साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असावा असे शास्त्रज्ञ सांगतात. सुरुवातीला हे जीव अगदी प्रथमावस्थेत, जीवाणू, बुरशी, आणि एकपेशीय प्राणी यांच्या स्वरुपात निर्माण झाले. पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झालेत याबद्दलची माहिती अनेक पुस्तकांतून आणि माहिती जालावर मिळते. या नंतर कोट्यवधी पृथ्वीवर्षांचा काळ लोटला. आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन प्राणी आणि वनस्पतींच्या लाखो प्रजाती निर्माण झाल्या. सरतेशेवटी सुमारे ७० लाख पृथ्वीवर्षांपूर्वी, कपिंच्या काही प्रजातीत उत्क्रांती होऊन मानव निर्माण झाला.
मानवी मेंदूची अध्यात्मिक सुरुवात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी झाली. त्या काळापासून आजपर्यंत, मानवी शरीररचनेत आणि पृथ्वीच्या पर्यावरणात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्या काळी विचारवंतांनी केलेली निरीक्षणे आणि घेतलेले अनुभव आपण आजही घेऊ शकतो. त्याकाळी असलेली बुद्धिवान माणसे आजही जन्म पावू शकतात. त्याकाळी केलेल्या निरीक्षणांचे आणि अनुभवांचे स्पष्टीकरणे, त्यांच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि त्या काळी उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार त्यांनी दिले. ते गेली शेकडो वर्षे उपयोगी पडले, मार्गदर्शक ठरले.
[…]