ऋषिमुनींची प्रतिभा अचाट होती. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व देखील असामान्य होते. त्यांचे ज्ञान त्यांनी लाखो श्लोकात लिहून ठेवले आहे. या श्लोकांच्या काही ओळी वाचीत असतांना जीभ अक्षरश: अडखळते. पण श्लोकात गुंफलेले हे ज्ञान, शिष्यांच्या अनेक पिढ्यांनी, तोंडपाठ करून शेकडो वर्षे जतन केले. लिहीण्याचे तंत्र विकास पावल्यानंतर हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. लिखित मजकूरही शेकडो वर्षे दुर्मिळच होता. सर्व साहित्य हस्तलिखित स्वरूपातच होते त्यामुळे त्याचा प्रसार सामान्य माणसांपर्यंत पोचला नाही. त्या काळी ध्वनीलेखनाचा शोध लागला नव्हता. म्हणून त्यांना अभिप्रेत असलेले उच्चार आपल्याला करता येत नाहीत.
पाठांतर आणि हस्तलेखन यात व्यक्तीनिहाय थोडेथोडे बदल होत गेले.
हे पौराणिक साहित्य मूळ स्वरूपात आता फारच दुर्मिळ झाले आहे. ज्या थोड्या विद्वानांनी मूळ पोथ्या मिळवून, श्लोकांचा अन्वयार्थ लावून, प्रचलित भाषात भाष्ये करून ठेवली असल्यामुळे, आपल्याला आता त्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचे ऋषिमुनींचे विचार, आपल्यापरीने आपल्याला कळतात.
पाचसहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक माध्यमात साठविलेल्या कित्येक श्लोकांचा, ऋषिमुनिंना अभिप्रेत असलेला अर्थ, आज आपल्यापर्यंत पोचला आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही.
.
[…]