थडग्यातले गंध
वासांशी संबंधित नव्या संशोधनात इजिप्तमधील उत्खननाचा मोठा वाटा आहे. इजिप्तमधील उत्खननात प्राचीन काळातली अनेक थडगी सापडली आहेत. या थडग्यांत त्या काळच्या प्रथेनुसार अनेक पदार्थ ठेवलेले असतात. यांत विविध सुगंधी द्रव्यांपासून ते खाद्यान्नापर्यंतच्या पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ ठेवलेली काही भांडी उघडी असतात, तर काही भांडी बंद केलेली असतात. बंद भांड्यांतील पदार्थांचा शोध घेताना, या इतिहासकालीन भांड्यांची मोडतोड होऊ द्यायची नसते. त्यामुळे भांड्यात कोणते पदार्थ ठेवले आहेत, ते शोधणं आव्हानात्मक असतं. अशा बंद भांड्यांतील पदार्थ ओळखण्याचा एक लक्षवेधी प्रयत्न, इटलीतील पिसा विद्यापीठातल्या इलारिआ देगानो आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अलीकडेच केला आहे. इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन, इजिप्तमधल्या एका प्राचीन थडग्यात सापडलेल्या वस्तूंवरचं आहे. हे संशोधन म्हणजे याच थडग्यावरच्या, ‘टीटी८’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका मोठ्या संशोधन प्रकल्पाचा भाग आहे. […]