पक्षीनिरीक्षण आणि पक्षीसंवर्धन या विषयी जनमानसात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने गेली चोवीस वर्ष महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन’ आयोजित केले जात आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने पहिल्यांदाच हे संमेलन मुंबईत १३, १४, १५ जानेवारी २०१२ रोजी संजय गाधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे संपन्न होत आहे.
ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक उल्हास राणे हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. अश्वमेध प्रतिष्ठान, मुंबई हे या संमेलनाचे प्रमुख आयोजक असून मुंबई व महाराष्ट्रातील तीसहून अधिक निसर्गप्रेमी संस्थांचा या संमेलनाला पाठिंबा आहे. आर्थिक घडामोडींचं प्रमुख केंद्र असलेलं मुंबई महानगर जैवविविधतेच्या बाबतीतही संपन्न आहे. मुंबई महानगर परिसरात आजही आपल्याला साडेतीनशेहून अधिक पक्षी आढळतात, परंतू गेल्या काही वर्षात झपाट्याने होत असलेलं नागरीकीकरण आणि पर्यावरणविषयक चुकीच्या धोरणांमुळे येथील पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येत आहे. त्या धर्तीवर यंदाचं रौप्यमहोत्सवी संमेलन मुंबईत पार पडत असल्यामुळे त्याचं महत्त्व अधोरेखित करणं गरजेचं आहे. ‘मुंबई महानगर क्षेत्रातील पक्षीजैवविविधता’ हा या संमेलनाचा प्रमुख विषय असून त्याअंतर्गत उत्पत्तीस्थानातील बदल, आकडेवारीतील चढउतार, पक्षांचा अलिकडच्या काळातील अभ्यास, स्थलांतर आणि प्रश्न, पक्षी पर्यटन, समाज आणि पर्यावरणाचे संरक्षण, वन्यजीव कायदे आणि व्यापार हे त्यातील सात उपविषय आहेत. संमेलनाला महाराष्ट्रभरातून पाचशेहून अधिक पक्षी अभ्यासक उपस्थित राहणार असून तीन दिवसांत विविध निसर्गमित्र संस्था आणि पक्षी अभ्यासक वर नमूद केलेल्या विषयांवर सादरीकरण करणार आहेत. या संमेलनाला मुंबई व महाराष्ट्रातल्या तीसहून अधिक संस्थाचा पाठिंबा असून त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-बोरीवली, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, नेचर लव्हर्स–मालाड, महाराष्ट्र निसर्ग उद्यान-धारावी, होप-ठाणे, स्प्राऊट, निसर्गमित्र-पनवेल यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. समाजातील विविध वयोगटांपर्यंत हा विषय पोहोचावा यासाठी संमेलनादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, त रूणांसाठी छायाचित्रण स्पर्धा, छायाचित्रण कार्यशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी पक्षी निरीक्षणाच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे. एवढंच नव्हे तर रौप्यहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून पक्ष्यांबाबत जनजागृती करण्यासाठी वर्षभर महाराष्ट्रात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. संमेलनाच्या सदस्य नोंदणीला सुरूवात झाली असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर मुंबईबाहेरील पहिल्या दोनशे व मुंबईतील तीनशे लोकांना यात सहभागी होता येईल. सदस्य नोंदणी शुल्क आठशे रूपये असून मुंबई व मुंबईबाहेरील सर्वांसाठी सारखेच आहे. आधिक माहितीसाठी ८१०८१ ८६४४२ / ९२७३१ ४५५२० या क्रमांकावर ११ ते ४ या वेळेत संपर्क साधता येईल. अथवा अविनाश कुबल – ०२२ – २४०७९९३८ / फॅक्स – ०२२ – २४०७९९४०. तसेच नोंदणीअर्ज [ELINK]www.25thpakshimitra.org#http://www.25thpakshimitra.org[/ELINK] या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.
संमेलनाचा लोगो – महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन पहिल्यांदाच मुंबईत होत असल्यामुळे मुंबईचं प्रतिबिंब त्यात असावं असा श्री. बिभास आमोणकर यांचा आग्रह होता. म्हणून मुंबईशी निगडीत गोष्टींचा सखोल अभ्यास करून संमेलनाचा लोगो तयार करण्यात आला आहे. या लोगोमध्ये काळ्या रंगाच्या कमानीच्या पार्श्वभूमीवर मध्यभागी उडणार्या घुबडाचे चित्र आहे. पौराणिक कथांमध्ये घुबडाचा लक्ष्मीचं वाहन आणि बुध्दीचं प्रतिक म्हणून उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे कधीही न झोपणार्या धावत्या मुंबईचीही ती एक ओळख आहे. कमान हि मुंबईतील विविध ऐतिहासिक वास्तूंची ओळख आहे. घुबड हा पक्षी आपल्याकडे अपशकुनी मानला जातो. जनमानसात त्याच्याबाबत अनेक गैरसमजूती आहेत तसेच अलिकडे त्याचा जादूटोणा करणार्या बाबांकडून सर्रास बळी दिला जातोय. खरंतर घुबड हा खूप प्रेमळ आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयोगी पक्षी आहे. मुंबईच्य बदलत्या शैलीशी त्याने स्वत:ला जुळवून घेतलं आहेच पण शहराला मोठ्या प्रमाणात सतावणार्या उंदराच्या समस्येवरील तो एक नैसर्गिक उपाय आहे. खरंतर हा मुंबईचा लाडका पक्षी असायला हवा, त्यामुळेच संमेलनाच्या प्रतिकामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
अश्वमेध प्रतिष्ठान, मुंबई – पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करून त्याचं महत्व पटवून देण्याचं काम गेली आठ वर्ष संस्थेतर्फे करण्यात येत आहे. संस्थेची बहुतेक कामं हि कल्याण, मुरबाड परिसरातील ग्रामीण भागात चालतात. जैविक विविधता, ग़ड-दुर्ग संवर्धन, अभयारण्य, दुर्गम भागातील आदिवासींच्या समस्या, आपत्कालिन व्यवस्थापन व साहसी खेळ इ. विषयांवर संस्था काम करत आहे. संस्थेतर्फे पर्यावरण, इतिहास आणि कला या विषयांवरील संदर्भ वाचनालयही चालविण्यात येतं.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply