांगत,’हे असं का असेल’ असा विचार करुन आपलं वेगळं मत मांडत असत पण खरं म्हणजे मला मुलांकडून त्यावेळी एक ‘मास्टर की’ मिळत असे. त्या मास्टर की ने मी विंदांच्या बालकवितेतली अनेक कुलुपं उघडली आहेत.

‘अजबखाना’ या कविता संग्रहातील दोन अगदी लहान कवितांमधल्या महान गमती मी तुम्हाला सांगणार आहे. या कविता आहेत फक्त १५ व १९ शब्दांच्या. पण या कवितांमधले अर्थ जेव्हा मला उलगडले तेव्हा मी पार बदलून गेलो. या दोन कवितांसाठी मी विंदंचा आजन्म ऋणी आहे.

सही

विठोबापुढे
ठेवून वही
उदयने मागितली
त्याची सही.

विठोबा म्हणाला
त्याला मजेत,
“देवांना नसतें
लिहायला येत!”

ही कविता ऐकताना मुले खळखळून हसतात. पण ‘देवांना का लिहायला येत नसेल?’ या प्रश्नावर मुलांशी बोलताना मजा येऊ लागली. मुलांसाठी देव हा देवबाप्पा असल्याने ती

त्याच्या विषयी एकेरीतच बोलत होती. अचानक एका मुलाने मला प्रश्न विचारला, “पण आपण का लिहितो?” मी त्यावेळी त्या मुलाला काहीबाही उत्तर दिलं. पण त्या प्रश्नाचा भुंगा माझ्यामागे लागला. मी कविता पुन्हा पुन्हा वाचत राहिलो. आणि असं वाटलं, आपण हिशोबी असतो म्हणून लिहितो. काही हिशोब ठेवण्यासाठी म्हणून लिहितो. मग पुढचा प्रश्न ओघाने आलाच. ‘देव का लिहित नाही?’ आणि या कवितेच्या संदर्भात त्याचं उत्तर ही मिळालं.

‘देवाचं मुलांवर बेहिशोबी प्रेम असतं, अपार प्रेम असतं म्हणून देवाला ‘किती प्रेम आहे’ हे लिहिता येत नाही. आपलं प्रेम ही व्यक्त करण्याची गोष्ट आहे, प्रेम ही अविरत सुरू असणारी कृती आहे. आणि प्रेमाचा हिशोब ही ठेवता येत नाही. खरं म्हणजे, प्रेम ही काही फक्त लिहिण्याची गोष्ट नाही. म्हणूनच विठोबा उदयला हे सारं ‘मजेत’ म्हणाला आहे, गंभीरपणे नव्हे, हे ही लक्षात घेतलं पाहिजे.

मी मुलांवर अपार, अमर्याद प्रेम करायला पाहिजे. माझं मन मोठं करुन मी समोरच्या मुलाला समजून घेतलं पाहिजे. माझ्या प्रेमाची जाणीव मी मुलांना मजेत करुन दिली पाहिजे, असं मला ही ‘सही’ कविता सतत सांगत असते.

विंदांची दुसरी अगदी इटुकली कविता आहे, मावशी.”

जेव्हा प्रथम ही कविता वाचली तेव्हा या कवितेत काही खास आहे असं जाणवलंच नाही. या कवितेत प्रचंड ऊर्जा दडली आहे हे आतपर्यंत भिडलंच नाही. या कवितेतला नाद आणि नातेवाईक मुलांना आवडत असावेत असंच वाटायंच मला. मुले ही भरभरुन दाद द्यायची या कवितेला. या कवितेत काकू आहे, आत्या आहे व मावशी आहे. कविता वाचल्यानंतर सहज एकदा मुलांना विचारलं,’या कवितेतली तुम्हाला काकू आवडते, आत्या आवडते की मावशी आवडते?ठ मी हा प्रश्न विचारला तेव्हा समोर किमान हजार मुलं दाटीवाटीने बसलेली होती. बाजूला दोन तीनशे मोठी माणसं. प्रश्न ऐकताच सगळी मुले एका सुरात ओरडली,  `मावशी… मावशी….मावशी.. आवडली आम्हाला!’

