आज आपण नाट्यगृहात, महोत्सवात, स्पर्धेत इ. ठिकाणी पाहणाऱ्या नाटकाला हजारो वर्षांचा इतिहास आणि परांपरा आहे. पुरातन काळापासून ते आजच्या एकवीसाव्या शतकातील नाटकांच्या सादरीकरणात, शैलीत, तंत्रज्ञानात काळानुरूप बदल होत आले आहेत. जगातील सर्वात पुरातन नाट्यपरंपरा म्हणून ग्रीक आणि भारतातील संस्कृत रंगभूमीची ओळख आहे.
इ.स.पूर्व पाचव्या शतकात ग्रीक मध्ये डायनायसस या देवतेच्या धार्मिक उत्सवातून ग्रीक रंगभूमीची सुरूवात झाली. या उत्सवप्रसंगी भक्तगणांचा वृंद (कोरस) देवाच्या वेदीभोवती नर्तन करीत स्तवनगीत गात असे. सुरुवातीच्या काळात उत्स्फूर्तपणे म्हटल्या जाणाऱ्या या गीतांचे पुढे लेखन होऊ लागले. हळूहळू वृंदाचे दोन गट पडून त्यांत संवाद आले. अन्य देवांच्या किंवा पराक्रमी वीरांच्या कथाही येऊ लागल्या. अशा वेळी थेस्पिस नावाच्या लेखकाने वृंदासमोर स्वतंत्र नाट (अनेक पात्रांच्या भूमिका आलटूनपालटून करणारा) उभा केला आणि ग्रीक रंगभूमी अस्तित्वात आली.ग्रीक नाटकांचे प्रयोग विस्तृत अशा मोकळ्या नैसर्गिक परिसरात होत. चेहऱ्यावर मोठ – मोठे मुखवटे, काव्यात्मक भाषाशैली आणि सुसंगत शारीरिक हालचाली ही त्यावेळच्या नाटकांची वैशिष्ट्ये. दळणवळणातील शोध, संपर्काची साधने, तंत्रज्ञानात टप्प्या टप्प्याने झालेल्या प्रगतीचा नाटकाच्या जडण घडणीत फार सकारात्मक परिणाम झाला. ग्रीक प्रमाणेच इतर जवळजवळ सर्वच रंगभूमींचा उगम हा एकतर धार्मिक उत्सवातून किंवा धार्मिक कर्मकांडांतून झाला आहे.
जागतिक रंगभूमी या विभागात दोन टप्पे करता येतील. ग्रीक रंगभूमी, रोमन रंगभूमी, रशियन रंगभूमी, फ्रेंच रंगभूमी, जपानी रंगभूमी , चिनी रंगभूमी, अमेरिकन रंगभूमी, ब्रिटिश रंगभूमी, पोलिश रंगभूमी या रंगभूमींचा प्रामुख्याने सामावेश होतो. तर दुसरा विभाग हा स्वतंत्रपणे भारतीय रंगभूमीचा पडतो. मग यात संस्कृत रंगभूमी, मराठी रंगभूमी, बंगाली रंगभूमी, हिंदी रंगभूमी, कर्नाटक रंगभूमी, पंजाबी रंगभूमी, मल्याळम रंगभूमी, उर्दू रंगभूमी , तेलुगू रंगभूमी, ओडिशा रंगभूमी , कन्नड रंगभूमी ई. रंगभूमींचा सामावेश होतो.
ज्याप्रमाणे ‘फ्रेंडशीप डे, व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे’ इत्यादी ‘डे’ साजरे होतात तसाच आज ‘वर्ल्ड थिएटर डे’. विस्तृत स्वरूपात पसरलेल्या कलाविष्कारांचे, जागतिकीकरण व्हावे यासाठी पुढाकार घेत युनेस्को च्या सहाय्याने, इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युटने 1961 सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले व त्यानंतर 1962 सालापासून जगभरात जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येऊ लागला. या निमीत्ताने दरवर्षी एका नवीन नाटककाराला बोलावून एक संदेश देण्याची परंपरा आहे . 2002 साली गिरीश कर्नाड या भारतीय नाटककाराला हा संदेश देण्याची संधी मिळाली. तसं पाहिलं तर किमान दहा वेळा हा सन्मान भारताला मिळायला हवा होता, एवढी दिग्गज नाटककार मंडळी आहेत भारतात.
