मराठी माणसाला इतिहासात रमायला नेहमीच आवडतं. त्यातही तो इतिहास आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या सांगणारा असला, तर बघायलाच नको! वर्तमानातील कठोर वास्तवापासून दोन क्षण का होईना दूर जाता येणं, हा त्यातील बहुधा सर्वात मोठा लाभ असावा. त्यामुळेच कायम गतकालात, इतिहासात रमणार्या व्यक्तीची पलायनवादी अशा शब्दात अनेकदा हेटाळणीही केली जाते. तरीही ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काल!’ या पंक्तीवर भरवसा ठेवून असेल कदाचित, मराठी माणूस हा इतिहास आणि पुराणकथांमध्येच रममाण झालेला आढळतो. त्यातही मराठी माणसाचा सर्वात आवडता काल म्हणजे सतराव्या शतकात छत्रपती शिवरायांपासून सुरू होणारा आणि पुढे एकोणीसाव्या शतकात पेशवाईच्या अखेरीस येऊन थांबणारा, हे आता सर्वश्रुत झालं आहे. त्यामुळेच मराठीतील अनेक कादंबर्या आणि नाटकं ही याच कालातील गौरवशाली घटनांवर आधारित आहेत. […]