तळ्याकाठचे निअँडरटाल
निअँडरटाल ही मुख्यतः शिकारीवर जगणारी प्रजाती होती. त्यामुळे ते कदाचित खाद्य गोळा करण्यासाठी या तळ्याशी आले असावेत. मात्र या निअँडरटालांनी मोठ्या प्राण्याची शिकार केल्याचा पुरावा काही या वाळूच्या थरावरील खुणांवरून मिळाला नाही. तळ्यातले मासे पकडण्यासाठी, छोटे कवचधारी मृदुकाय प्राणी गोळा करण्यासाठी किंवा तळ्यावर येणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ते आले असावेत. कारण या परिसरातील निअँडरटालांच्या खाद्यात या गोष्टींचा समावेश असायचा. या ठशांच्या बाबतीतला एक वेगळाच भाग म्हणजे, ज्या सहा वर्षांच्या दोन छोट्या मुलांच्या पायांचे ठसे इथे आढळले आहेत, ते फक्त ठरावीक दिशेनंच गेलेले दिसत नाहीत. ते इकडेतिकडे विखुरले आहेत. यावरून या संशोधकांनी, ही दोघं लहान मुलं वाळूत खेळत असावीत, खेळताना ती इकडेतिकडे बागडत असावीत, असा एक सरळ साधा, पण मनोरंजक निष्कर्ष काढला आहे. […]