३१ जानेवारी २००१ रोजी झिम्बाब्वेच्या राजधानीतील हरारे स्पोर्ट्स क्लबवर पाकिस्तान आणि झिम्बाब्वेदरम्यानचा पहिला कसोटी सामना सुरू होणार होता (आणि झालाही पण…)
सामनाधिकारी जॅकी हेन्ड्रिक्स (वेस्ट इंडीज) आणि प्रतिस्पर्धी कर्णधार अॅन्डी फ्लॉवर आणि सलीम मलिक नाणेफेकीसाठी आले… नाणेफेक हा क्रिकेटच्या कोणत्याही सामन्याचा अविभाज्य भाग आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रत्यक्ष खेळ सुरू होण्याच्या साधारण तीस मिनिटे आधी नाणेफेक घेतली जाते. त्याआधी दोन्ही कर्णधारांनी मैदानाची औपचारिक पाहणी केलेली असते. नाणेफेकीच्या आधी दोन्ही कर्णधार एकमेकांना आपापल्या संघातील खेळाडूंची यादी देतात आणि ती अंतिम असते.
…झिम्बाब्वेच्या चलनी नाण्यांवर एका बाजूला गरुडाची मुद्रा असते. नेहमी सामनाधिकारी नाणे उडविल्यानंतर एका कर्णधाराकडून कौल मागतात : हेड्स ऑऽ टेल्स. इथे सलीम मलिक बोलून गेला बर्ड (गरुडासाठी). बर्ड वर आला आणि अॅन्डीने सलीमशी हस्तांदोलन केले. सलीमने त्याला क्षेत्ररक्षणासाठी तयार होण्यास सांगितले.
दरम्यान हेन्ड्रिक्ससाहेबांनी मात्र मलिकचा पुकारा आपल्याला ऐकू न आल्याचे म्हटले आणि पुन्हा नाणेफेक घेतली. या खेपेला मलिक नाणेकौल हरला आणि अॅन्डीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला !
चार धावांवर झिम्बाब्वेचा पहिला गडी बाद झाला, नऊ धावांवर दुसरा आणि ४२ धावांवर तिसरा. मग मात्र ग्रॅन्ट-अॅन्डी ही फ्लॉवर बंधूंची जोडी जबरदस्त जमली. २६९ धावांची भागीदारी त्यांनी चौथ्या गड्यासाठी केली. वैयक्तिक १५६ धावांवर अॅन्डी फ्लॉवर बाद झाला. नंतर आलेल्या गाय विटलनेही शतक रचले. ग्रॅन्ट फ्लॉवरचे द्विशतक पूर्ण झाल्यावर अॅन्डी फ्लॉवरने डाव घोषित केला : ४ बाद ५४४ धावा. ग्रॅन्ट फ्लॉवर नाबाद २०१ !
तिसर्या दिवस-अखेर पाकिस्तानच्या पहिल्या डावात ७ बाद २७१ धावा झालेल्या होत्या. ३ फेब्रुवारी हा विश्रांतीचा दिवस होता. खेळाच्या चौथ्या दिवशी ३२२ धावांवर पाकचा पहिला डाव संपला आणि मग दुसराही ! पहिल्या डावात हीथ स्ट्रीकने सहा बळी मिळविले होते. दुसर्या डावात झिम्बाब्वेच्या तीन गोलंदाजांना प्रत्येकी तीन बळी मिळाले : डेविड ब्रेन, हीथ स्ट्रीक आणि गाय विटल.
झिम्बाब्वेचा कसोट्यांमधील हा पहिलावहिला विजय होता !! स्टुअर्ट कार्लिस्ले आणि हेन्री ओलोंगा यांच्यासाठी ही पदार्पणाची कसोटी होती.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply