नवीन लेखन...

३ ऑगस्ट १९५६ – बलविंदर सिंग संधूचा जन्म

3 August 1956 - Birthday of Balvinder Sandhu

3 ऑगस्ट 1956 रोजी विश्वविजेत्या भारतीय संघाचा एक सदस्य असलेल्या बलविंदर संधूचा जन्म झाला, त्या वेळच्या बॉम्बेत. १९८०-८१च्या हंगामात करसन घावरी या नियमित सलामीच्या गोलंदाजाची निवड राष्ट्रीय संघात झालेली असताना त्याला बॉम्बे संघाकडून प्रथमश्रेणीत खेळण्याची संधी मिळाली. या हंगामात त्याने २५ बळी मिळविले. १९८२-८३च्या हंगामाच्या प्रारंभी त्याने दुलीप चषकाच्या सामन्यात अकराव्या क्रमांकावर येऊन ५६ धावा काढल्या आणि पाच गडीही बाद केले. इराणी चषकाच्या सामन्यातील पाच बळींमुळे राष्ट्रीय संघाची दारे त्याच्यासाठी उघडली. पाकचा दौरा करणार्‍या संघात त्याचा समावेश झाला.

त्याचे पदार्पणही नाटकीय होते. चेंडू ‘आत’ (म्हणजे टप्पा पडल्यावर यष्ट्यांच्या रोखाने येणारा) आणि ’बाहेर’ (म्हणजे टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांपासून दूर जाणारा) ‘डुलविण्याची’ त्याची हातोटी होती. आपल्या या ‘डुल्या’ मध्यमगती गोलंदाजीवर त्याने पदार्पणातच मोहसिन खान आणि हारून रशीदला तंबूचा नजारा दाखविला. मग मात्र मुदस्सर नजर आणि जावेद मियांदादने नांगर टाकला. नजर २३१, जावेद २८०! पाकने ३ बाद ५८१वर डाव घोषित केला. भारताच्या डावात क्रमांक नऊवर उतरून बलविंदरने तब्बल ए-क्का-ह-त्त-र धावा काढल्या – गावस्करने या सामन्यात ७१ मिनिटांत १७ धावा काढल्या होत्या. भारताच्या डावात त्याच्याच धावा सर्वाधिक ठरल्या (९ चौकार, २ षटकार). फॉलोऑन बसून भारताचा पराभव झाला, ही गोष्ट अलग.
चेंडू टाकून त्याला फारसे यश मिळाले नाही पण १९८३च्या विश्वचषकविजेत्या चमूत संधू होता. अकराव्या क्रमांकावर येऊन त्याने सय्यद किरमाणीसोबत २२ धावा जोडल्या होत्या. नंतर वेस्ट इंडीजच्या डाव्यात गॉर्डन ग्रिनीजसारख्या मुरलेल्या फलंदाजाने त्याचा एक चेंडू बॅट खांद्याच्याही वर नेऊन सोडून दिला आणि हा ‘आंतर्डुल्या’ (इन्स्विंगर) कंदुक त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला. आजही ह्या चेंडूची कौतुकाने चर्चा केली जाते. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उणीपुरी दोन वर्षेचटिकली. त्याच्या अंतिम कसोटीचा किस्साही मनोरंजक आहे –
अहमदाबाद, १९८३-८४ च्या हंगामातील भारत-विंडीज कसोटी. साबरमतीच्या काठी नव्यानेच बांधण्यात आलेल्या मोटेरा मैदानावरील (आताचे नाव सरदार पटेल मैदान) ही पहिलीच कसोटी होती. अहमदाबाद हे त्यासोबतच भारतातील अकरावे कसोटी केंद्र बनले. विंडीजच्या दुसर्‍या डावात कपिलदेव निखंजने एकट्याने नऊ गडी बाद केले – उरलेला एक बाद केला होता बलविंदर संधूने! पहिलाच गडी गॉर्डन ग्रिनीज हा संधूकरवी बाद झालेला असल्याने संधू कपिलच्या विक्रमाआड आला असे म्हणता येणार नाही. एका अंत्य‘धू’साठी शेवटची ठरलेली ही कसोटी दुसर्‍या एका अंत्य‘धू’साठी पहिलीच होती – नवज्योतसिंग सिद्‌धू गुरू! एक गुरू या कसोटीत संघात नसतानाही विक्रमी कामगिरी करून गेला. जखमी रॉजर बिन्नीच्या जागी क्षेत्ररक्षण करताना गुरूशरण सिंग या राखीव खेळाडूने या सामन्यात चार झेल घेतले. चार झेल घेणारा तो पहिलाच ‘बारावा’ खेळाडू बनला आणि आजही हा विक्रम त्याच्यासाठी ‘राखीव’ आहे.
— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..