कावळ्याचा रंग कोणता ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याकडे आपण नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहू… ‘काळा’ रंग असे उत्तर देऊन मोकळे होवू.. कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो.
पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो. ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे.
ब्रिटीशकालीन असलेले हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या संग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे. या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.
पुरातत्व दालनात आपल्याला वाकाटककालीन शिल्पे, शिलालेख पाहायला मिळतात. याठिकाणी असलेले मांढळ येथे सापडलेले महासदाशिवाचे शिल्प उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर मोहोंजदडो येथील उत्खननात सापडलेल्या दुर्मिळ वस्तु, शिल्प तसेच कौण्डीण्यपूर येथे सापडलेली अश्मयुगीन हत्यारे आपणास पाहावयास मिळतात. भेडाघाट येथे सापडलेली यक्ष व यक्षिणीची शिल्पे, कला इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.
शस्त्र दालनात मोगल, इंग्रज, मराठा, राजपूत यांची निवडक शस्त्रे, आदिवासींची शस्त्रे तसेच चिलखत, टोप, धातूच्या साखळीच्या सहाय्याने बनवलेला अंगरखा आहे तर, कला व उद्योग विभागात हस्तीदंत, लाकूड, चांदी, संगमवरी यापासून तयार केलेल्या कोरीव वस्तु प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून जातात.
येथील प्राणिशास्त्र विभाग प्रेक्षकांना सर्वाधिक आकर्षित करणारा आहे. टॅक्सीडर्मी केलेले (भुसा भरलेले प्राणी) मगर, जंगली पशु,किटक,मासे,मगर असे नानाविध प्रकारचे प्राणी इथे आपल्याला भेटतात. पक्षी दालनात असलेला कावळा हा येथील आकर्षण आहे. प्रेक्षकांची पावले हमखास या पांढऱ्या कावळ्याजवळ थबकतात.
या दालनांसोबत तुम्ही चित्रकला दालनाला नक्की भेट द्या. विदेशातील नामवंत चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेली दुर्मिळ चित्रे इथे आहेत. जलरंग, तैलरंग अशा माध्यमातील वस्तुचित्रे, निसर्गचित्रे,व्यक्तीचित्रे नजरेचे पारणे फेडतात. धुरंधर, एस.एम.हळदणकर, एम.आर.आचरेकर, हेब्बर आदी प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे या दालनात आहेत. याठिकाणी हळदणकरांचे ‘निरांजनी’ हे गाजलेले चित्र आहे. हे चित्र पाहताना चित्रकाराने साकारलेल्या रंगछटा आणि टिपलेला बारकावा यांचा अनुभव थक्क करणारा आहे. भव्य परीसरात वसलेल्या या वस्तुसंग्रहालयाचे सध्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. अभिरक्षक (क्युरेटर) म्हणून श्री.गठाणे या वस्तुसंग्रहालयाचे काम पाहत असून चित्रकार श्री.मंडपे यांचे त्यांना सहाय्य लाभत आहे. प्रेक्षकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत संग्रहालय खुले असते.
अनेकविध दुर्मिळ वस्तूंचा नजराणा असलेल्या या वस्तुसंग्रहालयास एक वेळ अवश्य भेट द्या.
— काशीबाई थोरात (संदर्भ – महान्यूज)
Leave a Reply