त्यावेळी मोठ्या माणसांच्या चेहऱ्यावरचं मोठं प्रश्नचिन्हं वाचता येत होतं. मुलांच्या चेहऱ्यावरून अपरंपार आनंद ओसंडून वाहात होता! मी तर अवाक झालो होतो!!

ही १९ शब्दांची कवीता मी पुन्हा पुन्हा वाचली. मुलांसोबत अनुभवली आणि एकाक्षणी मला ते कोडं सुटलं! आपण आजपर्यंत काय चूक करत होतो, हे स्वच्छंपणे समजलं. आणि आता या क्षणापासून आपण काय करायला पाहिजे ते लख्खंपणे उलगडलं. ही कविता मला सदैव धीर देते. मला धाकात ठेवते. मूल समजून घेण्याचि माझी प्रेरणा सतत तीव्र करत राहाते.

मावशी

सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासाठी
आणते चाकू.

कोल्हापूरहून
येते आते;
माझ्यासाठी
आणते पत्ते.

राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पापा घेते.!

‘मुलांना मावशी का आवडत असावी?’ या प्रश्नाचा अक्षरश: ध्यास घेतला. कधी मुलांशी तर कधी मोठ्यांशी पण याबाबत बोलत राहिलो. पण कोडं सुटत नव्हतं. पण जेव्हा हाच प्रश्न मी मलाच विचारला तेव्हा साक्षात्कार झाल्यासारखा तो प्रश्न सुटला.

या कवितेतील काकू मुलासाठी चाकू आणते.या कवितेतली आत्ते मुलासाठी पत्ते आणते. पण या कवितेतली मावशी मुलासाठी काहीच आणत नाही. तरी हि सगळ्या सगळ्या मुलांना ही मावशीच आवडते!! कारण मोठ्या माणसांना असं वाटतं की आपण मुलांना काही दिलं तर आपण मुलांना आवडू. मुलांना खाऊ दिला, खेळणी दिली किंवा महाग वस्तू दिल्या तर आपण त्यांना नक्कीच आवडू. पण नाही!

काकू चाकु आणते. आत्ते पत्ते आणते. पण या दोघी जणी मुलाशी बोलत नाहीत. त्याला जवळ घेत नाहीत. मुलाचा आत्मसन्मान जपत नाहीत९

मावशी काही आणत नाही तर ती मुलाकडून घेते. मुलाचा मायेने, प्रेमाने पापा घेते. त्याला जवळ घेते. मावशी तिचं प्रेम तिच्या कृतीतून तिच्या स्पर्शातून व्यक्त करते. मुलाचा आत्मसन्मान ऊंचावते. मुले महागड्या वस्तूंची, खेळण्यांची किंवा खाऊची भुकेलेली नसतात तर प्रेमाचि भुकेली असतात. ‘आपणाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून किंमत असावी’ इतकीच माफक अपेक्षा मुलांची असते.

आपण मुलांना ‘देणारे’ नव्हे तर मुलांकडून ‘घेणारे’ व्हायला पाहिजे तरच आपण मुलांचे होऊ, असं मला ही कविता सांगत असते. आपण मुलांची मावशी व्हायला पाहिजे, अशा धाकात ही कविता मला ठेवते.

‘ओळखीच्या किंवा अनोळखी मुलांना भेटल्यावर आपली कृती ही प्रेममयच असली पाहिजे, मी अधिकाधिक मन मोठं करुन समोरच्या मुलाला समजून घेतलं पाहिजे’ असं मला हे विंदांचे 15 व 19 शब्द सतत बजावत असतात,माझ्या भोवती फेर धरुनच असतात.

आता सांगा, मी कसं म्हणू की विंदा गेले..? ते तर माझ्या सोबतच आहेत. मला मुलं कधीच एकटी भेटत नाहीत, त्यांच्यात दडलेले विंदा मला भेटतात ना! हा अजबखाना आहे!!

– राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..