सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. कोरडया भागात समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत चंदन मोठया प्रमाणात आढळतो. कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य (Wild) वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. […]