नवीन लेखन...

२६/११- आमची “मिती “

या तारखेची ताजी भळाळती खूण आत्ता दुपारी नेटफ्लिक्स वर पाहिली – ” मेजर ” ! हा चित्रपट दोन दमात बघून संपवला. एका बैठकीत असले इंटेन्स पिक्चर्स आजकाल सहन होत नाही. मेजर उन्नीकृष्णन यांचे २६/११ चे बलिदान आणि पूर्णतया NSG अँगलने केलेला हा चित्रपट!

त्याची क्षणकालीन पत्नी म्हणते- ” जेव्हा तू देशाचा नसतोस, तेव्हा तू आमचा असतोस. तुमच्या जखमा, बलिदान, स्वार्थत्याग सारं जगाला दिसतं रे, पण आम्ही कुटुंबीय काय काय गमावत असतो, हे तुम्हाला आणि जगाला कधीच दिसत नाही.”

हा विषय इतक्या सर्जनशील कलावंतांना आमंत्रण देतोय व्यक्त होण्याचं- मागील वर्षी, माझ्या सोलापूरच्या मित्राचा मुलगा अक्षर कोठारी वाला “मेडिकल ड्रामा ” – मुंबई डायरीज २६/११ पाहिला. वैद्यकीय क्षेत्राने २६/११ ला कसे तोंड दिले याचा हा लेखाजोखा होता. तत्पूर्वी अनुपम खेर चा ” हॉटेल मुंबई ” हा चित्रपट पाहिला होता- ताज हॉटेलवरील अतिरेकी हल्ल्याला हॉटेल स्टाफने तोंड देत स्वतःच्या गेस्टस ची कशी जीवापाड काळजी घेतली होती, तो अँगल या चित्रपटाला होता.

असाच “मुंबई मेरी जान ” हा २००६ च्या ट्रेन बॉम्ब ब्लास्टवरील चित्रपट आला होता. मुंबई अतिरेक्यांची कशी जान आहे, हे आर माधवनने आणि इरफान खानने सामान्य माणसाच्या हालअपेष्टांमधून दाखवून दिले होते. तोच धागा नसीरने पकडून “वेन्सडे ” नांवाची अभिनयाची मेजवानी दिली होती पण अंतरीची विरुद्ध दिशेची काल्पनिक चढाई म्हणून ! त्याही आधी १९९३ च्या मुंबईवरील अग्निवर्षावाची दखल घेणारा आणि केके च्या माध्यमातून पोलिसांची बाजू मांडणारा ” ब्लॅक फ्रायडे ” बघितलेला.

सगळीकडे धुमसती, विव्हळणारी, जळणारी मुंबई कॉमन आणि माझ्या सारखा चित्रवेडा कॉमन ! पण हे सगळे चित्रपट एकेका कोनातून ( कॅलिडोस्कोप सारखं ) व्यथावेदनांना मोकळीक देत पडद्यावर सजीव झाले.

२६/११ ला सकाळी भिलाई स्टेशनवरून ११ वाजता मी आणि पत्नी पुण्याला येण्यासाठी रेल्वेत बसलो. एरवी रायपूर-मुंबई फ्लाईट आणि पुणे-मुंबई असा वेळवाचू सुटसुटीत प्रवास करणारे आम्ही त्यावेळी ऐशमध्ये मुंबईला जायला निघालो. चिरंजीव पुण्याला कॉलेजमध्ये असल्याने सोबत नव्हते. मावसभावाचे लग्न २८ नोव्हेंबरला पुण्यात असल्याने हा प्रवास सुशेगात प्लॅन केलेला आणि पुढे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस ठरलेलं.

त्याकाळी भ्रमणध्वनीचे मर्यादित आक्रमण, व्हाट्सएप विद्यापीठाचे आगमन झालेले नसल्याने, व्हिडीओ कॉल, तिसरे/चौथे “जी “नसल्याने मर्यादित कचरा डोक्यात जमायचा.

