नवीन लेखन...

२६ जुलै २०१९ : स्मृती कारगिल युद्धाच्या

२६ जुलै २०१९ ला कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होतील. कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. आजपर्यंतच्या युद्धांपैकी केवळ कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.

कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो.  उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर , लडाख ते कारगिलपर्यंतच्या सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते.पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले.

२६ जुलै कारगिल विजय दिवस

भारतीय सैन्याला ही गोष्ट समजल्यानंतर भारतीय हद्दीतून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय ही मोहिम राबविली. सुरूवातीला हे आमचे सैनिक नसून दहशतवादी असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. पाकिस्तानी सैन्याच्या नॉर्दन लाईट इन्फंट्रीच्या ११हून अधिक बटालियन्स (एका बटालियनमध्ये ७५० ते १००० सैनिक असतात) यांनी कारगिलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने १० ते १५ हजार सैनिकांच्या दोन तुकड्या युद्धभूमीवर उतरवल्या होत्या. २६ जुलै१९९९ रोजी शैवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्याने हा दिवस ‘कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

५४३ अधिकारी आणि जवान युद्धात शहीद

जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. याआधी इतक्या उंचीवर कोणतेही युद्ध झालेले नाही. या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले तर भारताचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. १३००हून अधिक भारतीय सैनिक/अधिकारी यात गंभीर जखमी झाले होते. या युद्धात सुरवातीला लेफ्टनंट सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्याने कुठपर्यंत घुसखोरी केली आहे हे शोधून काढण्याची कामगीरी सोपविण्यात आली होती.

कारगिल युद्धातला दुसरे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा हे होते. सिंहाइतका शुर असल्याने बत्रा यांना त्यांचे सैनिक शेरशहा म्हणत असत. कारगिल युद्धाच्या केवळ दीड वर्षे आधी भारतीय सैन्यात सामिल झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली. कारगिलचे पहिले शिखर जिंकल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना पुढे काय असे विचारले असता, ‘जेवढा प्रदेश जिंकला तेवढा पुरेसा नाही, ‘ये दिल माँगे मोअर‘ अशी प्रतिक्रीया कॅप्टन बत्रा यांनी दिली. त्यांच्यामुळेच ‘ये दिल माँगे मोअर हे वाक्य प्रसिद्ध झाले. त्यानंतर पॉइंट ५१४०च्या वरती असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर चालून जाण्याची कामगिरी कॅप्टन बत्रा यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी पॉइंट ५१४० जिंकला, मात्र त्यात ते शहिद झाले. युध्दाआधी, मी ‘भारताच्या ध्वजामध्ये लपेटूनच परत येईल असे कॅप्टन बत्रा म्हणाले होते. ते खरे ठरले. या युद्धातले सगळ्यात पहिले ‘परमवीर चक्र कॅप्टन बत्रा यांना प्रदान करण्यात आले.

युद्धभूमीला भेट द्या

त्यानंतर लेफ्टनंट विजयंत थापर यांना ‘थ्री पिंपल्स या शिखरावर पाठविण्यात आले. यात त्यांच्या दोन राजपुताना रायफल्सचे कंपनी कमांडर मेजर आचार्य शहिद झाले. २२ वर्षांचे विजयंत काही महिन्यांपुर्वीच सैन्यात अधिकारी झाले होते. विजयन यांनी ‘थ्री पिंपल्स या १७ हजार फुट उंचीवर असलेल्या शिखरावर भारताचा झेंडा फडकवला; पाकिस्तानचे १५० सैनिक असलेल्या या शिखरावर चढण्यासाठी थापर यांनी तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच सर्वांत अवघड कड्याची निवड केली होती. विजयंत यांच्या शौर्याबद्दल त्यांना विरचक्र प्रदान करण्यात आले. मात्र त्यात त्यांना विरगती प्राप्त झाली.  विजयत यांनी मोहिमेवर जाण्याआधी आपल्या कुटुंबियांसाठी एक पत्र लिहले होते. मी परत आलो नाही तरच हे पत्र माझ्या कुटुंबियांना पाठवावे असे त्यांनी सांगितले होते. या पत्रात त्यांनी आपले वडील निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर यांना युद्ध संपल्यानंतर आम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये लढलो हे पाहण्यासाठी या युद्धभूमीला भेट द्या असे म्हटले होते. ८८ वर्षे वयाचे निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर हे दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल येथील १८ हजार फुटांवरच्या विरभूमीवर जाऊन सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

