रंगभूमी अभिनेत्री कुसुमताई कुलकर्णी हेगडे
कुसुमताईंचे नाव मराठी रंगभूमीवरच्या एका महत्त्वाच्या कलाकृतीशी जोडलेले आहे आणि ती कलाकृती म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतीचित्रे’ या आत्मकथनावरील एकपात्री प्रयोग. कुसुमताईंचे चुलत बंधू सीताकांत हेगडे यांनीच मूळ पुस्तकावरून रंगावृत्ती तयार केली होती आणि या एकपात्री कार्यक्रमाचे दिग्दर्शन नाटककार विजय तेंडुलकर यांनी केले होते. त्यामुळेच नंतर ‘सखाराम बाइंडर’साठी तेंडुलकरांनी कुसुमताईंचे नाव दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लक्ष्मीच्या भूमिकेसाठी सुचवले. मध्यमवर्गिय जाणिवांना आणि दिवाणखान्याच्या चौकटीतल्या नाटकाला धक्का देणाऱ्या ‘सखाराम बाईंडर’मधील लक्ष्मी कुसुमताईंनी अफलातून रंगवली आणि मराठी नाट्य इतिहासात स्वतःचे स्थान निर्माण केले. […]