साधारण तीन-चार वाजता गोंदियाच्या आसपास डब्यात चढलेल्या प्रवाशांनी सांगितले -” मुंबईत काहीतरी सुरु आहे, दोन गटांमध्ये मारामाऱ्या वगैरे !” सगळे सरसावून बसलो. मुलाला पुण्याला फोन लावला. तोही कॉलेजात असल्याने अनभिज्ञ होता. घरी जाऊन टीव्ही वर बघतो म्हणाला. तोवर डब्यात तोंडपाटीलकी, तर्कवितर्क, अफवा सुरु झाल्या. सायंकाळी अर्धवट उडत-उडत कळाले की गॅंगवॉर सदृश्य काहीतरी सुरु आहे. कदाचित हिंदू-मुस्लिम दंगल !

मुलाला टीव्ही वर तुकड्या-तुकड्याचे बाईट्स मिळत होते आणि तो जेव्हा फोनला रेंज मिळेल तेव्हा काहीतरी अपडेटस देत होता. दरम्यान दुपारीच पुण्यातील शाळा -महाविद्यालयांना सुटी जाहीर झाली होती असे कानी आले. एव्हाना हे काहीतरी गंभीर घडतंय असं वाटायला लागलं होतं. वरील मुंबापुरीच्या जुन्या दुर्घटना माहीत होत्या. मुलाला घरात कोंडून घ्यायच्या सूचना दिल्या. रात्री नागपूरनंतर प्रवासाबद्दलच धास्ती वाटू लागली. थोड्यावेळाने टी सी ने येऊन अधिकृतपणे अतिरेकी हल्ल्याचे वृत्त दिले आणि कदाचित गाडी मुंबईपर्यंत जाणार नाही, वाटेतच टर्मिनेट होण्याची शक्यता/भाकीत केले. तसेच जेवण केले आणि आम्ही गप्प झालो.

पहाटे चारच्या सुमारास गाडी दादरला आली आणि थांबली. घोषणा झाली- “गाडी पुढे जाणार नाही. इथेच उतरून घ्या.”

संपूर्ण दादर स्टेशन चिडीचूप, मानवी हालचालींविना ! अशी बेसूर, थंड, मंदावलेली मुंबई कधीच दिसली नव्हती. अजूनही धग सुरु होती, कोठे कोठे काय काय घडत होते. प्लॅटफॉर्म वर असताना अचानक उद्घोषणा झाली – पुण्याला जाणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसची!

दिलासा मिळाला, ओझे उतरले, घेरलेली अनिश्चितता काहीशी धूसर झाली. सूर्य उगवत होता आणि आकाश काहीसे उजळले होते.

ट्रेन आली. आमच्या आरक्षित बोगीत बसलो. बोगीत फारतर पाच-सहा टाळकी, बाकी सगळीकडे रिकामपण, भेसूरपण, हातात येणारे घटनांचे तुकडे आणि त्यातील धस्स करणारे बारकावे ! कसेबसे पुण्यात पोहोचलो आणि नंतर घरी! मग सगळे वृत्त सगळ्या दिशांनी कानी आले आणि थिजून जाण्याचे खरेखुरे फिलिंग आले.

आज “मेजर “ने संदीप उन्नीकृष्णन यांचा तसाच सुन्न करून टाकणारा लढा मांडला आणि त्या घटनेच्या दहा वर्षांनी गेट वे ऑफ इंडियाला सर्वांसमोर भाषण करणारा प्रकाश राज आजपासून कायमचा माझ्या प्रियगटात जाऊन बसला. संदीपची प्रेमळ आई- उत्तरायणातील रेवती नामक कलावतीने डोळ्यांसमोर ठेवली. काही वर्षांपूर्वी “धूप “मधील ओम पुरीच्या पत्नीच्या रूपात असाच मिलिटरी पुत्र गमावण्याच्या दुःखाने हादरलेली आई तिने रंगविली होती.

एकेका भूमिकेचे आणि कलावंताचे नशीब !

माझा परम मित्र -जयंत असनारेचा वाढदिवस २६ नोव्हेंबरला असतो. दैनंदिन झगड्यात पूर्वी तो क्वचित विसरला जायचा. आता विसरू शकत नाही आणि असे “ज्वलंत ” चित्रपट तो दिवस विसरू देत नाहीत.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..