भाग ५ –
ऑगस्ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्लीपती बनण्यासाठी अनुकूल नव्हती
स्वारीस निघाल्यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्वारीत मराठ्यांना येऊन मिळण्याविषयी पत्रे पाठवली होती. त्याने गुजरातेतील कमालउद्दीन बाबी याला बोलावले, अयोध्येच्या शुजाला बोलावले, बुंदेलखंडातील हिंदुपत वगैरे राजे, राजपुतान्यातील बिजेसिंग, माधोसिंग वगैरेंना मदतीस आणण्याबद्दल गोविंदपंत बुंदेल्यास लिहिले. सूरजमल तर दिल्लीस आल्यावरही काळी काळपर्यंत भाऊबरोबर होता. अब्दालीशी लढायला आल्यावर आणि त्यासाठी हिंदुस्थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्यावर आणि स्वतः अब्दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्यावर, मराठ्यांना त्यावेळी दिल्लीपती कसे होता आले असते ?
ध्यानात घ्या, शाहूचे धोरण होते की मुघल सल्तनत नष्ट न होता मराठ्यांचे महत्त्व वाढावे. त्याच्या मृत्यूनंतर १७६० पर्यंत केवळ १०च वर्षे गेलेली होती. त्यातील पहिली ५-६ वर्षे तर अंतर्गत सत्ता केंद्रित करण्यातच गेलेली होती. मागील ४३॥ वर्षे चालत आलेले धोरण आमूलाग्र बदलण्यासाठी, दिल्लीचा वंश राखण्याऐवजी स्वतःच दिल्लीपती बनण्यासाठी, १० वर्षांचा ( खरे तर ४-५ वर्षांचाच ) काळ अपुरा होता. शिवाजीचेच उदाहरण घ्या. हिंदवी स्वराज्याचे ध्येय त्याच्यापुढे सुरूवातीपासून होते. तरीही, तोरणा घेतल्यापासून ते राज्याभिषेकापर्यंत त्याला २९ वर्षे लागली. नानासाहेबाला तर शाहूमुळे अस्तित्वात आलेले धोरण संपूर्ण उलटे फिरवायला लागणार होते. पुढे काही वर्षांनी योग्य वेळ येताच त्याने बादशहाला बाजूस सारलेही असते. जानेवारी १७६० नंतर, दत्ताजी पडल्याची बातमी मिळाल्यावर, मल्हाररावाची चूक दाखवतांना, ‘‘मल्हाररावांनी आधी काम कोणते करावे मग कोणते करावे . . . माधोसिंगाचा मजकूर काय ! जेव्हा म्हटले तेव्हा पारिपत्य होते, तो विचार त्यांनी न केला’’, अशा त्याच्या शब्दांचा उल्लेख आलेला आहे. जयपूरच्या राजाच्या पारिपत्याला ही वेळ योग्य नव्हे, हे ज्या नानासाहेबाला समजते, त्याला, दिल्लीच्या पातशहाला दूर सारून मराठ्यांची स्वतः दिल्लीपती होण्यांसही ही वेळ योग्य नाही, एवढा सारासार विचार नसेल, असे संभवत नाही. पानपतावर मराठे जर जिंकले असते, तर पुढे काही वेगळे घडलेही असते; पण तसे घडायचे नव्हते !
महादजी
आता आपण महादजीकडे वळू. मराठ्यांसाठी त्याने दिल्लीची मुतलकी मिळवली, ती घटना आहे १७८४ची. त्याआधीची व त्याच्या काळातही राजकीय आणि सैनिकी परिस्थिती काय होती ते आपण जाणून घ्यायला हवे.
१७६५ मध्ये बादशहाने इंग्रजांना बंगालचे दिवाण नेमले होते. १७५९च्या सुमारास वझिराकडून त्यांना सुरतेचा किल्ला व शिद्दीच्या जागी मुघली साम्राज्याच्या आरामाराची मुख्य सत्ता मिळालेली होती. पुढील २०-२५ वर्षांमध्ये ते चांगलेच प्रबळ झालेले होते. मराठ्यांनी इंग्रजांना वडगाव व सिप्री येथे हरवले होते व त्यात महादजीचा हात होता हे खरे, पण इंग्रजांनीही महादजीला १७८० मध्ये गुजरातेत व १७८१ मध्ये कोलरस येथे हरवले होते. थोडक्यात काय, तर, त्याकाळी इंग्रज ही मराठ्यांना तुल्यबळ अशी शक्ती झालेली होती. उत्तर हिंदुस्थानात ते कधीचे अलाहाबादपर्यंत येऊन पोचलेले होते. शीखही प्रबळ होऊ लागले होते. राजपूत तर प्रबळ होतेच. ( पुढे १७८७ मध्ये महादजी व मोगली सेना युद्ध हरली, आणि एवढे झाले की महादजीला एक वर्ष इकडून तिकडे भटकत घालवावे लागले व नाना फडणिसाची मदत मागावी लागली. ) ह्यावरून ध्यानात येईल की, १७८४ मध्ये महादजी मुतलक (मुतालिक) झाला खरा, पण तेथे आपला अधिकार टिकवून धरण्याएवढी शक्ती त्याच्याकडे नव्हती. १७८८ मध्ये सुद्धा महादजी पुन्हा दिल्लीला पोचला तो नानाने पाठवलेल्या तुकोजी होळकर व अलीबहादुर यांची मदत घेऊनच. पुढे १७९२ पर्यंत त्याला राजपूत व इतर राजांशी सतत लढाया करत राहावे लागले.
महादजीकडे मराठ्यांमधील निरंकुश सत्ताही नव्हती. नाना फडणिसाला त्याचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. १७८४ मध्ये जेव्हा बादशहाने महादजीला वकील-इ-मुतलक म्हणून नेमले, त्याचवेळी महादजीने त्याच्याकडून पेशव्याची नायब-इ-मुनाइब व बक्षी-उल्-ममालिक अशी नेमणूक करून घेतली होती. वस्तुतः पेशव्याच्या नेमणुका मुघली राज्याच्या संदर्भात होत्या, तर महादजीची केवळ बादशहाच्या व्यक्तिगत संदर्भात. परंतु , महादजीने पेशव्यांपेक्षा मोठा सन्मान स्वीकारला आहे असे त्यावेळी नानाने नाराजीने महादजीला कळवले. म्हणून महादजीला तो सन्मान बादशहातर्फे पेशव्याच्या नावे देववावा लागला आणि स्वतःची नेमणूक पेशव्याचा सहाय्यक म्हणून करून घ्यावी लागली. महादजीचे होळकरांशी पटले नाही. १७८८ मध्ये तुकोजी होळकर व अलीबहादुर यांचे त्याच्याशी वाटपावरून भांडण झाले. हा सर्व गुंता सोडवण्यासाठीच त्याला १७९२ मध्ये पुण्याला जावे लागले आणि तेथेच त्याचा १७९४ मध्ये अंत झाला.
महादजीला इंग्रजांच्या प्राबल्याची पूर्ण कल्पना आलेली होती. नानाच्या मदतीशिवाय त्याचे चालले नसते. जो नाना महादजीच्या मुतलकीच्या नेमणुकीबद्दल नाराजी दाखवतो, त्याला एवढे खचितच समजत होते की मराठ्यांनी दिल्लीपती होणे म्हणजे महादजीला अधिक प्रबळ बनवणे. स्वतःचा अधिकार अबाधित ठेवणारा नाना महादजीचे महत्त्व वाढू देण्यास तयार झाला असता काय, ह्याचे उत्तर अगदी सरळ आहे.
( पुढे चालू )
— सुभाष स नाईक
Leave a Reply