परमविर कॅप्टन मनोज पांडे, ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव, शिपाई संजय कुमार यांची विरगाथा 

कॅप्टन मनोज पांडे यांनी ‘खालुबर नावाच्या शिखरावर हल्ला करून ते शिखर पाकिस्तानकडून परत मिळवले. त्यात कॅप्टन मनोज पांडे यांना विरगती प्राप्त झाले. त्यावेळी आपल्या तुकडीतील सैन्याला उद्देशून शेवटचे दोन शब्द काढले होते. ते शब्द ‘ना छोडनू असे होते. नेपाळी भाषेतील या शब्दांचा अर्थ ‘दुश्मनांना सोडू नका असा होता. २४ वर्षांच्या मनोज पांडे यांना मरणोपरांत ‘परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. या युद्धात ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव यांनी आपल्या प्लाटूनबरोबर ‘टायगर हिलवर हल्ला केला होता. त्यांनी ‘टायगर हिलवरती भारताचा तिरंगा फडकवला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना ‘परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. १३ जॅक रिफच्या सिपाही संजय कुमार यांना ‘पॉईंट ४८७७वर जाण्याचा आदेश मिळाला. संजयकुमार यांनी पाकिस्तानी सैन्यावरती जोरदार हल्ला करून तीन जवानांना यमसदनी धाडले. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे.

या युद्धात अनेक अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले होते. त्यात मेजर डी. पी. सिंग यांना गंभीर जखमी झाल्यानंतर आपला एक पाय गमवावा लागला होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. ते आजही कृत्रिम पाय लावून धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असतात. ते भारताचे अग्रणी ‘ब्लेड रनर म्हणून ओळखले जातात. गंभीर जखमी झाल्यानंतर अवयव गमावलेले अनेक जवान आहेत. तरीही आपल्या अपंगत्वावर मात करत ते जीवन जगत आहेत.

तरूण अधिकारी आणि शुर जवानांचे युद्ध

कारगिल युद्ध हे तरूण अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या शुर जवानांचे युद्ध होते. हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात शहिद झालेले जवान आणि अधिकारी २० ते २६ या वयोगटातील होते. आपले ३६ अधिकारी, ५७६ सैनिक आणि हवाई दलाचे पाच जवान शहिद झाले. शहिद झालेल्या अधिकार्याची रँक लेफ्टनंट, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल अशी होती. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारताच्या अनेक बुद्धीमान अधिकारी, सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले.

या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते. या युद्धात १८ ग्रेनेडियर्स, २ राजपुताना रायफल्स, १३ जम्मु आणि काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स आणि ८ सिख रेजीमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला. मोठा पराक्रम गाजवल्याने या तुकड्यांचा ‘युनिट सायटेशनने गौरविण्यात आले.

गरज शूर सैनिक आणि देशप्रेमी नागरिकांचीही

कारगिलच्या युद्धानंतर भारतीय सैन्याने द्रास भागात एक युद्धस्मारक बांधलेले आहे. कारगिलला भेट देणारे अनेक पर्यटक या युद्धस्मारकाला भेट देत असतात. तिथे गेल्यानंतर कारगिलचे युद्ध झालेली अनेक शिखरे तेथून दिसतात. त्यामुळे या भागात लढणे किती अवघड असते याची प्रचिती आपल्याला येते.

या युद्धात आपले रक्त सांडून आपल्या तरुण अधिकारी आणि सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. लढाईत शस्त्र आणि सैनिक हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मात्र कोणतेही शस्त्र चालविण्याकरीता असणारा सैनिक सर्वांत जास्त महत्त्वाचा असतो आणि सैनिक सदैव सतर्क असतील तर देश सुरक्षित राहतो. म्हणूनच भारतीय नागरिकांनी आणि सरकाने आपल्या सैनिकांची काळजी घेतली पाहिजे.

आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे. २६ जुलै ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..