२ मे १८७२ रोजी मुंबईत व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्यूझियम चे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन करण्यात आले.
डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय १८७५ साली जनसामान्यांसाठी खुले करण्यात आले. त्याआधी मुंबईत एखादे वस्तुसंग्रहालय असावे अशी कल्पना १८५० साली जन्मास आली. आणि त्याच्या बांधकामाला सुरुवात होऊन ‘व्हिक्टोरिया अॅ्ण्ड अल्बर्ट’ म्युझियम उभे राहिले. त्यानंतर १ नोव्हेंबर १९७५ साली मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ आणि संग्रहालयाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या नावाने संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले. आज मुंबईमधील सर्वात पहिले आणि जुने वस्तुसंग्रहालय म्हणून या वास्तूची ओळख आहे. त्याकाळी या वास्तूच्या उभारणीसाठी बराच अवधी लागला. कारण एकच होते निधीची टंचाई. मात्र हार न मानता डॉ. भाऊ दाजी लाड यांनी जंग जंग पछाडून मुंबईतील देणगीदारांकडून १ लाख १६ हजार १४१ रुपयांचा निधी गोळा केला. याशिवाय एक लाख रुपयांचा निधी सरकारकडून मिळवून त्यांनी ही वास्तू उभी केली, परंतु १९ शतकाच्या उत्तरार्धात देखरेखीअभावी ही वास्तू भग्नावस्थेत गेली. आणि तिच्या जीर्णोद्धाराची गरज जाणवू लागली. २००३ साली मुंबई महानगरपालिकेने जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इनटॅकसोबत हातमिळवणी करून वास्तूच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भग्नावस्थेत गेलेल्या वास्तूचे पुनरु ज्जीवन होऊन २००८ साली ती पुन्हा रसिकांकरिता खुली झाली. याच कालावधीत २००५ साली वास्तूला युनेस्कोकडून पुरातन वारसाचा दर्जा प्राप्त झाला. वास्तूच्या दुरुस्तीनंतर इथे विविध प्रकारची प्रदर्शने भरू लागली आहे. ऐतिहासिक , समकालीन अशा विविध प्रकारच्या कला आणि संस्कृती प्रदर्शनांना इथे प्राधान्य दिले जाते.
संग्रहालयाच्या माध्यमातून स्थानिकच नव्हे तर जागतिक कलाकारांचाही आविष्कार रसिकांना अनुभवता यावा यासाठी प्रशासनाने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये व्हिक्टोरिया अॅठण्ड अल्बर्ट म्युझियम, ब्रिटिश कौन्सिल, ब्रिटिश लायब्ररी, ड्रेस्डेन स्टेट आर्ट कलेक्शन, सोलोमन आर गुग्नेहॅम संग्रहालय, म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, एरमेन्गेल्डो झेन्या ग्रुप आणि गिल्ड ऑफ द डोम असोसिएशन या संस्थांचा समावेश आहे. यांच्या सहयोगातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक आणि कलात्मक देवाणघेवाण व्हावी असा संग्रहालय प्रशासनाचा हेतू आहे. संग्रहालयात सध्या असलेल्या कलाकृती, संग्रह यांना अनुसरून प्रदर्शने भरविली जात आहेत. याशिवाय लोकांच्या अभिरुचीमध्ये वाढ करण्याकरिता विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजनही संस्था करते.
या वस्तुसंग्रहालयाच्या स्थायी संग्रहामध्ये चार गट आहेत. मुंबईचा इतिहास, व्यापार- संस्कृती देवाणघेवाण, आधुनिक- समकालीन कलासंस्कृती आणि आधुनिक काळ या विषयांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. अठराव्या ते विसाव्या शतकापर्यंत मुंबई शहराचा विकास कशा पद्धतीने झाला, येथील संस्कृती आणि लोकजीवन कसे होते, याची मांडणी ‘मुंबईचा इतिहास’ या संग्रहामध्ये करण्यात आला आहे. १९१८ साली खुले करण्यात आलेल्या या संग्रहामध्ये काळानुसार बदल करण्यात आले आहेत. शिल्प, प्रतिकृती, नकाशे, शिलामुद्रण, छायाचित्रे आणि दुर्मीळ पुस्तकाच्या आधारे हा संग्रह साकारण्यात आला आहे. यामध्ये वरळीतील पहिल्या कापड गिरणीची आणि मुंबई किल्ल्याची प्रतिकृती पाहता येते. तर व्यापाराच्या माध्यमातून संस्कृतीच्या झालेल्या देवाणघेवाणीचा परिचय वस्तूरूपाने ‘व्यापार- संस्कृती देवाणघेवाण’ या संग्रहाच्या माध्यमातून होतो. भारतीय हस्तकला, शिल्पकला यांची परदेशात व्यापाराच्या दृष्टीने कशी मागणी होती, कोणत्या वस्तू यामध्ये महत्त्वाच्या होत्या, हे संग्रहात पाहायला मिळते. आधुनिक आणि समकालीन कलेची सांगड घालणारे प्रदर्शन ‘आधुनिक आणि समकालीन कलासंस्कृती’ यामध्ये करण्यात आले आहे. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट आणि भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाचे जुने नाते आहे. त्यामुळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांनी साकारलेली चित्रे, शिल्पे, प्रतिकृती या संग्रहामध्ये मांडण्यात आल्या आहेत.
तसेच ‘मॉडर्न पीरियड’ या संग्रहामध्ये गेल्या काही दशकांमध्ये साकारण्यात आलेल्या कलाकृती मांडल्या गेल्या आहेत. याशिवाय नवीन कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तात्पुरत्या प्रदर्शनाची मांडणी करण्यात येते. मुख्य म्हणजे कला आणि संस्कृतीचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यशाळा, प्रदर्शन, सादरीकरण यांचे आयोजन वस्तुसंग्रहालय प्रशासन करत असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply