चंद्रावरचं बर्फ
चंद्रावर पाणी अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे. यातलं काही पाणी हे विविध खनिजांतील पाण्याच्या रेणूंच्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तर काही पाणी हे बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. बर्फाच्या स्वरूपात अस्तित्वात असलेलं पाणी हे मुख्यतः, चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील विवरांच्या तळाशी वसलेलं आहे. हे पाणी एकूण किती असावं याची निश्चित माहिती नसली तरी, बर्फाच्या स्वरूपात असलेलं हे पाणी कोट्यवधी टन असावं. चंद्रावरील विवरांच्या तळाशी जमा झालेलं हे पाणी मुख्यतः, धूमकेतू आणि अशनींच्या (लघुग्रह) माऱ्याद्वारे जमा झालं असावं. ध्रुव प्रदेशांजवळील विवरांत सूर्यकिरण अतिशय तिरके पडत असल्यामुळे, यांतील अनेक विवरांच्या तळाशी सूर्यप्रकाश पोचत नाही. त्यामुळे हे तळ पूर्ण वेळ अंधारात असतात व इथलं तापमान हे नेहमीच शून्याखाली दीडशे अंशांपेक्षा कमी असतं. […]