संगीतभूषण पं. राम मराठे
रामभाऊंच्या आक्रमक आणि तडफदार गायकीला ‘झंझावात’ हाच शब्द योग्य ठरेल. आयुष्याच्या अखेरपर्यंत पांढरी चार आणि प्रसंगी काळी तीन पट्टीमध्ये रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत, विलक्षण ताकदीने आणि दमसासाने गायची अद्भुत क्षमता रामभाऊंकडे होती. या सादरीकरणात कधी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णरावांची लडिवाळ गायकी, कधी नोम तोम युक्त आलापी आणि लयदार तिहाया घेणारी आग्रा गायकी, कधी लयदार आणि बुद्धिनिष्ठ रंजक ग्वाल्हेर गायकी अशी चतुरस्र गायकी रामभाऊ श्रोत्यांपुढे अत्यंत सहज ठेवून थक्क करायचे. […]