सापाचे कान!
साप या प्राण्याची गणना सरीसृपांच्या गटात होते. तरीही साप हे इतर सरीसृपांपेक्षा वेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत. उदाहरणार्थ, त्यांचा लांबलचक आकार, पायांसारख्या अवयवांचा अभाव, स्वररज्जूंचा अभाव, इत्यादी. सापांना स्वररज्जू नसल्यानं त्यांना स्पष्ट स्वरूपाचे आवाज काढता येत नाहीत. मात्र तोंडानं हवा सोडून केलेल्या ‘हिस्स’ अशा आवाजाद्वारे ते इतर प्राण्यांना घाबरवू शकतात. आवाजाशी संबंधित त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कान नाहीत. त्यांना कान नसले तरी, ऐकू मात्र येतं. याचं कारण म्हणजे त्यांना, बाहेरून दिसू शकणारा कानाचा भाग नसला तरी, त्यांच्या त्वचेच्या आतल्या भागात श्रवणसंस्थेसारखी रचना आहे. […]