रंगभूमीने जगाला काही महत्वाची माणसं दिली किंवा असंही म्हणता येईल की, काही माणसांनी रंगभूमीला उत्तम दिशा दिली यात दिग्दर्शक म्हणून विल्यम शेक्सपिअर,पिटर ब्रूक्स, बर्टॉल्ट ब्रेख्त, कॉन्स्टंटाईन स्तानिस्लाव्स्की,जेर्झी ग्रोटोस्की, लूसी बेली, हबीब तन्वीर, रतन थियाम, मेयरहोल्ड, पृथ्वीराज कपूर ,बी.व्ही.करंथ, सत्यदेव दुबे, वॉल्टर लर्नींग, उत्पल दत्त, भारतेंदू हरीश्चंद्र, ओम शिवपूरी, बादल सरकार , राम गोपाल बजाज, इब्राहीम आल्काझी, व्लादिमिर दानचेंको, युजिनीओ बार्बा, सतिश आळेकर, वाख्तांगोव अशी कित्येक नाट्य दिग्दर्शक रंगभूमीला दिले. विल्यम शेक्सपिअर म्हणजे जागतिक रंगभूमीवरील चमत्कारच! तर लेखक म्हणून भास, कालिदास, अश्वघोष , शुद्रक, गिरीश कर्नाड , विजय तेंडूलकर , सतिश आळेकर , आर्थर मिलर, टेनिसी विल्यम्स, हेन्रीक इब्सेन,सॕम्युएल बेकेट , युजिन ओनील, अॉस्कर वाईल्ड , हेरॉल्ड पिंटर , सोफोक्लीज , युरीपिडीज , ॲन्टॉन चेखोव, अॉगस्ट स्ट्रींडबर्ग, एस्कीलस , मोलिएर, जॉर्ज बर्नाड शॉ, प्लॉटस, मॕक्सीम गोर्की, मोहन राकेश इ. लेखक दिले.
संस्कृत रंगभूमी नंतर सर्वात महत्त्वाची रंगभूमी म्हणजे आपली मराठी रंगभूमी. आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया विष्णूदास भावेंनी घातला असे म्हणतात पण त्यापूर्वीही आंबेडकरी, फुले जलसे होतेच. असो हा वादाचा मुद्दा ठरेल. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत रंगभूमी चा पाया घातला. पुढे त्यांचे अनुकरण करत अनेक नाटक मंडळ्या आल्या. सिता स्वयंवर, संगीत सौभद्र इ. संगीत नाटकांनी त्यावेळी रंगभूमी गाजवली. बालगंधर्व याच काळातले. बालगंधर्वांसारखा नट मराठी रंगभूमीला मिळणे हे नशीबच. बालगंधर्वांचा आभिनय, स्त्री पात्र करतांना हालचाल हे सगळं चमत्कारच होतं. बालगंधर्वांनी स्त्री पात्रासाठी नेसलेल्या साडीची फॕशनच त्या काळी पडावी यावरून त्यांच्या प्रभावाची जाणीव होते. पुढे राम गणेश गडकरी , श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी ही नाट्य चळवळ सुरू ठेवली. गडकरींचे ‘एकच प्याला’ हे नाटक माईल स्टोन ठरले. हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरील प्रथम दर्जाची शोकात्मिका मानली जाते. मराठी रंगभूमीच्या आरंभी काळात पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांचा पगडा होता. मराठी नाटकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम पुढील पिढीने केले.
जागतिक रंगभूमीवर जसा शेक्सपिअर जसा अत्यंत महत्वाचा ठरतो तसेच मराठी रंगभूमीवर विजय तेंडूलकर महत्त्वाचे ठरतात. ऐतिहासिक व पौराणिक नाटकांच्या चौकटीला भेदून त्यांनी माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, प्रवृत्तींचा वेध घेणारी नाटकं त्यांनी लिहली. ‘घाशीराम कोतवाल’ या त्यांच्या नाटकाने मराठी रंगभूमीला जगभर नेले. ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘सखाराम बाईंडर’, ‘अशी पाखरे येती’ ही त्यांची काही महत्त्वाची नाटकं. महेश एलकुंचवार यांनी सुद्धा मराठी रंगभूमीला दर्जेदार नाटकं दिली. ‘वासनाकांड’, ‘पार्टी’, ‘ वाडा चिरेबंदी’, ‘ प्रतिबिंब’ , ‘वासांसि जिर्णानि’ , ‘आत्मकथा’ ही त्यांची काही महत्त्वाची नाटकं. तेंडूलकरांनतर मराठी नाटकाला एलकुंचवारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले.
‘घाशीराम कोतवाल’ या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेलांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणाऱ्या आळेकरांनी आपल्या व्यावसायिक वाटचालीस खऱ्या अर्थाने सुरूवात केली होती. त्यांनी लिहलेल्या नाटकांनी मराठी रंगभूमीला उच्च पातळीवर नेले. ‘महानिर्वाण’ , ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’ ही त्यांची नाटकं केवळ मराठी रंगभूमीवरच नाही तर जागतिक पातळीवर दखल घेणारी ठरली. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय तेंडूलकर , महेश एलकुंचवार आणि सतिश आळेकर यांची नावं फार आदराने आणि सन्मानाने घेतात. हे आपल्या मराठी रंगभूमीचे भाग्य. जगात आज कुठेही एवढ्या विपूल प्रमाणात नाट्य निर्मीती होत नाही जेवढी महाराष्ट्रात होते आणि भारताचा विचार केल्यास आख्खं जग एकीकडे आणि भारत एकीकडे असं चित्र होईल!
नाटक, नृत्य किंवा संगीत ही रंगभूमीचाच भाग पण हे क्षेत्र आता केवळ मनोरंजनापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. या माध्यमातून मानसिक व शारीरिक आजारांवर उपचारही शक्य आहेत. यासाठी खास प्रशिक्षित व पदवीधारक थेरपिस्ट आहेत. आता ही उपचार पद्धती विशेष मुलांसाठीच्या शाळा, रुग्णालये आणि नृत्य प्रशिक्षण संस्थांचा अविभाज्य अंग बनली आहे. कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांतील तणाव कमी करून कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यालयात नृत्य उपचार पद्धती सुरू केली आहे.
शालेय जिवनापासून नाटक हे फार महत्त्वाचे आहे. शाळेत आवड म्हणून किंवा हिमतीने प्रेक्षकांसमोर केलेल्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांवर आणि स्वतःवर अधिक विश्वास निर्माण होतो. हा निर्माण झालेला विश्वास विद्यार्थ्यांना भविष्यात वेगवेगळे विषय आत्मविश्वासाने हाताळण्यासाठी महत्वपूर्ण ठरतो. आज सर्वजण तंत्रज्ञानाच्या व्यसनाधीन झाले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इ. सोशल नेटवर्कींग साईट्सवर आपल्याला किती लाईक्स, फॉलोवर्स आहेत यात जास्त गुरफटून जातात. नाटक यातून बाहेर पडण्याचा एक सर्जनशील मार्ग प्रदान करतो. म्हणजे नवीन कल्पनांचा विचार करणे, वेगवेगळ्या परिस्थितीतील, वेगवेगळ्या मनस्थितीतील, वेगवेगळ्या काळातील आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधील भूमिका करून इतरांबद्दाल सहिष्णुता, करुणा आणि स्वतःत सहनशीलता निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळते. शिवाय एकत्रितपणे काम करणे, सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणे म्हणजे सहकार आणि सहयोग याचे न कळत शिक्षण नाटक करताना मिळते. खेळणे, सराव करणे, सादर करणे, शरीर आणि आवाज यांचे सातत्यपूर्ण व्यायाम करण्याने मन स्थिर होण्यासाठी मदत होते. मन शांत असेल तर एकाग्रतेने कुठलेही काम करण्यास उत्साह येतो. नाटकामुळे संभाषण कौशल्ये अधिक चांगली होतात. बोलण्याची भाषा, उच्चारण, बोलण्याचा ओघ, गती इत्यादी गोष्टी सुधारतात.इम्प्रोवायझेशनमुळे जलद विचार करण्याची क्षमता वाढते. नाटकासोबत खेळ, विनोद आणि मजाही येते त्यामुळे काम करताना तणाव कमी होतो व प्रेरणा मिळते. नाटकांमध्ये वापरलेले नाट्य, दंतकथा, कविता, कथा आणि गोष्टी, विद्यार्थ्यांना आपल्या समाजातील आणि जगभरातील सर्व संस्कृतींमधील विविधता , संस्कृती, निसर्ग व आजूबाजूच्या इतर गोष्टींबद्दल शिकवतात. नाटक करताना, पाहताना, त्या कलेचा प्रकार, कलेची मूल्ये व सादरीकरण यांचे कौतूक होते. आणि आज आपल्याला कलेचा आदर आणि कलेची मूल्ये जपणारी पिढी हवी आहे जी मुख्यतः कला या एकंदर प्रकाराला समर्थन देणारी असेल.
