विविध पक्षी व प्राण्यांच्या जाती पाहण्यासाठी आज प्राणीसंग्रहालयात जाऊन पाहावे लागते.चिमण्या,गिधाड,कावळे,माळढोक,कौंच,साप,माकड,वाघ, चित्ता असे विविध प्राणी अस्तित्वाची लढाई लढत आहेत.दररोज वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून जागृती केली जाते,पण वेळ आहे कुणाला ही मानसिकता पाहायला मिळते.आपल्या डोळ्यासमोर विविध पक्ष्यांची सरेआम विक्री केली जाते,थोडावेळ हळहळ व्यक्त करून मोकळे होण्याचे दिवस आता गेलेत.पक्षी व प्राणी यांची तस्करी तसेच विक्री करणाऱ्यांच्या हालचालींवरही सामान्यांनी कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे.
सजीवांच्या उपयोगाबाबत बोलायचे झाल्यास कितीतरी उदाहरणे देता येतील,पिकांवर येणारी टोळधाड आणि लष्करीअळी चिमण्यांच्या माध्यमातून नियंत्रित केली जाते,पोलिओवर लस बनविण्यासाठी आवश्यक जीवाणू माकडाच्या मूत्राशयात मिळतो,सापांच्या माध्यमातून पिके नष्ट करणाऱ्या उंदरावर व पर्यायाने प्लेग सारख्या रोगावर नियंत्रण केले जाते,अन्थ्राक्ससारख्या महाभयंकर रोगाच्या ‘करीअन’ या विषाणूला आला घालण्याचे सामर्थ्य गिधाडांमध्ये आहे,कुत्र्यापासून पसरणाऱ्या ‘जलसंत्रास’ या रोगावरील लस मेंढी आणि कोंबडीच्या गर्भाशयापासून बनविली जाते.
[…]