मार्क ट्वेनची चरित्र कथा
त्याचे लिखाण संशोधित करून, एकत्र ठेवण्याचा व त्याची सूची ठेवण्यासाठी एक संस्था अजूनही कार्यरत आहे. त्याने अनेकानेक वृत्तपत्रांतून अनेक वर्षे लिहिल्यामुळे तो संशोधनाचा विषय झाला आहे व नेहमी नवीन कांही तरी सापडतच असते. त्याची सामाजिक विषयांवरची मते अत्यंत प्रागतिक होती. काळ्या लोकांना जी वागणूक देण्यात यायची त्यावर तर तो टिका करतच असे पण एकंदरीतच स्त्रीयांसह सर्वांना व्यक्तीस्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते. साम्राज्यशाही, भांडवलदारांनी चालवलेली कामगारांची पिळवणूक ह्यांवर तो प्रखर टिका करत असे. अनेकवेळा चर्चच्या त्या काळांतील प्रभावामुळे व त्याच्या अशा मतांमुळे त्याच्या पुस्तकांवर सेन्सॉरकडून बंदी घालण्यांत आली. त्याला कॉपीराईटसाठीही अनेकदा झगडावे लागले. त्याला पूर्ण लोकमान्यता व राजमान्यता नंतरच मिळाली परंतु त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण साहित्यावरच कायम आपला ठसा राहिलं असे विपुल लेखन केले यांत शंका नाही. त्यामुळे साहित्यात मार्क ट्वेनचे नांव अजरामर झाले आहे. […]