जोपर्यंत पाहणारे (प्रेक्षक) आहेत, तो पर्यंत रंगभूमी तिच्या विविध रुपाने जनसामान्यांचे मनोरंजन करतच राहणार आहे. आज नाटक केवळ मनोरंजक गोष्ट राहिलेली नाही. नाटक म्हणजे मुळात कल्पकता. सत्य परिस्थितीपासून फँटसीपर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश होतो.जगातील विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व वैयक्तिक पातळीवरील मानसिक संघर्षांचे भेदक चित्रण नाटकांतून होते. ते प्रभावीपणे दाखवण्यामध्ये कल्पकतेचा कस लागतो म्हणून काही समाजकंटक, कला शत्रू , संघटना विरोध, निषेध करतात. पण बाबांनो ते काय दाखवतायत? का दाखवतायत? त्यामागची त्यांची मेहनत आयुष्यात एकदा तरी नक्कीच अनुभवून पाहावे.
युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटला जॉन माल्कोविच या अभिनेता, निर्माता, दिग्दर्शकाने ५० व्या जागतिक रंगभूमीदिनानिमित्त दिलेला संदेश :
तुमचे नाट्यकर्म खिळवून ठेवणारे आणि सृजनात्मक असो. ते विचारांना खाद्य देणारे, बुद्धीला चालना देणारे, हृदयाला भिडणारे आणि एकमेव असे असो. तुमच्या कामाचा उपयोग मानवता समजून घेण्यासाठी होवो व त्यामधे सहृदयता, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि दैवी सौंदर्याचा वास असो. तुम्हाला ज्यांचा सामना करावा लागतो असे सर्व अडथळे, सर्व बंधने, गरिबी आणि सगळ्या मूल्यांना तिलांजली देण्याची, नाश करण्याची वृत्ती या गोष्टींना तुम्ही पार करून जावे. तुम्हाला तुमचे आयुष्यभराचे नाट्यकर्म साकारण्यासाठी कौशल्य, मानवाच्या हृदयाच्या धडधडीच्या अनवट हरकती दाखवण्यासाठी लागणारी अचूकता, कारूण्य, जगाप्रती उत्सुकता यांचे वरदान मिळो. तुम्हापैकी जे सर्वोत्तम आहेत – सर्वोत्तम असणारेच केवळ आणि तेही क्वचित काही क्षणांपुरतेच – ते “जगण्याचे संचित काय?” या प्रश्नाला हात घालण्यात यशस्वी होवोत. देव भले करो!”
सर्व कलावंतांना, नाट्य गुरूजनांना, गाव पातळी पासून ब्रॉडवे रंगभूमीवर काम करणाऱ्या, मंचावरील व मंचामागील, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि नाट्यप्रेमींना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दीक-हार्दीक शुभेच्छा.
— लेखक : अजित संदीपान आंधळे.
नाट्य – पदवीधर, ललित कला केंद्र,
पुणे विद्यापीठ.
संपर्क : 9225959595
Email: andhale22ajit@gmail.com
Leave a Reply