भाग ६ – थोडे मानसशास्त्रीय विश्लेषण
१८व्या शतकातील मराठे दिल्लीस जाऊन पोचले परंतु दिल्लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्टीचा विचार करतांना दिल्लीला धडक देणार्या व्यक्ती कोण होत्या, हे पुन्हा एकदा विचारात घेणे आवश्यक आहे. आधी हा उल्लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्वतः राजा नव्हता, ते कुणा दुसर्याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना नव्हते. धोरण ठरवणारे त्यांचे धनी ( आणि त्या धन्यांच्या जवळचे इतर राजकारणी ) एक हजार मैल दूर, लांब दक्षिणेत बसलेले होते. दिल्लीस जाऊन धडकल्यावर, मराठ्यांना दिल्लीपती बनवण्यासाठी बाजीराव, भाऊ व महादजी या तिघांपुढे दोनच पर्याय असू शकले असते – एक पर्याय म्हणजे छत्रपतीच्या द्वारे दिल्लीश्वर म्हणून ग्वाही फिरवणे आणि दुसरा म्हणजे स्वतःच दिल्लीपती बनणे.
ज्या काळात स्वामिनिष्ठेला व इमानाला अत्याधिक महत्त्व दिले जात असे, त्या काळात स्वामीला दूर सारून, किंवा त्याच्या मर्जीविरुद्ध स्वतःच अधिपती बनणे, त्यांच्या विरोधात गेले असते. महादजीला जहागिरीचा अधिकार प्राप्त झाला, तोच मुळे माधवराव पेशव्यामुळे. म्हणून त्याच्या मनात पेशव्यांबद्दल कृतज्ञतेची भावना असणे स्वाभाविक आहे. नानासाहेबाने अधिकार हातात घेतले, तरी तो स्वतः छत्रपती बनला नाही. बाजीरावाला आणि नानासाहेबाला तरूण वयातच, पेशवाईचा अधिकार वंशपरंपरागत नसतांनाही, आणि अंतर्गत विरोध असूनही, शाहूने पेशवा म्हणून नेमले होते, त्याबद्दल त्यांच्या मनात शाहूबद्दल आणि छत्रपतींच्या गादीबद्दल आदराची व कृतज्ञतेची भावना असणार, हे उघड आहे. भाऊ तर नानासाहेबाचा चुलत बंधूच आणि स्वतः पेशवाईचा कारभारी. त्याची निष्ठ पेशव्यांच्या गादीवर आणि पर्यायाने छत्रपतींच्या गादीवर असणारच. अशा स्थितीत, बेइमानी करून स्वतःलाच दिल्लीपती म्हणून घोषित करणे त्या कोणालाही पटले नसते. स्वामिनिष्ठा हा मध्ययुगातील हिंदू समाजाच्याच मनोरचनेचा भाग होता.
स्वामिनिष्ठेचा विचार बाजूला ठेवला तरीही आपण त्याच निष्कर्षाला पोचतो. जर बाजीराव, भाऊ किंवा महादजीने स्वतःला दिल्लीपती म्हणून घोषित केले असते, तर ते धन्याविरुद्ध बंडच मानले गेले असते. आजूबाजूला बाहेरील शत्रू सिद्ध होतेच, पण तशा परिस्थितीत त्या तिघांना अंतर्गत शत्रूंशीही युद्ध करावे लागले असते. तशी निर्णायक शक्ती त्या तिघांकडेही नव्हती आणि तशी शक्ती आपल्याकडे नाही हे जाणण्याचा विवेक त्यांना खचितच होता.
त्यांच्यापुढील जो अन्य पर्याय असू शकला असता, तो म्हणजे छत्रपतीला दिल्लीचा अधिपती म्हणून घोषित करणे, परंतु त्यासाठी बाजीरावास शाहूची आणि इतर दोघांना किमान पेशव्याची तरी परवानगी लागली असती. योग्य वेळ आलेली आहे असे नानासाहेबाला वाटत नव्हते. महादजीला पेशवा (म्हणजे खरे तर नाना फडणीस ) तशी परवानगी देईल असा संभव नव्हता.
शिवाय बादशहाला नामधारी म्हणून तसाच ठेवून त्याद्वारे मराठी सत्ता वाढवावी असे शाहूसकट सर्वांनाच वाटत होते. त्यामुळे बादशहाला दूर सारून स्वतःच घाईघाईने दिल्लीपती होण्याची मराठ्यांना निकड भासली नाही. तसे करणे त्यांना त्या परिस्थितीत योग्यही वाटले नाही व आवश्यकही वाटले नाही.
( पुढे चालू )
— सुभाष स नाईक
Leave a Reply