[ccavlink]book-top#nachiket-0001#१३० [/ccavlink]
१९७१ ची रोमांचक युद्ध गाथा हे श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांचे, नचिकेत प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले, १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि बंगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.
श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांना संरक्षण दलामधील तीन वर्षांच्या सेवेची पार्श्र्वभूमी आहे. तसेच विविध दैनिक आणि मासिकांसाठी त्यांनी 500 हून जास्त लेखही लिहिलेले आहेत. एका साप्ताहिक-मासिकाचे गेली सहा वर्षे सहसंपादक असल्यामुळे विषयज्ञान तर त्यांना आहेच पण नेटक्या शब्दांमध्ये ते कसं मांडावे, याची जाणीव सुद्धा या पुस्तकात दिसून येते.
मी स्वत: 37 वर्षांच्या स्पेशल सर्व्हिस फोर्स आणि जाट रेजिमेंट मधील नोकरी नंतर 02 मध्ये निवृत्त झालो. भारत-पाक युद्ध 71 हे अस्मादिकांनी पाहिलेले व भाग घेतलेले पाहिले सर्वंकष युद्ध. स्पेशल सर्व्हिस फोर्स मुळे बंगलादेशच्या बंडखोर सैनिक आणि प्राण्यांची बाजी लावायला तयार झालेले नागरिक यांच्या मिश्रित मुक्तिवाहिनी ला प्रशिक्षण देण्यासाठी तत्कालीन ब्रिगेडियर शाबेग सिंग च्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. तसेच तत्कालीन ब्रिगेडियर नातु यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर मधील पुंछ शहराच्या घमासान युद्धात सहभागी व्हायची संधीही मिळाली. आणि त्याच मुळे हे पुस्तक वाचताना परत एकदा स्वानुभव पडताळून पाहता आला.
श्री सुरेन्द्रनाथ निफाडकरांनी बराच रिसर्च करून हे पुस्तक लिहिले आहे. स्वत: पत्रकार असल्यामुळे पुस्तकाची भाषा बाळबोध पण ओघवती आहे. मनाची पकड घेणारे वर्णन असल्यामुळे पुस्तक रोचक झाले आहे. अर्थात एका सामान्य नागरिकाच्या ज्या मर्यादा असतात त्या या पुस्तकात जाणवतात. पुस्तकाची रचना सुसंगतवार आहे. भारत-पाक युद्धाची पूर्व पिठिका हे प्रकरण शेवटी ऐवजी सुरवातीलाच घेणे जास्त संयुक्तिक झाले असते. युद्धस् य रम्य कथा निफाडकरांनी पहिल्या सोळा प्रकरणांमध्ये सांगितल्या आहेत. गाझी सबमरीन आणि आय.एन.एस. ब्रम्हपुत्रा, पाकिस्तान मधील अंजाम दैनिका मधील या विषयांवरील घोळ, अमरनाथ यात्रेच्या फोटोंना काश्मिरी लोकांचा एक्झोडस म्हणून प्रसिद्ध करणे, फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या सुरस कथा खरेच वाचनीय आहेत. सरळ प्रामाणिक वर्णनांमुळे आपण या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याप्रमाणेच वाटते.
विशाखापटन्म च्या बंदरात पी.एन.एस गाझी या सबमरीनला आपण बरबाद केले तसेच पुंछ च्या लढाईत तिथले ब्रिगेडर कमांडर नातु हे महाराष्ट्रीयन होते, याचा लेखकाला विसर पडला आहे. नातुंना या लढाईसाठी महावीर चक्राने सम्मानीत करण्यात आले होते.
निफाडकरांच्या ओघवत्या वर्णनांमध्ये काही तपशिलाचे दोष आहेत. परंतु दोष हे सर्व सामान्य वाचकांच्या लक्षात ही येणार नाहीत. पण प्रस्तुत समीक्षक लेखकाने या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतल्या मुळेच त्याला हे लक्षात आले. लेखकांने अगदी सुरवाती पासून युद्धाचे वर्णन केले आहे. युद्धाची कारणे काय होती, इंदिरा गांधींची व्यूहरचना व राजनैतिक डावपेच काय होते, नौदल आणि वायुदल यांच्या योजना काय होत्या? छंब-एरियात मध्ये कशी टॅंक बॅटल झाली, शक्करगढ सॅलीएंट मध्ये खेत्रपाल आणि होशियार सिंग कसे लढलेत आणि ढाक्याचे पतन होऊन पाकिस्तान चे दोन तुकडे कसे झालेत हे वाचतांना अंगावर काटा येतो, रोमांच उभे राहतात. आणि यातच लेखकाच्या शैलीची प्रतिभा आणि वाचकाला बांधून ठेवण्याची हातोटी दिसून पडते. निफाडकरांनी श्रीमती इंदिरा गांधी, बंगबंधु शेख मुजीब, सॅम मानेकशॉ, नझरूल इस्लाम यांचे आलेखही छान काढले आहेत. युद्धाच्या कथांशी समांतर अशा या व्यक्तिरेषा आहेत आणि लेखकाने त्यांना पूर्ण न्याय दिला आहे.
१९७१ च्या लढ्याबद्दल अनेक इंग्रजी पुस्तके आहेत. मराठीत मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीही नाहीत. या पार्श्र्वभूमीवर निफाडकरांची ही रोमांचक युद्धगाथा ठळकपणाने समोर येते. सामान्य वाचकाला समजेल अशा भाषेत संगतवार आणि क्रमश: युद्धपट त्यांनी उलगडला आहे. ओघवत्या भाषेमुळे तो वाचनीयही झाला आहे. अशा भूतपूर्व सैनिकाचा हा प्रामाणिक प्रयत्न वाखाणण्याजोगा व संग्राह्य आहे.
१९७१ ची रोमांचक युद्धगाथा
पृ. ११२ किं. १०० रू.
नचिकेत प्रकाशन, नागपूर
M: ९२२५२१०१३०
[ccavlink]book-bot#nachiket-0001#१३०[/ccavlink]
— श्री.अनिल रा. सांबरे
Leave a Reply