नवीन लेखन...

परळला गेलेले दसर्‍याचे नरबळी

पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या एल्फिन्स्टनला जोडणाऱ्या पुलावर आज अपघात झाला. असा काही अपघात झाला, की ‘दुर्दैवी’ म्हणतो, फेसबुकवरच श्रद्धांजली वैगेरे वाहतो आणि पुढच्या मिनिटाला सर्व विसरून आपल्या कामाला लागतो. असं काही घडलं, की आपल्याला पुन्हा काही वेळासाठी जाग येते, ती थेट पुढच्या अपघाताच्या वेळेसच. पुढचा अपघात आताच सांगून ठेवतो, मध्य रेल्वेवरचा ‘करी रोड’ स्थानकाची जागा. येथे याहीपेक्षा भयानक अपघात होण्याची शक्यता आहे. श्रद्धांजलीला शब्द आजच तयार करून ठेवा.

आपण आजच्या अपघाताला जरी ‘अपघात’ म्हणत असलो तरी हा अपघात नाही. या ठिकाणी हे कधीतरी व्हायचचं होते, ते आज दसर्याच्या मुहूर्तावर घडल एवढंच. मी याला अपघातापेक्षा सामुहिक हत्याकांड म्हणेन. सरकारी अनास्थेने केलेलं हे हत्याकांड आहे. मुंबईला पिळणाऱ्या सर्वपक्षीय तथाकथित कैवारी नेत्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून केलेला हा नृशंस खून आहे आणि हे मी जबाबदारीने म्हणतोय. मी अस का म्हणतो त्याची कारणं खाली देतोय.

परेल-एल्फिन्स्टनला जोडणारा हा एकमेव आणि सोयीचा चिंचोळा पूल काही आजचा नाहीय, तो बराच जुना आहे. परळचा फलाटही अगदी चिंचोळा. कारण गिरण्यांच्या संपानंतर, साधारण १०-१५ वर्षांपूर्वीपर्यंत परळ स्थानक हे अत्यंत दुर्लक्षित स्थानक. फार क्वचित इथे लोक चढा-उतरायचे. त्यातही बहुत करून या परिसरात असणाऱ्या मोठमोठ्या इस्पितळात उपचारांसाठी जाणारेच असायचे. गेल्या काही वर्षात मात्र या परिसरातली गर्दी अतोनात वाढली, परंतु पूल आणि फलाट मात्र तेवढाच राहिला. या परिसरात नव्याने सुरु झालेल्या पुनर्विकासाच्या बेबंदशाहीत नवनवीन, गगनचुंबी इमारतींची एकच दाटी झाली. ह्यातील बहुतेक इमारती व्यावसायिक म्हणजे कार्यालयीन उपयोगाच्या होत्या. आणि त्यात काम करणाऱ्या कल्याण-कासार्यावरून येणाऱ्या हजारो कारकुनांची ही गर्दी होती.

गेली काही वर्ष ही गर्दी मी सातत्याने वाढताना पाहतोय. तशीच ती रेल्वेचे अधिकारी, मतांसाठी भिक मागणारे नेतेही पाहत असतील. परंतु या पुलाला पर्याय शोधावा, किंवा दुसरी काहीतरी व्यवस्था करावी, असं कधीच कुणाच्याच मनात कधी आले नाही. किंवा आले असले तरी बेपर्वा लाल फितीत ती काळजी अडकली असावी. मुंबईकरांना गृहीत धरून सर्व कारभार चाललेला आहे याचं हे उत्तम उदाहरण. नाही म्हणायला, परळच्या फलाटाच्या दादर टोकाला नवीन पूल बांधलाय पण तो कुत्र्या मांजरांसाठी आणि आडोसा शोधणाऱ्या जोडप्यांसाठी सोडलेला आहे, कारण तो इतर कुणालाच सोयीचा नाही.

आज घडलेल्या या सामुहिक नरसंहाराची जबाबदारी मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महानगर विकास प्राधिकरण इत्यादी सरकारी नियंत्रक संस्थांची आहे. मुंबई शहराचा विकास करायची जबाबदारी यांची आहे आणि या तिघांवर नियंत्रण आहे ते राज्य सरकारच. अर्थात या अपघाताची प्राथमिक जबाबदारी राज्य शासनाचीच येते. मग रेल्वे आणि केंद्र सरकारवर येते. या स्थानकाच्या परिसरात असणाऱ्या प्रचंड मोठ्या व्यापारी आस्थापनांना परवानगी देताना, त्यांना पूरक अश्या पायाभूत सोयी या ठिकाणी आहेत की नाही, याचा कोणताही विचार या मुंबईच्या नियंत्रक संस्थांकडून केला गेला नाही, असाच निष्कर्ष यातून निघतो. मिळेल तिथून पैसे ओरबाडून, आपल्या पुढच्या सर्वच पिढ्या निकम्म्या निघणार याची खात्री असणाऱ्या आणि म्हणून त्या पिढ्यांच्या काळजीत मग्न असणारे या संस्थाचे अधिकारी आणि या संस्थांवर आपलाच नियंत्रण रहाव म्हणून विविध नाटकं करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचं आजच हे पाप आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले हे आजच्या पिढीतील नरबळी आहेत. दसऱ्याला बळी देण्याची प्रथा आहे, ती अशा रीतीने सार्थ केली जाईल याची कल्पना नव्हती.

अस काही घडल की, मुंबईकर ते विसरून लगेच आपल्या कामाला लागतो. याला मुंबईकरांच स्पिरीट वैगेरे नांव मेणबत्ती छाप लोकांनी दिलेली आहेत. राज्य सरकारचे बडे अधिकारी असोत की केंद्रासार्कारचे (पक्षी रेल्वेचे) किंवा दक्षिण मुंबईत राहणाऱ्या सेलिब्रेटी मेणबत्त्या असोत, यांना ना सामान्य मुंबईकरांशी देण-घेण, ना त्यांच्या सुख-दुखाशी..! ते भले याला स्पिरीट वैगेरे म्हणोत, पण ही आम्हा मुंबईकरांची मजबुरी आहे. आम्हाला दु:ख उराशी कवटाळून बसायला वेळ कुठे असतो? तसं बसलं तर उपाशी मारायची पाळी येईल. सर्व विसरून कामाला लागणे ही आम्हा मुंबईकरांची मजबुरी आहे, स्पिरीट वैगेरे नाही याची जाणीव या कोड्ग्याना नाही.

आता मृतांच्या नातेवाईकांना पैसे देऊन द्यांच्या जीवाची किंमत लावली जाईल आणि आपणही सर्व विसरून आपल्या माजबुरीपोटी आपापल्या कामाला लागू. पण मुंबैकारानो, हे आजचे नरबळी विसरू नका. येणाऱ्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या लांडग्यांना याचा जाब विचारा. तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असलात तरी प्रथम सामान्य मुंबईकर आहात हे विसरू नका आणि हे विसरलात तर आजचे तडफडून मेलेले आत्मे आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. पक्ष बाजुला ठेवा आणि प्रथम माणूस मेहणून जगायला शिका.

बुलेट ट्रेनचा सुट वैगेरे जरूर शिवा आम्हाला, पण ज्या आम्हा मुंबईकरांची चड्डी फाटली आहे, त्याला सुटच स्वप्न दाखवून काय उपयोग? प्रथम आम्हाला आमची चड्डी नीट शिवून द्या आणि मग सुट शिवायचं बोला.

आज गेलेल्या नरबळींच बलिदान वाया घालवू नका. याची किंमत राजकारण्यांना चुकवायला लावा.

-नितीन साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..