१८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला. […]