जीवन जगताना अनेक अडचणी येत असतात. परंतु अशी कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्या अडचणीतून वाट काढत कसे बाहेर जाता येईल याचा शांतचित्ताने व धीराने विचार केला तर अशा संकटावर सहज मात करता येऊ शकते. या संदर्भात प्रसिद्ध तत्त्ववेत्ते टॉलस्टॉय यांच्यासंबंधी सांगितली जाणारी हकिकत मोठी मनोरंजक आहे.
टॉलस्टॉय हे स्वभावाने अतिशय मिश्कील व प्रेमळ होते. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार प्रचंड होता. ते सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्यामुळे अनेक लोक त्यांच्या वैयक्तिक अडचणी सांगून त्यातून बाहेर कसे पडता येईल हे विचारण्यासाठीही त्यांच्याकडे येत असत.
एकदा असेच एक गृहस्थ टॉलस्टॉय यांच्याकडे आले व त्यांनी आपल्या अडचणींचा पाढा सुरू केला. त्यावर टॉलस्टॉय शांतपणे त्याला म्हणाले, “जीवनात अशा असंख्य अडचणी येतात. त्यावर शांतपणे विचार केला तरच त्यातून वाट सापडते व अडचणींवर मात करता येऊ शकते.”
टॉलस्टॉयचे हे उत्तर ऐकून तो गृहस्थ चिडला. तो म्हणाला, “तुमचा कोरडा उपदेश काय कामाचा? उद्या तुम्हाला कोणी गावाबाहेरच्या नदीतून चाळणीतून पाणी आणायला सांगितले तर तुम्ही आणणार काय? ते तुम्हाला शक्य तरी होईल काय?”
त्वावर टॉलस्टॉय म्हणाले, “हे का नाही शक्य होणार? त्यासाठी मी जरूर धीर धरेन. वाट पाहीन. कारण आणखी काही दिवसांनी हिवाळा सुरू होणार आहे. हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे आजूबाजूचे डोंगर बर्फ पडून हिमाच्छादित होतील. तेथील काही हिमखंड घसरत येऊन नदीच्या पाण्यात मिसळतील व तरंगत राहतील. त्याचवेळी मी चाळणी घेऊन नदीवर जाईन व चाळणीत हिमखंड घेऊन येईन. त्याला थोडी ऊब दिली की मग त्याचे पाणी होईल. म्हणजे थोडक्यात मी चाळणीतून पाणी आणल्यासारखेच होईल. ”
टॉलस्टॉय यांचे हे उत्तर ऐकून तो गृहस्थ ओशाळला व म्हणाला, “मी तुमच्या या उत्तराने आशावादी झालो आहे व खरोखरच कोणत्याही संकटावर युक्तीने व धीराने मात करता येते हे मला आज कळले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.”
Leave a Reply