भाग ३ – थोडी पार्श्वभूमी
१७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्यानात घेऊनच. शाहूला स्वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्यासाठी त्याच्या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्यातील हिस्सा त्याला दिला की तो खुष होता. राजारामाच्या वेळेपासूनच वतनांच्या प्रथेचे पुनरुज्जीवन झालेले होते. ताराबाईला शह देण्यासाठी शाहूलाही तेच धोरण चालू ठेवावे लागले. उत्तरेत स्थिरावण्यासाठी बाजीरावालाही आपल्या सरदारांना वतने द्यावी लागली. १७४० मध्ये नानासाहेब पेशवा झाला तेव्हा हे सर्व सरदार-वतनदार चांगलेच स्थिरावलेले होते. शाहूने नानासाहेबाला पेशवा म्हणून नेमले तेव्हा पेशव्यांची गादी वंशपरंपरेने भट घराण्याकडे राहण्याचा करार झालेला नव्हता. त्यामुळे जुन्या सरदारांना सांभाळून घेणे नानासाहेबाला आवश्यक वाटत होते. म्हणून, जानेवारी १७६० मधील दत्ताजीच्या मृत्यूनंतर नानासाहेब मल्हारराव होळकराबद्दल, ‘‘मल्हाररावांनी आधी काम कोणते करावे मग कोणते करावे . . . तो विचार त्यांनी न केला’’, असे नाराजीने जरी बोलतो, तरीही त्याला अब्दालाशी सामना करायला भाऊबरोबर धाडतो, अशी स्थिती आपल्याला दिसून येते.
नानासाहेबाला मराठ्यांच्या राज्यांतर्गत असलेला विरोध एकदम नाहीसा झाला असे नव्हते. १७५० मध्ये त्याने सातार्याच्या रामराजाशी करार केला खरा, पण त्यानंतरही काही वर्षे ताराबाई राजकारणी खेळी खेळण्याचे प्रयत्न करतांना आपल्याला दिसते. रघूजी भोसल्यासारखा शाहूचा जुना व मातबर सरदार १७५५ पर्यंत हयात होता. बडोद्याचे गायकवाडही १७५१ नंतरच नमले ( आणि त्यानंतरही १७६८ पर्यंत संपूर्णपणे झुकेले नव्हते ). १७५६ पर्यंत तुळाजी आंग्रेही प्रबळ होता. ( इतका प्रबळ की मुंबईकर इंग्रजांची मदत घेऊनच नानासाहेबाला त्याचा पाडाव करता आला. ) थोडक्यात काय, तर १७५० ते १७६० या दशकातील निम्म्याहूनही अधिक काळ जाईतो मराठी सत्ता नानासाहेबाच्या हातात केंद्रित झालेली नव्हती.
मराठ्यांना बाहेरील शत्रूही अनेक होते. मराठे प्रबळ असले तरी त्यांची भारतावर निरंकुश सत्ता नव्हती. माळव्यात शिंदे-होळकर यांचे बस्तान बसले होते, परंतु मुघली सत्तेचा प्रभाव नाहीसा झाल्यामुळे राजपूत राज्ये स्वतंत्र झालेली होती. त्यांच्या वारंवार मराठ्यांशी लढाया चालतच असत. १७५१ मध्ये जयपूरजवळ राजपूतांनी मराठ्यांना कापून काढले होते. जयपूरचा राजा माधोसिंग मराठ्यांविरुद्ध अब्दालीशी संधान बांधून होता. १७१८ पासूनच चूडामण जाट प्रबळ झालेला होता. १७५२ मध्ये बरामसिंग व १७५६ पासून सूरजमल हे जाट राजे चांगलेच ताकदवर झालेले होते. जाटांचा कुंभेरीचा किल्ला सर करायचा नाद मराठ्यांना सोडून द्यावा लागला होता. १७२१ पासून रोहिले रोहिलखंडात स्थिरावले होते व १७४१ पासून चांगलेच शक्तिशाली झालेले होते. शेजारीच बंगश अफगाणही होते. १७२२ पासूनच अवधचा नबाब जवळजवळ स्वतंत्र झालेला होता. निजाम व इंग्रज या सत्ताही बलवान होत्या. १७५८ला बुसी निजामाची चाकरी सोडून फ्रान्सला परत जाईपर्यंत निजाम चांगलाच प्रबळ होता. १७५७ला प्लासीची लढाई इंग्रजांनी जिंकलेली होती. मुंबई व मद्रास इथून त्यांच्या कारवाया सुरूच होत्या. त्याशिवाय गोव्याला पोर्तुगीज होते. फ्रेंचांच्या कारवायाही थोड्याफार चालू होत्या.
ह्या स्वतंत्र सत्तांना नाममात्र मुघल बादशहा टिकून राहण्यात कोणतीच हरकत दिसत नव्हती. त्यांना मराठ्यांबद्दल कसलीच आपुलकी नव्हती. मराठे दिल्लीपती होऊन आपल्याला नामशेष करतील अशी त्यांना भीती होतीच. म्हणून ते मराठे सरदारांमध्ये फूट पाडायचा नेहमी प्रयत्न करत राहिले.
१७५० ते १७६० हा काळ अंतर्गत विरोध नष्ट करून मध्यवर्ती, एककेंद्रित अशी मराठ्यांची सत्ता स्थापण्याचा काळ होता. ते साधून त्याचवेळी मराठ्यांची सत्ता भारतात पसरवणे हा नानासाहेबाचा हेतू होता. त्यासाठी त्याला नामधारी बादशहाच्या सनदा व फर्मानांचा उपयोग करून घेता येत होता. बादशहाला दूर सारून मराठ्यांनी दिल्लीपती होण्यासारखी परिस्थिती १७६० पर्यंत आलेलीच नव्हती.
( पुढे चालू )
— सुभाष स नाईक
Leave a Reply