२७ जानेवारी १९७९ रोजी ऑकलंडमध्ये डॅनिएल वेटोरीचा जन्म झाला. आज जगभरात खेळणार्या अगदी मोजक्या डावखुर्या फिरकीपटूंमध्ये सर्वोत्तम असे वेटोरीचे सार्थ वर्णन केले जाते. न्यूझीलंडकडून सर्वाधिक एकदिवसीय बळी मिळविण्याचा विक्रम वेटोरीच्या नावावर आहे. कसोटी सामन्यांमध्ये ३०० बळी मिळविणारा (रिचर्ड हॅडलीनंतर) तो केवळ दुसरा किवी गोलंदाज आहे. प्रामुख्याने गोलंदाज अशी भूमिका असल्याने पण फलंदाजीची क्षमताही दुर्लक्षित करण्याजोगी नसल्याने त्याला ‘बोलिंग ऑलराऊंडर’ म्हटले जाते. न्यूझीलंडकडून खेळणारा इटालियन वंशाचा (‘ल्युका’) तो पहिला क्रिकेटपटू आहे. खेळताना त्याने चष्मा घातलेला असतो (गॉगल नव्हे!), हेदेखील त्याचे एक वेगळेपण.
केवळ दोन प्रथमश्रेणी सामने खेळल्यानंतर वेटोरीची न्यूझीलंड संघात निवड झाली. सतराव्या वर्षी नॉर्दन डिस्ट्रिक्ट्ससाठी खेळताना त्याने प्रथमश्रेणी पदार्पण केले आणि प्रवासी इंग्लंड संघातील नासर हुसेनला बाद करून पहिला बळी मिळविला. वेलिंग्टनमधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी त्याची संघात निवड झाली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षातील दहाव्याच दिवशी डॅनिएल कसोटीपदार्पण करता झाला. पदार्पणाच्या कसोटीत नासर हुसेनच त्याचा पहिला बळी ठरला.
मार्च १९९७ मध्ये वेटोरीने एदि-पदार्पण केले. इकडेही तो एदिसा खेळणारा सर्वात लहान किवी खेळाडू ठरला. पाच महिन्यांनंतर झिम्बाब्वेविरुद्ध नवव्या क्रमांकावर येऊन ९० धावा काढून वेटोरीने आपल्यातील फलंदाजाची ताकद जगाला दाखवून दिली. त्याच्या गोलंदाजीची सर्वदूर तारीफ यापूर्वीच झालेली होती.
ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९९ मध्ये मोटेरावर भारताने सचिन तेंडुलकरच्या २१७ धावांच्या जोरावर ७ बाद ५८३ धावा केल्या होत्या. त्या डावात वेटोरीने बरोबर २०० धावा दिल्या होत्या. त्याच्यापूर्वी केवळ एकाच किवी गोलंदाजाने अशी कामगिरी केलेली होती.मार्च २००० मध्ये डॅनिएल वेटोरीने आपले कसोटी बळींचे शतक पूर्ण केले. असे शतक जमविणारा तो जगातील सर्वात छोटा फिरकीपटू आहे. याच वर्षाच्या उत्तरार्धात त्याची तंदुरुस्ती ढासळली.
२००३ संपता संपता वेटोरीने आपले पहिले कसोटी शतक नोंदविले. नोव्हेंबर २००४ मध्ये न्यूझीलंडच्या एदिसा संघाची कप्तानी त्याच्याकडे आली. पुढच्याच वर्षी नॉर्द्न डिस्ट्रिक्ट्सकडून तो सलामीला आला आणि दोन सलग शतके त्याने नोंदवली. ऑगस्ट २००५ मध्ये २०० कसोटी बळींचा टप्पा त्याने पार केला. याच सामन्यात त्याने केवळ ८२ चेंडूंमध्ये शतक झळकावले – किवींच्या कसोटिहासातील हे सर्वात वेगवान शतक.
२००५ संपता संपता कसोटी संघाचे नेतृत्वही त्याच्याकडे आले. त्यानंतर दोन वर्षांनी तो न्यूझीलंडचा नियमित कर्णधार बनला. ऑगस्ट २००९ मध्ये त्याने ३०० वा कसोटी बळी मिळविला. ३०० बळी आणि ३००० धावा ही कामगिरी त्याच्याव्यतिरिक्त सात जणांनाच साधलेली आहे.
आजमितीला त्याच्या नावावर ३४५ कसोटी बळी तर २७७ एदिसा बळी आहेत. न्यूझीलंड-पाकिस्तानदरम्यान सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना नुकताच जिंकून अखेर न्यूझीलंडने अकरा सलग एदिसा पराभवांनंतर विजय मिळविला आहे. या मालिकेपूर्वी झालेल्या दोन कसोट्यांच्या मालिकेत पाकने १-० असा विजय मिळविलेला आहे. कसोटी मालिकेनंतर वेटोरीने कर्णधारपद सोडले असून विश्वचषकानंतर तो एदिसा कर्णधारपदही सोडणार आहे. (ग्रॅएम स्मिथनेही असा निर्णय जाहीर केलेला आहे.)
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply