किती युगं लोटली गांधारी होऊन गेल्याला. गांधारी! नव्हे, नव्हे- पतिपरायण गांधारी. सती-साध्वी गांधारी. किती शतकं उलटली
पतिपरायण गांधारी होऊन गेल्याला. काळाची उलथापालथ झाली. कलियुग अवतरलं. वर्णसंकर झाला. वर्णसंकराचा बाऊ वाटेनासा
झाला. माणसांचीही उलथापालथ झाली. पोशाख बदलले. आचार-विचार बदलले. पाश्चात्त्य-पौर्वात्य भेदाभेदातलं अंतर फारसं उरलं
नाही. स्त्री- पुरुषांच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांची सरमिसळ झाली. आर्थिक सहभागाची तिला मुभा मिळाली. शिक्षणाची दारं तिच्यासाठी खुली झाली. बदलली नाही ती स्त्रीविषयक धारणा. पुरुषांची तर नाहीच नाही. सुखासुखी हाती आलेले सर्वाधिकार
फारच थोडे सोडू शकतात. बव्हंशी (मूठभर 20 टक्के सोडून) स्त्रीचीही स्वत:विषयीची धारणा बदलली नाही. पतिपरायणतेचं बिरुद मिरविण्याची स्त्रीची हौस फिटली नाही आणि पतिपरायण स्त्री ही पुरुषाची हावही सुटली नाही. कारण आम्हाला हव्या आहेत फक्त गांधारी.
[…]