26 ऑगस्ट 1920 हा 1920 च्या काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेमधील नॉर्दम्प्टनशायर वि. सरे या सामन्याचा दुसरा दिवस होता. नॉर्दचा पहिला डाव 306 धावांवर संपुष्टात आला होता. कर्णधार पर्सी फेंडरने या डावात 69 धावांमध्ये 3 गडी टिपले होते. 5 बाद 448 वर त्याची फलंदाजीची पाळी आली. त्याच्या अंगात काय शिरले होते ते त्यालाच ठाऊक – 19 मिनिटांमध्ये त्याने पन्नाशी गाठली आणि 35 मिनिटांमध्ये शेकडा! 5 बाद 619वर त्याने डाव घोषित केला तेव्हा 42 मिनिटांमध्ये 16 चौकार आणि पाच षटकारांसह 113 धावा त्याने काढलेल्या होत्या. (कर्णधार तोच, भिडू पिचच्या 200 पूर्ण झाल्या की दोघेही गोलंदाजांना टा टा करीत मैदानाबाहेर निघून गेले, षटक अर्ध्यातच सोडून!) प्रथमश्रेणी सामन्यांमधील ज्या शतकांच्या वेळेविषयी वाद नाही त्यांमध्ये पर्सीच्या या शतकाचा कमी वेळेच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. त्याच्या या विक्रमाची बरोबरी एकदा झालेली आहे.
बरोब्बर एक वर्षानंतर लिसेस्टरशायरचा यष्टीरक्षक टॉम सिडवेल ओवल मैदानाकडे जाता जाता रस्ता चुकला आणि तो मैदानावर एकदाचा पोचला तेव्हा सामना सुरू झालेला होता. आदल्या दिवशी सिडवेल नाबाद होता. त्याच्या अनुपस्थितीत गतसंध्येचा त्याचा साथीदार असलेल्या कर्णधार ऑब्री शार्पने जॉन किंगच्या साथीत डाव सुरू केलेला होता. (चूक टॉमची नव्हतीच. बिचार्याची फलंदाजीतील नेहमीची जागा होती क्र. 7, संध्यारक्षक म्हणून तो काल ‘आला’ होता.) सरेचा कप्तान असलेल्या पर्सी फेंडरने (उपरोल्लेखित) त्याला डाव सुरू करण्याची परवानगी दिली नाही. नाही तर काय – 19 मिनिटांत 50 धावा काढणारा माणूस काही मिनिटांचा उशीर कसा सहन करेल? सामन्याच्या धावतालिकेत नोंद आहे : टीई सिडवेल निवृत्त बाद 1.
… प्रथमश्रेणी सामन्यांमधील ज्या शतकांच्या वेळेविषयी वाद नाही त्यांमध्ये पर्सीच्या या शतकाचा कमी वेळेच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. त्याच्या या विक्रमाची बरोबरी एकदा झालेली आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply